Get it on Google Play
Download on the App Store

भाग-४

`व्हॅलेन्सीया' सिटी ऑफ जॉय........ बार्सिलोना वरून सकाळी सकाळी आम्ही प्रस्थान ठेवलं ते व्हॅलेन्सीयाला जाण्यासाठी. जाता जाता बसच्या काचेतून बार्सिलोनाचे शेवटचे दर्शन घेत पुढे पुढे जात होतो. शेवटचे दर्शन यासाठीच कि, फॉरेन ट्रिप पुढेही होतील, पण किमान परत तेच देश किंवा तीच शहरे नक्कीच येणार नाहीत. विमानातून प्रवास करताने सुद्धा मी खिडकीतून अखंड वेळ बाहेर बघत असतो, ते याचसाठी कि हे जे दृश्य दिसतंय ते आपल्याला पुन्हा दिसणार नाही. बार्सिलोनातून बाहेर पडताने आम्ही `एफ.सी. बार्सिलोना' या फुटबॉल क्लबच्या स्टेडिअमला धावती भेट दिली. आमचे मित्र आशिष हलगेकर यांना याबद्दल माहिती होती, त्यामुळे आशिषच्या आग्रहामुळे आम्हाला हे स्टेडियम बघायचा योग आला. संपूर्ण युरोप हा फुटबॉल वेडा आणि स्पेन तर फुटबॉलची पंढरी. बार्सिलोना ते व्हॅलेन्सीया हे चार तासांचे अंतर. रस्त्याच्या आजूबाजूस इंडस्ट्री कमी आणि हिरवीगार शेतं भरपूर होती. शेतांमधून ऑलिव्ह, संत्रीच्या बागा उभ्या होत्या. अजूनही काही पिकं होती पण ती काही ओळखायला येत नव्हती. एक विशेष वाटले कि एवढा सगळा परिसर हिरवागार पण इरिगेशन कुठे फार दिसत नव्हते. क्वचित एखाद्या बागेत ड्रीप चे पाईप दिसत होते. इथे इरिगेशनची गरजच नाही. पाऊस अधून मधून पडतच असतो. आणि मूळच्याच थंड हवामानामुळे इथली पिकं वाळून जात नसावीत. तरी हि ग्लोबल वॉर्मिंगचे चटके यांनाही बसू लागलेत. कारण गाईड च्या बोलण्यात गेली तीन वर्ष आमच्याकडे दुष्काळी परिस्थिती आहे' असे ऐकले होते. इथली संत्र म्हणजे लिंबापेक्षा थोडीशी मोठी, साधारणतः चिक्कू एवढी, पण खायला गोड. ऑलिव्हची चव मात्र जरा विचित्र वाटते. या ऑलिव्ह पासून तयार केलेलं ऑइलच इथे सर्व जेवणात वापरले जाते. बस मध्ये गाणी-गप्पा आणि इतर चर्चा यांना उधाण आलेले होते. चार तासाच्या प्रवासानंतर व्हॅलेन्सीया दिसू लागले..................................................

`व्हॅलेन्सीया' या शहराचे दोन भाग पडतात. न्यू टाऊन आणि ओल्ड (किंवा डाऊन) टाऊन. लंच नंतर आम्ही पोहोचलो तो एरिया अतिशय मॉडर्न होता. माशाच्या डोळ्याच्या आकाराची एक बिल्डिंग दुरूनच लक्ष वेधून घेत होती. त्याच्याच शेजारीच अतिशय क्लिष्ट पण बघणेबल असे आर.सी.सी. स्ट्रक्चर, शेजारचा टेंसाईल स्ट्रक्चर चा बेजोड नमुना ठरावा असा एक उंच कॉलम उभा होता. शब्दात चित्र उभे करता येणे कठीण आहे. त्या प्रत्यक्ष बघायलाच हव्यात पण सोबतच्या फोटोंमध्ये त्या इमारती दिसतील. जवळच एक `ओसिनोग्राफी ऍक्वा पार्क' होते. तिथे हजारो प्रकारचे, विविध रंगाचे, आकाराचे मासे होते. पाण्याखालून जाणारा ग्लास टनेल होता. आपल्या आजूबाजूने आणि डोक्यावरून जाणारे भले मोठे आणि छोटे छोटे मासे बघणे हे नक्कीच रोमांचक होते. इथे समुद्रातील वालरस, पेन्गवीन, कासवे आणि अनेक विविध जलचर प्राणी होते. मी मागे दुबईला गेलो होतो तेंव्हा ` अटलांटिस पाम' या जगप्रसिद्ध हॉटेल मधले तीन मजली ऍक्वा पार्कही असेच रोमांचक वाटले होते........................

हा नवीन एरिया सोडून आम्ही जुन्या शहरात प्रवेश केला आणि संपूर्ण युरोप मधील टीपीकल इमारती दिसू लागल्या. `व्हॅलेन्सीया' हे शहर १९५७ साली आलेल्या महापुरात निम्म्यापेक्षा जास्त जलमय झाले होते. त्यानंतर तिथल्या प्रशासनाने आणि आर्किटेक्ट व इंजिनिअर्सनी एक धाडशी निर्णय घेतला. आणि १९६० सालापर्यंत प्रचंड मोठा कालवा खोदून ती संपूर्ण नदीच शहराबाहेरून वळवली. पुराचा नैसर्गिक धोका कायमचा काढून टाकला. पण नदीचा उर्वरित भूभाग त्यांनी लगेच सिमेंटची जंगले वाढवण्यासाठी नाही वापरला तर त्या जागेत सुंदर गार्डन उभे केले. आज ते १० किलोमीटर लांब गार्डन व्हॅलेन्सियाची शान आहे. त्या बागेत रनिंग ट्रॅक, खेळाची मैदाने आणि व्यायामाची साधने उपलब्ध आहेत. याच शहरातील नाही पण संपूर्ण प्रवासातील सगळीकडचीच माणसे अतिशय फिट्ट वाटली. एकही पोट सुटलेला किंवा वजनदार डुलत जाणारा माणूस दिसला नाही. पण पळत जाणारी मात्र शेकडो दिसली. आणि आपण उगाचच आमच्या भारतात सर्वात जास्त तरुण राहतात असे म्हणतो, पण त्यातील व्यसनाधीन आणि पुढाऱ्याच्या मागे फिरणारे रिकाम टेकडे किती आहेत?......... असो.

शहरातून फिरताने गाईड आम्हाला अनेक इमारतींबद्दल माहिती सांगत होती. त्यातील लक्षात राहण्यासारखे म्हणजे तेथील रेल्वे स्टेशन आणि ७ मजली `बुल फाईट एरिना'. हि विटांमध्ये बांधलेली सात मजली इमारत अत्यंत आकर्षक होती. काही वेळाने जरासा पाऊस सुरु झाला. सरळ हॉटेलवर जायचे कि पावसात पायी फिरत शहर बघणे चालू ठेवायचे यावर किरकोळ चर्चा होत पावसातच फिरण्याचा पर्याय निवडला गेला. भुरुभुरु पावसात, थंडगार वाऱ्यात अंगावरचे जर्किन ओढून पावसापासून बचाव करत पायी फिरणेही आनंद देऊन गेले. याच वेळी आम्ही एका जुन्या चर्चला भेट दिली. युरोपात चर्च सगळीकडेच असतात.संपूर्ण युरोप वर या चर्च नि आणि पोपनी अनेक वर्ष सत्ता गाजवली. आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी हि चर्चेस अनेकदा चमत्कार (करून) दाखवायची. मदर मेरीच्या डोळ्यातून अश्रू येणे, स्तनातून दूध येणे किंवा येशूच्या जखमांमधून रक्त येणे वगैरे वगैरे. त्यावेळी लोक याला चमत्कार समजून चर्च ला भरभरून दान द्यायचे आणि दबूनही राहायचे. या चर्चेसना प्रचंड पैसे गोळा व्हायचे. पण अलीकडच्या काळात हे सर्व चमत्कार म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची कमाल होती हे सिद्ध झालेय. `लिओ नार्दो द व्हिन्सी' च्या एका पुस्तकात त्यांनी चर्चेस साठी केलेल्या मेकॅनिकल करामती विस्तृतपणे लिहिल्या आहेत. असो. कुणाच्या भावना दुखावणे हा उद्देश नाही. पण या वर्चस्वामुळे आणि पैशामुळे त्याकाळी प्रत्येक शहरातील सर्वात भव्य आणि देखणी इमारत हि चर्च असायची. या चर्च चे काम मात्र वास्तुशास्त्रातील अजब म्हणावे लागेल इतके सुंदर असायचे. हे भव्य चर्च बघून झाल्यावर तिथल्याच एका मोठ्या चौकात आम्ही बरेच भटकलो आणि पाय थकले म्हणून बसकडे वळलो. नेहमीप्रमाणे एका इंडियन रेस्टोरंन्टला जेवण करून हॉटेल मध्ये चेक इन केले...भेटू उद्या.................

अनिल दातीर (सातारा)
(९४२०४८७४१०.)