भाग-७
'टोलेडो' जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळालेले हे छोटे ऐतेहासिक, जुन्या टिपिकल युरोपियन धाटणीचे शहर, 'टोलेडो' ला भेट देणे हा आमचा माद्रिद मधील तिसऱ्या दिवसाचा नियोजित कार्यक्रम होता. सकाळपासूनच भुरू भुरू पाऊस चालू होता. पण इथे धूळ नाही, माती नाही, धूर नाही, त्यामुळे पावसामुळे होणारा राडा-रोडा नाही. साधारण दीड तासाच्या प्रवासानंतर 'टोलेडो' दिसू लागले. तिथेहि पाऊस चालूच होता. शहरात प्रवेश केल्यानंतर त्या पावसात एक सुंदरशी स्पॅनिश गाईड आमची वाट पाहत उभी होती. तिला बघून अनेकांच्या चेहऱ्यावर चैतन्य दिसू लागले. गाडीत बसल्यानंतर तिने पहिल्यांदाच सांगितले 'धिस रेन इज मिरॅकल फॉर अस' या टोलेडोला पाऊस फार कमी पडतो. आणि आम्ही गेलो तेंव्हा पाऊस पडत होता. त्यामुळे गाईड हि उत्साहाने चिवचिवत होती. अनेकांनी शहराचे फोटो घेण्याबरोबरच या गाईड बरोबरही फोटो काढले (कुणाला दाखवणार काय माहित?) विनोदाचा भाग सोडून देऊया, पण वातावरण मस्त होते.
हे शहर सात टेकड्यानी बनलेले आहे, आणि त्याच्या जवळ जवळ ७५% बाजूने पाणी आहे. एक नदी त्या शहराला जवळ जवळ गोल चक्कर मारून पुढे जाते. कदाचित पूर्वीच्या एखाद्या दूरदर्शी राजाने संरक्षण म्हणून नदीच खंदकासारखी वळवून घेतली असावी. आम्ही पहिल्यांदा पोहोचलो ते एका तलवार बनवण्याच्या कारखान्यात. इथल्या खाणीतील पोलादापासून उत्कृष्ट तलवारी, ढाली आणि इतर हत्यारे तयार केली जातात. मागच्या प्रकरणात मी 'शिवाजी महाराजांच्या' स्पेन संबंधाचा उल्लेख केला होता, त्याचा संदर्भ इथे आहे. सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांनी या स्पेनच्या राजाकडून हजारो तलवारी मोठी ऑर्डर देऊन बनवून घेतल्या होत्या. संपूर्ण युरोपात अतिशय मंदी असताना आणि स्पेन आर्थिक संकटात असताना आपल्या शिवाजी महाराजांनी ही तलवारींची ऑर्डर स्पेनला दिली. त्यातून स्पेनला मिळालेल्या धनाचा स्पेनच्या आर्थिक व्यवस्थेला मोठा आधार मिळाला, म्हणून स्पेन चे राज घराणे अजूनही आपल्या 'शिवाजी महाराजांचे' नाव आदराने घेते. त्यावेळच्या राजा फिलिप याने शिवाजी महाराजांना तीन उत्कृष्ट तलवारी खास तयार करून, आदराने भेट दिल्या होत्या. त्या तलवारींची नावे 'भवानी' 'जगदंबा' आणि 'तुळजा' अशी ठेवण्यात आली होती. शिवाजी राजांना भवानी मातेने तलवार भेट दिली होती असे काही जण म्हणतात त्याचा उगम हा असा आहे. (मला वादात पडायचे नाही, पण हि माहिती लिखित स्वरूपात उपलब्ध आहे, आणि यु ट्युब वर या संदर्भात माहितीही उपलब्ध आहे) कदाचित शिवाजी महाराजांनी स्वतःहून 'आपल्याला भवानी मातेने स्वप्नांत दृष्टांत देऊन 'भवानी' तलवार भेट दिली' असे सांगितलेही असेल. अशा बातम्या पसरवणे हा महाराजांच्या गनिमी काव्याचा आणि रणनीतीचा एक भाग होता. शत्रूवर आपली जरब बसावी म्हणून राजे अशा गोष्टी मुद्दाम पसरवत असत. आग्र्याला महाराज पोहोचले त्याअगोदर त्यांच्याविषयी अनेक बातम्या अशाच पोहोचवल्या गेल्या होत्या. 'शिवाजी महाराजांना भवानी प्रसन्न आहे, महाराज जादूटोणा करतात, महाराज कधीही गायब होऊ शकतात आणि कुठेही अवतरतात'. अशा बातम्यांमुळे प्रत्यक्ष महाराज पोहोचण्या अगोदर त्यांची दहशत शत्रूपर्यंत पोहोचत असे. या अशा दूरदर्शी शिवाजी राजांना माझा मनाचा मुजरा.
गाडी थांबली आणि येथून पुढे पायी शहर फिरायचे आहे असे गाईडने सांगितले. अनेकांना या पावसात जायला नको वाटत होते, पण पर्याय नाही म्हणून सगळे उतरले. आणि गाईड ने विरुद्ध बाजूच्या उंच डोंगराकडे बोट दाखवत तिकडे जायचे आहे असे सांगितले. नक्की वर्णन करायचे तर सातारा शहर म्हणजे नवीन टोलेडो आणि अजिंक्यताऱ्यावरील वस्ती म्हणजे ते 'हेरिटेज टोलेडो टाऊन'. बस मधून बाहेर पडलो तर पावसाबरोबर हलके बर्फही पडू लागले. आम्हाला बर्फ स्नानाचा पण आनंद मिळाला.'टोलेडो' ला जायला एस्कलेटर होते. संपूर्ण चढाई हि ८-१० एस्कलेटर मध्ये बसवलेली होती. आपण फक्त त्यावर उभे राहायचे. वर पोहोचलो तेंव्हा या १२ व्या शतकातील छोट्या गावाचे दर्शन झाले. संपूर्ण दगडी बांधकामे, दगडीच ८-९ फूट रुंदीचे रस्ते. थोडासा इतिहासाचा मागोवा घेतला तर इथे पूर्वी मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू लोक राहायचे. पण पंधराव्या शतकात येथील मुस्लिम आणि ज्यूंना 'एकतर ख्रिश्चन व्हा किंवा टोलेडो सोडून जा' असे सांगण्यात आले आणि हे शहर पूर्णपणे ख्रिश्चन झाले. इथल्या इमारती अजूनही सुस्थितीत आहेत आणि इथे लोक राहतात सुद्धा. काही हॉटेल्स, छोटे शॉप्स आणि जुनी घरे बघत आम्ही एका भव्य चौकात पोहोचलो. या चौकात १२ व्या शतकातील सँडस्टोन मध्ये बांधलेले अतिशय सुंदर चर्च होते. त्याच्या बाजूलाच आर्च बिशपचा एक भव्य वाडा होता. आर्च बिशप म्हणजे पोप च्या खालोखाल असलेले दोन नंबरचे पद. म्हणजेच त्या काळी हे टोलेडो नक्कीच स्पेन मधील एक महत्वाचे सत्ताकेंद्र असणार,
'टोलेडॊ' सफर संपवून खाली आलो. इथे गाईडने निरोप घेतला. आमच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था इथल्याच एका सुंदर रेस्टोरंट मध्ये केली होती. लोकल स्पॅनिश फूड असले तरी ते रुचकर होते. जेवण संपवून परतीचा प्रवास करून आम्ही पुन्हा माद्रिदला पोहाचलो. हाताशी दोन तासाचा वेळ मिळताच कालच्यासारखेच सगळे जण खरेदीला उधळले................
इथे माझ्याकडून जरा ऐकण्यात गडबड झाली, आणि त्याचे परिणाम मला भोगावे लागले. बसने त्या मार्केटजवळ सोडताने, त्याच्या जवळच्याच लेन मध्ये आपले इंडियन रेस्टोरेंट आहे, तिथे सात वाजता सर्वांनी जमायचे असे टूर गाईड अल्ताफ भाईंनी सांगितले होते. पण मी असे समजलो कि सात वाजता, काल जिथे बस थांबली होती तिथे जमायचे आणि बस रेस्टोरेंटला घेऊन जाणार. मी खरेदी आवरून ६.४५ लाच त्या चौकात पोहोचलो. हलका पाऊस पडत होता, बराच वेळ थंडीतून चालत आल्याने कधी एकदा उबदार बसमध्ये बसतो असे झाले होते. पण ७ वाजले, ७.१५ वाजले, ७.३० झाले तरी बसही येईना आणि कोणी मेम्बर पण येईना. मग मला खात्री पटली कि काहीतरी गडबड आहे. मी एकटा, जवळ पासपोर्ट नाही, रात्री लिस्बनला जायचे असल्याने हॉटेल सकाळीच चेक आऊट केलेलं. सामान सगळं बस मध्ये. थंडीने गारठलो होतो. थंडीपासून बचाव करायचा उपाय म्हणजे कुठल्या तरी दुकानात जायचे आणि खरेदीचे नाटक करायचे, पण कदाचित बस येईल, एखादा मेम्बर येईल किंवा आपल्याला कोणीतरी शोधत असेल यामुळे जागा सोडता येईना. त्या चौकात बस स्टॉप वर लक्ष ठेवत मी चकरा मारत होतो. एक नक्की माहित होते कि रात्री लिस्बनसाठी रेल्वेने निघायचे असल्याने काही झाले तरी हे सर्वजण रेल्वे स्टेशनला नक्की भेटू शकतील. अखेर ८.०५ ला बस आली. ते म्हणतात ना 'जीव भांड्यात पडणं' तसं काहीसे झालं आणि मी बस मध्ये जाऊन बसलो. आणि शिल्लक असलेल्या J&B च्या बाटलीतून कडकडीत दोन तीन घोट कच्चेच मारले. मग जरा शरीरात उब आली. नंतर थोड्या वेळात सगळेजण जेवण करून आले. अरे कुठे होतास? तुला आम्ही शोधत होतो? वगैरे वगैरे.....
मी काय अनुभवले होते माझे मलाच माहित. फार चर्चा न करता आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो. १० वाजता रेल्वेत बसलो. रेल्वेने मात्र निराशा केली. माझ्या कल्पनेत ऐसपैस, आरामदायक, युरो-ट्रेन होती पण आम्हाला मिळालेले कुपे अगदीच कंजस्टेड होते. रात्रभराच्या प्रवासानंतर आम्ही दुसऱ्या देशात म्हणजे पोर्तुगाल मध्ये पोहोचणार होतो. भेटू पुन्हा लिस्बन मध्ये ..........
अनिल दातीर (सातारा)
(९४२०४८७४१०.)