भाग-५
'माद्रिद' हे स्पेनच्या राजधानीचे शहर. राजधानी कशी असावी याचं आयडियल मॉडेल. व्हॅलेन्सीया वरून आम्ही माद्रिदला दुपारी पोहोचलो. लंच केल्यानंतर 'रिअल माद्रिद' या प्रसिद्ध फुटबॉल संघाचे 'सान्तियागो-बर्नाब्यू स्टेडियम' ला गेलो. एफ.सी. बार्सिलोना स्टेडियम आम्ही फक्त बाहेरून बघितले होते पण या 'रिअल माद्रिद-बर्नाब्यू' स्टेडियम ला मात्र आत जाऊन बघण्याचे नियोजन केलेले होते. वर्ल्ड फेमस फुटबॉल स्टार 'रोनाल्डो' याच क्लबकडून खेळतो. स्टेडियम बघण्याचे तिकीट होते ३००० रुपये होते. आत गेलो तेंव्हा तेथील दोन मजले हे म्युझिअम सारखे सजवलेले होते. क्लब स्थापन झाल्यापासूनचे हजारो फोटो, शेकडो ट्रॉफीज इथे ठेवलेल्या होत्या. आणि हे सर्व लाईट्स आणि साऊंड इफेक्ट्सचा सुंदर वापर करत फारच आकर्षक पद्धतीने मांडलेले होते. इथे आपल्या आवडत्या फुटबॉल स्टार बरोबर फोटो काढून घ्यायची सोय होती. म्हणजे आपण एका ठराविक ठिकाणी पोज घेऊन उभे राहायचे आणि नंतर फोटोशॉपची कमाल वापरून आपण त्या खेळाडू बरोबर ग्राउंडवर उभे आहोत असा फोटो आपल्याला मिळणार. पैसे कमावणे, बाकी काही नाही. एके ठिकाणी ट्रम्पेट चा आकार असलेले मोठे पाईप लावलेले होते, त्याला कान लावला कि ग्राउंडवरचा कोलाहल, हल्लागुल्ला ऐकायची सोय होती. हे सर्व बघत आम्ही स्टेडियम मध्ये प्रवेश केला. ५५००० लोक बसू शकतील असे तीन लेव्हलचे हे भव्य स्टेडियम अतिशय सुंदर आहे. क्रिकेट ग्राउंड फार मोठे असतात, त्यामुळे माणसे फार लांब बसलेले असतात. त्यामुळे कोणी ओळखायला येत नाही. पण फुटबॉल ग्राउंडचा आकार लहान असल्याने हे सर्व पब्लिक अगदी एकमेकासमोर बसलेले असतात. प्रत्यक्ष मॅच चालू असताना इथे काय कोलाहल माजत असेल याची कल्पना स्टेडियम बघून येते. मुळात स्पेनवासी सगळेच फुटबॉलचे वेडे. तिथला प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या तरी क्लबचा चाहता असतोच. जो नसेल तो अज्ञानी असेच समजले जाते. हे भव्य स्टेडियम बघून झाल्यानंतर आम्ही माद्रिद सिटी टूर साठी बाहेर पडलो
संबंध युरोप मध्ये डोळ्यात भरण्यासारखी स्वच्छता दिसते. रस्ते अतिशय भव्य असतात. जवळ जवळ प्रत्येक रस्त्याला सायकल साठी वेगळा ट्रॅक असतो. आणि खूप लोक सायकली वापरतात सुद्धा. इमारतींना प्लिंथ (जोते) नसतेच. त्यामुळे सायकलस्वार किंवा व्हील चेअर वर बसलेला माणूसही कुठल्याही इमारतीत आरामात प्रवेश करू शकतो. प्रत्येक सिग्नलला पायी चालणाऱ्यांसाठी सुद्धा वेगळा सिग्नल असतो. पायी चालणाऱ्यांनाही इथे खूप रिस्पेक्ट दिला जातो. आपण रस्त्याकडेला रस्ता क्रॉस करण्यासाठी नुसते उभे राहिलो तरी वाहने १० फूट लांब उभे राहतील आणि आपल्याला अगोदर जाऊ दिले जातील. अर्थात तेथील लोकही सिग्नल असेल तेंव्हाच रस्ता क्रॉस करतात. आपल्याकडे असे कोण थांबणार नाही, आणि क्रॉस करणाऱ्यालाच शिव्या घालून, कट मारून वाहने जात राहतील. आणि पायी चालणारा सुद्धा 'माजलेत भडवे' म्हणून शिव्या घालत पुढे जाईल. असो, नजाकत अपनी अपनी. माद्रिदचे नजारे बघत आम्ही हॉटेल गाठले
'माद्रिद' मध्ये रात्री आम्ही ग्रॅन्डव्हीया स्ट्रीट वरील एका हॉटेल मध्ये तिथला लोकल फोक शो 'फ्लेमिन्को' ला हजेरी लावली. हॉटेल कंजस्टेड होते, त्यातच मध्ये एक स्टेज उभे केलेले होते. इथे आमच्यासाठी लोकल स्पॅनिश फूड असलेले थ्री कोर्स डिनरची व्यवस्था केलेली होती. सोबतीला वाईन होतीच. थोडयाच वेळात एक नर्तिका स्टेजवर आली. तिच्या सोबतीला एक गिटार वादक आणि गाणारी व टाळ्या वाजवून साथ देणारी एक स्त्री होती. ह्या टाळ्यांनाही एक रिदम होता, आणि तेही एक संगीतच होते. तुम्ही 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे' हा सिनेमा बघितलाय? त्यात शाहरुख व त्याचे मित्र आणि काजोल व तिच्या मैत्रिणी एका लाईव्ह एंटरटेनमेंट शो मध्ये हजेरी लावतात असे दृश्य आहे, ते डोळयासमोर आणा. स्थानिक 'ऑपेरा' हा प्रकार म्हणजे अतिशय उच्च स्वरात गायलेले गीत असते. आम्ही उपस्थित होतो तो काही ऑपेरा नव्हता, पण बाज तसाच होता. 'फ्लॅमेन्को' हा एक स्थानिक नृत्य प्रकार. ज्याचा भर पायाच्या हालचालीवर असतो. 'टायटॅनिक' मध्ये एक टॅप डान्स प्रकार होता तो याच्याशी मिळता जुळता,
सुरुवातीलाच आलेली वयस्कर नृत्यांगना बघून आमच्यातील अनेकांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते, आणि बडबडही सुरु झाली होती. (नंतर तरुण तरुणी आल्या म्हणा). पण तिथल्या स्थानिक लोकांच्या नजरा आमच्याकडे वळताच सगळे गप्प झाले. एखाद्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला ते कळत नसलेला माणूस गेल्यानंतर त्याची जशी अवस्था होती तसेच काही बरेचसे . ..................
हळू हळू कार्यक्रम रंगू लागला होता. त्या शो मधील नजाकत हि नाचणाऱ्यांच्या चेहऱ्यात नसून पायात आहे हेही कळले आणि त्यात रंगून गेलो. त्या नर्तक आणि नर्तकींचा पदन्यास हा तबला वाजवण्याइतक्याच स्पीड ने होत होता. तिथले स्थानिक लोक या नृत्य प्रकाराला भरभरून दाद देत होते. आपल्याकडे भरत नाट्यम, कत्थक किंवा कुच्ची पुडी सारखे नृत्य प्रकार असतात अगदी तोच सन्माननीय दर्जा या फ्लॅमेन्को शो ला आहे
लोकल जेवण अर्थातच फार काही मानवण्यासारखे नव्हते. तेंव्हा सगळाच प्रकार ''फार चांगला नाही, आणि वाईटही नाही''' या खात्यावर जमा करत आम्ही बाहेर पडलो. जिथे जावे तिथले असे स्थानिक लोककलेचे कार्यक्रम नक्की पाहावेत, त्यातून तिथल्या संस्कृतीची ओळख होते. हे माझे वैयक्तिक मत. असो...........
मनोरंजन आणि जेवण करून थोडयाच वेळात हॉटेल गाठले, आणि थंडीने गारठलेले आम्ही सर्व प्रवासी हॉटेलच्या उबदार गुहेत गडप झालो ..............
अनिल दातीर (सातारा)
(९४२०४८७४१०.)