Android app on Google Play

 

प्रकरण २०

 

......फैरो तुतनखामेनला कॅप्टन गिनयू कडे जाऊन बराच वेळ झाला होता. अभिजीत, प्रोफेसर आणि वजीर होरेमहेब किंग्स चेंबर मध्ये बसले होते. अचानक तुतनखामेनचा एक सैनिक पळत पळत चेंबर मध्ये घुसला. त्याच्या अंगावर अनेक जखमा होत्या. तो सैनिक चेंबर मध्ये घुसताक्षणीच जमिनीवर कोसळला.

"काय झालं?" वजीर होरेमहेबने त्या सैनिका जवळ जात विचारलं, "कोणी केल हे सगळं? आणि महान फैरो कुठे आहेत?"

पण त्या सैनिकाचा जीव केव्हाच निघून गेला होता. प्रोफेसर आणि अभिजीतही तिथे आले.

"याला तर लेजर गनने मारलेल दिसतं आहे." अभिजीत त्या सैनिकाच्या जखमांच निरिक्षण करत म्हणाला.

अचानक जमिन हादरायला लागली, जणू काही भूकंप आला होता. पाठोपाठ एक मोठा आवाज झाला. पिरॅमिडच्या बाहेर काहीतरी घडत होतं.

प्रोफेसर: मला हे लक्षण चांगले दिसत नाही. वजीर होरेमहेब, मला वाटतं आपण शीघ्र तिथे चलायला हवं. तो कॅप्टन गिनयू मोठा धोकेबाज आहे. महान फैरोंचा जीवही धोक्यात असू शकतो.

वजीर होरेमहेबला सुध्दा प्रसंगाचे गांभीर्य समजले होते. आपल्या सर्व सैनिकांना सोबत घेऊन तो अभिजीत आणि प्रोफेसरांबरोबर किंग्स चेंबर मधून बाहेर पडला.

                                              ते पिरॅमिड मधून बाहेर आले तेव्हा चारही बाजूला धुळच धूळ होती. काही वेळानंतर ती सर्व धूळ हळूहळू दूर झाली आणि त्या तिघांनाही समोर एक दृश्य दिसल‌. तुतनखामेनसोबत आलेले सर्व सैनिकांचे शव तिथे पडलेले होते आणि काही अंतरावरच त्यांना फैरो तुतनखामेनचा मृतदेहही आढळून आला. पण कॅप्टन गिनयूच स्पेसशिप मात्र कुठेच दिसत नव्हतं.

अभिजीत: प्रोफेसर.....

प्रोफेसर: हो, हे सगळं कॅप्टन गिनयूनेच केलं आहे आणि तो पळून गेला. तो मोठा आवाज त्याच्याच स्पेसशिपचा होता.

वजीर होरेमहेबला तर स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास होत नव्हता. तुतनखामेनच प्रेत त्याच्या समोर पडलं होतं. तो तिथेच जमिनीवर गुडघ्यावर बसला.

"हे सगळं माझ्यामुळे झालंय." वजीर होरेमहेब भरलेल्या गळ्याने म्हणाला, "मला सुरूवातीला कॅप्टन गिनयू वर संशय आला होता. पण मी दुर्लक्ष केल. जर मी व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर कदाचित महान फैरो....."

प्रोफेसर: वजीर होरेमहेब, जे झालं ते फार वाईट झालं. पण आता ही रडत बसण्याची वेळ नाही. आपल्याला कॅप्टन गिनयूला थांबवायला हवं. नाहीतर अजून कितीतरी जीव जातील. महान फैरोंच बलिदान व्यर्थ जायला नको. पण त्यासाठी तुम्हाला आमची मदत करावी लागेल.

वजीर होरेमहेब डोळे पुसत उठला,

"मी तुमची मदत करायला तयार आहे. महान फैरोंचा खूनी जिवंत रहायला नको. त्यासाठी वाटेल ते करायला मी तयार आहे. सांगा कसली मदत हवी."

प्रोफेसर: आम्हाला द ग्रेट स्फिंक्स मध्ये जायचं आहे.

वजीर होरेमहेब: माझ्या मागे या.

वजीर होरेमहेबने काही निवडक सैनिकांना तुतनखामेनच शव राजवाड्यात सुरक्षित पोहोचवण्याचा आदेश दिला आणि उर्वरित सैनिकांसह द ग्रेट स्फिंक्सच्या दिशेने निघाला. प्रोफेसर आणि अभिजीत त्याच्या मागे निघाले.

                 ********************

"वंडरफुल!"

हे उद्गार प्रोफेसरांच्या तोंडून नकळत बाहेर पडले, जेव्हा त्यांनी द ग्रेट स्फिंक्सला बघितलं, ज्याचं अर्ध शरीर मानवाचं आणि अर्ध शरीर प्राण्याच होत‌. असं वाटत होतं कि पिरॅमिड्सची रक्षा करण्यासाठीच त्याला बनवलं गेलं होतं. ते ज्या काळातून आले होते, म्हणजे २०१९ मध्ये अश्याप्रकारची परिपूर्ण वास्तु बांधण म्हणजे महाकठीण काम होत. इच्छा नसतानाही प्रोफेसरांना कॅप्टन गिनयू आणि त्याच्या प्रगतीशील संस्कृतीची स्तुती करावीच लागली. स्फिंक्स हा खुफू, खाफ्रे आणि मेनकाऊरे या तिन्ही पिरॅमिडच्या आधीच बनला होता.

अभिजीत: प्रोफेसर, याला स्फिंक्स का म्हणतात?

प्रोफेसर: ग्रीक संस्कृतीत एका प्राचीन स्फिंक्स नावाच्या काल्पनिक प्राण्याचा उल्लेख आहे, ज्याच अर्ध शरीर मानवाचं आणि अर्ध शरीर सिंहाच आहे. या वास्तूला त्याच प्राण्याच्या रूपात बनवलं गेलं आहे, त्यामुळे याला स्फिंक्स म्हणतात.

अचानक त्यांना वजीर होरेमहेबचा आवाज ऐकू आला. त्याने स्फिंक्सचा दरवाजा उघडला होता, जो बिलकूल स्फिंक्सच्या पायाशी होता. सर्वप्रथम वजीर होरेमहेब, नंतर प्रोफेसर आणि अभिजीत, मग इतर सैनिक स्फिंक्सच्या आत शिरले.

                                      ते सगळे ज्याच्या आत शिरले होते, ते एक छोटंसं चेंबर होतं. त्यात विशेष असे काहीच दिसत नव्हतं. प्रोफेसरांनी चारही बाजूंना नजर फिरवली आणि अचानक त्यांची नजर एका जागेवर खिळली. त्यांच्या समोर दहा-बारा पावलांच्या अंतरावर एक दरवाजा होता. त्याला भलंमोठं लोखंडी कुलूप लावले होते. त्यांनी वजीर होरेमहेबला विचारले,

"तो दरवाजा तुम्ही उघडू शकता का?"

वजीर होरेमहेब: हो, नक्कीच. पण त्या खोलीत विशेष असं काहीच नाहीये. फक्त आमच्या मागच्या फैरोंच्या ५-६ कबरी आहेत. बस.

प्रोफेसर: तरीही मला एकदा तिथे जाऊन बघायचय.

वजीर होरेमहेबने आपल्या एका सैनिकाला त्या कुलूपाची चावी आणण्याचा आदेश दिला. काही वेळातच तो चावी घेऊन हजर झाला होता. वजीर होरेमहेबने आपल्या हाताने ते कुलूप उघडले आणि दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर खूप सारी धूळ उडाली. कदाचित कित्येक दिवसांपासून तो दरवाजा असाच बंद होता. प्रोफेसर, अभिजीत, वजीर होरेमहेब आणि त्याच्या सैनिकांनी चेंबर मध्ये प्रवेश केला. वजीर होरेमहेबने म्हटल्याप्रमाणे तिथे कबरीच होत्या. प्रोफेसरांनी संपूर्ण चेंबर फिरून तपासणी केली. मात्र त्यांना थडग्यांशिवाय तिथे काहीच दिसल नाही. प्रोफेसरांनी काही वेळ विचार केला आणि अचानक त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली.

प्रोफेसर: वजीर होरेमहेब, जर तुमची आज्ञा असेल तर मी हे थडगे उघडून पाहू शकतो का?

वजीर होरेमहेबने चमकून प्रोफेसरांकडे पाहीलं. त्याच्या चेहऱ्यावरून समजत होत कि प्रोफेसरांची मागणी ऐकून त्याला आश्र्चर्य वाटल होत. अभिजीतही प्रोफेसरांच्या ह्या मागणीचा अर्थ समजू शकला नव्हता. पण प्रोफेसर विनाकारण काहीही करत नाहीत, हे माहीत असल्याने तो शांत बसला.

वजीर होरेमहेब: या राज्याच्या नियमानुसार कोणत्याही बाहेरील व्यक्तीला फैरोचे थडगे  उघडून पाहण्याचा अधिकार नाही.

प्रोफेसर: मी जाणतो. परंतु मला एक संशय आलेला आहे आणि जर तो खरा असला तर कदाचित आपण ज्याच्या शोधात आहोत ते आपल्याला मिळेल. कृपया एकदाच याची परवानगी द्या.

वजीर होरेमहेबने काही वेळ विचार केला आणि म्हणाला,

"ठिक आहे."

असं म्हणून त्याने आपल्या सैनिकांना ते थडगे उघडण्याचा आदेश दिला. आदेशाचे पालन केले गेले. पहिल थडगे उघडले. त्यात एक ममी होती. प्रोफेसरांनी पुढच्या थडग्याकडे इशारा केला. पहिल थडगे जसे होते तसे परत बंद करून सैनिकांनी दुसरे थडगे  उघडले. असं करत एकापाठोपाठ एक असे पाच थडगे उघडले गेले. पण त्या सर्वांमध्ये फक्त ममीच होत्या. आता शेवटचे थडगे बाकी राहिले होते. सैनिकांनी ते थडगही उघडलं. त्यात ममी नव्हती. खरं म्हणजे त्या थडग्यात इतका अंधार होता कि त्यात नेमकं काय आहे ते दिसत नव्हते.

प्रोफेसर: अभिजीत, टॉर्च काढ.

अभिजीतने पॉकेट मधून टॉर्च काढून प्रोफेसरांजवळ दिली. प्रोफेसरांनी टॉर्चचा प्रकाशझोत थडग्याच्या आत टाकला. त्यांना थडग्यात खाली उतरणाऱ्या पायऱ्या दिसल्या. ते तिथे उपस्थित सगळेच आश्र्चर्यचकित झाले. वजीर होरेमहेबला तर या पायऱ्यांविषयी काहीच कल्पना नव्हती.

प्रोफेसर: मला पूर्ण विश्वास आहे कि आपण ज्या गोष्टीच्या शोधात आहोत ती आपल्याला इथेच मिळेल.

अभिजीत: पण प्रोफेसर, खाली नेमकं काय आहे, याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाही. असं एकदम खाली जाण धोक्याच असू शकत.

प्रोफेसर: ते काहीही असो. पण खाली आपल्याला जावच लागेल.

वजीर होरेमहेबने पटापट आपल्या सैनिकांना मशाली पेटवण्याची आज्ञा दिली. मशाली तयार झाल्यानंतर काही सशस्त्र सैनिकांना पुढे पाठवण्यात आले. त्यांच्या मागे अभिजीत, प्रोफेसर, वजीर होरेमहेब आणि बाकी उर्वरित सैनिक अश्या क्रमाने त्या थडग्यात उतरले.

                    *********************

                                  त्या पायऱ्या उतरत उतरत त्यांना बराच वेळ लागला. अखेरीस पायऱ्या संपल्या आणि ते एका चेंबर मध्ये येऊन पोहोचले.

"हूश्श. १५ पायऱ्या होत्या."

प्रोफेसर चेंबर मध्ये येत म्हणाले. अभिजीत त्यांच्या अगोदर तिथे येऊन उभा राहिला होता आणि डोळे फाडून समोर बघत होता. प्रोफेसरांनी सुध्दा त्या दिशेने पाहिले जिकडे तो बघत होता आणि त्यांचीही तीच अवस्था झाली. कारण ते ज्या चेंबर मध्ये ते उभे होते ते साधंसुधं चेंबर नव्हतं. ती एक लॅबोरेटरी होती‌. आर्टीफिशियल इंटेलिजन्सने सुसज्जित एक प्रयोगशाळा. चारही बाजूंना सुपर कॉम्युटर्स होते. त्यांच्या माध्यमातून अनेक रोबोट्सना कंट्रोल केलं जात होतं. जितके रोबोट्स तिथे पूर्णपणे तयार झाले होते, ते त्यांच्या सारखेच इतर रोबोट्स तयार करत होते. ती एक छोटी सायन्स सिटी होती असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. वजीर होरेमहेब सुध्दा तिथे येऊन पोहोचला आणि समोरच दृश्य बघून दंग राहून गेला.
 

"हे सगळं काय आहे?"

वजीर होरेमहेब भयभीत होऊन म्हणाला. त्याने अशाप्रकारची जागा आपल्या जीवनात कधीच पाहिली नव्हती. त्याच्या ह्या प्रश्नाने प्रोफेसर भानावर आले. तेही भयभीत नजरेने ते सगळं पाहत होते. पण त्यांच्या भयाच कारण वेगळं होतं.

प्रोफेसर: हीच ती गोष्ट आहे जिचा वापर कॅप्टन गिनयू या पृथ्वीच्या विनाशासाठी करणार आहे.

अभिजीत: याचा अर्थ याच आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तो पृथ्वीचा विध्वंस करणार आहे‌.

वजीर होरेमहेबला त्यांच बोलणं एवढं समजलं नाही, मात्र त्याला एक कळलं होतं, कि हे जे काही आहे ते धोकादायक आहे. त्याचबरोबर आपल्या राज्यात परवानगी विना अशी काहीतरी विचित्र गोष्ट बनवणाऱ्या कॅप्टन गिनयूचा त्याला रागही आला होता. त्याने ताबडतोब आपल्या सैनिकांना त्या यंत्रमानवांवर आक्रमण करण्याचा आदेश दिला. हे सगळं एवढ्या जलद घडलं कि प्रोफेसरांना त्याला थांबवण्याची संधी मिळाली नाही. आदेश मिळताच सैनिक आपल्या शस्त्रांसहित रोबोट्सवर धाऊन गेले. रोबोट्सला जोडलेल्या सुपर कॉम्प्युटर्सने त्यांना धोक्याचा इशारा दिला. त्या यंत्रमानवांनी सुध्दा आपले शस्त्र काढले. त्यांच्या कडे गन्स, रॉकेट  लॉंचर्स तसेच अनेक आधुनिक शस्त्र होते, ज्यांच्यासमोर वजीर होरेमहेबच्या सैनिकांचे जुन्या काळातील भाले, तलवारी, धनुष्यबाण हे कुठेच लागत नव्हते. या जुन्या शस्त्रांचा यंत्रमानवांच्या मशिनी शरीरावर काहीच परिणाम होणार नव्हता. बघता बघता यंत्रमानवांच्या शस्त्रांनी वजीर होरेमहेबच्या अर्ध्या सैनिकांचा सफाया करून टाकला होता. त्या चेंबरला एका रणभूमीचे स्वरूप आले होते.

प्रोफेसर: वजीर होरेमहेब, तुम्ही असा आदेश नव्हता द्यायला पाहिजे. आपले सैनिक त्यांचा मुकाबला करू शकणार नाहीत. बघा,  काही क्षणांतच आपले अर्धे सैनिक धारातिर्थी पडले आहेत.

वजीर होरेमहेब: मग आता आपण काय करायला हवं.

प्रोफेसर: सर्वात आधी तुम्ही आपल्या उर्वरित सैनिकांना सोबत घेऊन या खोलीतून बाहेर जा.

वजीर होरेमहेब: आणि तुम्ही....

प्रोफेसर: वजीर होरेमहेब, आम्ही वैज्ञानिक आहोत. या यंत्रमानवांना कसं सांभाळायच ते आम्हाला चांगल माहीत आहे. तुम्ही ताबडतोब येथून बाहेर जा.

वजीर होरेमहेबने आपल्या उर्वरित सैनिकांना मागे फिरण्याचा आदेश दिला. ते सगळेजण त्या चेंबर मधून बाहेर पडले. आता तिथे फक्त प्रोफेसर आणि अभिजीतच उरले होते.

अभिजीत: प्रोफेसर, तुमच्या डोक्यात आहे तरी काय?

प्रोफेसर: हे सगळे रोबोट्स आर्टीफिशियल इंटेलिजन्स वर चालतात. हे सुपर कॉम्प्युटर्स त्यांना कंट्रोल करतात. याचाच अर्थ या कॉम्प्युटर्स मध्ये सेल्फ डिस्ट्रक्ट प्रोग्रॅम असेलच. तो प्रोग्राम ॲक्टीवेट करावा लागेल.

अभिजीत: पण याला तर वेळ लागेल.

प्रोफेसर: हो, आणि म्हणून तोपर्यंत तुला यांना सांभाळावे लागेल.

अभिजीत: काय? पण प्रोफेसर मी एकटा?

प्रोफेसर: दुसरा काही उपाय नाहीये. जर आपण सेल्फ डिस्ट्रक्ट प्रोग्रॅम ॲक्टीवेट करण्यात सफल राहीलो तर हे एका क्षणात नष्ट होईल. आणि मला माहीत आहे कि तु हे करू शकतोस.

अभिजीत: किती वेळ लागेल?

प्रोफेसर: सांगू शकत नाही. काम झाल्यावर मी सांगेलच तुला.

असं म्हणून क्षणाचाही विलंब न करता प्रोफेसर लपत छपत सुपर कॉम्युटर्सच्या सर्व्हर जवळ पोहोचले. इकडे त्या यंत्रमानवांच लक्ष आता अभिजीत कडे वळले होते. अभिजीतने पॉकेट मधून शॉक गन आणि लेजर गन काढली आणि त्या यंत्रमानवांचा सामना करण्यास तयार झाला होता.

                                          त्या यंत्रमानवांजवळ अत्यंत आधुनिक शस्त्रसामग्री होती. समोरासमोरच्या लढाईत कोणाचाही त्यांच्यासमोर टिकाव लागण जवळपास अशक्य होते. म्हणून अभिजीत त्यांच्या समोर येत नव्हता. काही वेळातच त्याच्या शॉक गन आणि लेजर गनने त्याने ५ यंत्रमानवांना निकामी करून टाकले होते. पण एवढ्या सगळ्या यंत्रमानवांना तो मात देऊ शकत नव्हता. इकडे प्रोफेसर सर्व्हरवर सेल्फ डिस्ट्रक्ट प्रोग्रॅम ॲक्टीवेट करण्याचा प्रयत्न करत होते.

अभिजीत: प्रोफेसर, अजुन किती वेळ?

प्रोफेसर: बस अजुन काही मिनिटे धीर धर. मी त्याच्या एकदम जवळ पोहोचलोय.

अचानक एका यंत्रमानवाने अभिजीतच लक्ष चुकवून आपल्या हातातील  गनचा मारा त्याच्यावर केला. अभिजीतने त्याच्या मारापासून वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र एक बुलेट त्याच्या डाव्या हातात घुसली.  तो किंचाळत खाली पडला. त्याच्या हातातून भळाभळा रक्त वाहायला लागले होते. त्याने उठून बाजूला होण्याचा प्रयत्न केला. पण अजुन एक बुलेट त्याच्या डाव्या पायात घुसली. अभिजीतने कसं बसं स्वत:ला सावरलं. पण तो जखमी झाला होता. तो अजुन जास्त त्या यंत्रमानवांशी झुंज देऊ शकत नव्हता. अचानक प्रोफेसर ओरडले,

"येस, वी डिड इट"

पण त्यांच्या ओरडण्यामुळे यंत्रमानवांच लक्ष त्यांच्याकडे वळल.

प्रोफेसर: अभिजीत, मी प्रोग्रॅम ॲक्टीवेट करतोय. आताच्या आता या इथून बाहेर पड.

अभिजीत: पण प्रोफेसर, तुम्ही?

प्रोफेसर: माझी चिंता करू नकोस. हे सगळं नष्ट होण जास्त महत्त्वाचे आहे.

अभिजीत: मी तुम्हाला एकट सोडून जाणार नाही. प्रोफेसर.

"मुर्खपणा करू नकोस अभिजीत. आताच्या आता इथून बाहेर निघ. दिड मिनिटात इथे एक स्फोट होईल आणि इथल सगळं नष्ट होईल." प्रोफेसर गरजले.

आता अभिजीत कडे दुसरा पर्याय नव्हता. तो कसाबसा उठला आणि त्या चेंबर मधून बाहेर पडला. प्रोफेसरांनी ताबडतोब प्रोग्रॅम ॲक्टीवेट केला. कारण यंत्रमानवांनी आपला मोर्चा आता त्यांच्याकडे वळवला होता. दिड मिनिटाचे टायमर सुरू झाले होते.

                                   इकडे अभिजीत थडग्यातून वर आला. त्याने एकदा थडग्यात नजर टाकली. पण प्रोफेसरांचा कुठेही मागमूस नव्हता. नाईलाजाने तो लंगडत लंगडत स्फिंक्सच्या चेंबर मधून बाहेर पडला. आणि एवढ्यात कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. जमीन हादरली. मात्र द ग्रेट स्फिंक्सच्या मुर्तीवर याचा काहीच विशेष परिणाम झाला नव्हता. फक्त मुर्तीच नाक तेवढं तुटलं होतं. अभिजीत सुन्न झाल्यासारखा तिथे बसुन राहिला. कारण प्रोफेसर बाहेर आले नव्हते आणि एवढा मोठा स्फोट झाल्यानंतर त्यांची बाहेर येण्याची शक्यताही नव्हती. स्फोटाचा आवाज ऐकून वजीर होरेमहेब तिथे धावत आला.

"काय झालं?" त्याने विचारले.

"प्रोफेसरांनी आपलं बलिदान दिले."

अभिजीत थरथरत्या आवाजात म्हणाला. त्याला पुढे बोललच जात नव्हत. इतक्यात एक हात त्याच्या खांद्यावर पडला. त्याने मागे वळून पाहिले. तिथे प्रोफेसर उभे होते.

"अरे हा विश्वंभर भारद्वाज इतक्या लवकर तुझा पिच्छा सोडणार नाही." प्रोफेसर बोलले.

त्यांच्या मुखावर चिरपरिचित हास्य होतं. त्याने प्रोफेसरांची गळाभेट घेतली. त्यानंतर वजीर होरेमहेब कडे वळून प्रोफेसर म्हणाले,

"आमचं इथलं काम झालंय. कॅप्टन गिनयूची सेना नष्ट झाली. कायमची. आता आम्हाला परत आमच्या काळात जायला हवं. तुम्ही आम्हाला जी मदत केली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार."

वजीर होरेमहेब: खरंतर आम्ही तुमचे आभार मानायला हवेत. जर तुम्ही नसतात तर त्या गिनयूच सत्य आम्हाला कधीच कळालं नसतं.

प्रोफेसर: ही तर आमच्या लढाईची सुरूवात आहे आणि ही लढाई तेव्हाच संपेल, जेव्हा कॅप्टन गिनयूचा अंत होईल. आता आपण आम्हाला आज्ञा द्यावी.

वजीर होरेमहेबने मान हलवली. प्रोफेसर अभिजीतला घेऊन तिथून निघाले. अभिजीतला वेदना होत होत्या. पण या वेदना त्या आनंदा पुढे काहीच नव्हत्या. ते पहिली लढाई जिंकले होते. रात्र होत आली होती.

अभिजीत: प्रोफेसर, आता आपण काय करायचं? टाईम मशीनच नेमकं ठिकाण आपल्याला माहीत नाही. त्याला कसं शोधायचं?

प्रोफेसर: हं. माझ्याही डोक्यात तोच प्रश्न आहे. जर माझ्याकडे माझं घड्याळ असतं तर......

अचानक अभिजीत थांबला. त्याने आपल्या पॅंटच्या खिशातून एक घड्याळ काढलं.

"प्रोफेसर, हे तुमचंच घड्याळ आहे ना."

प्रोफेसरांनी त्या घड्याळाला हातात घेतलं. त्यांचे डोळे आनंदाने चमकत होते.

प्रोफेसर: हे तुला कुठे सापडलं.

अभिजीत: मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो तेव्हा तुमच्या शोधात असतांना मला रस्त्यावर सापडलं होतं. पण तुम्हाला द्यायचं विसरलो.

प्रोफेसर: जर हे घड्याळ तू मला पहिले दिलं असतं तर टाईम मशीन केव्हाची आपल्याला सापडली असती.

अभिजीत: कस काय?

प्रोफेसर: कारण या घड्याळाला मी टाईम मशीनशी कनेक्ट केलेलं आहे. याच्या मदतीने आपण टाईम मशीन पर्यंत पोहोचु शकतो.

अभिजीत: प्रोफेसर, तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली.

प्रोफेसर: अरे बाबा, तुला सांगायचं विसरलो मी.

अभिजीत: पण प्रोफेसर, पहिल ठिकाण आपण नष्ट केलं. पण बाकीच्या ठिकाणांची माहिती आपल्याला कशी मिळणार?

प्रोफेसर: तुला आठवत आपल्याला डेड सी स्क्रॉल्स बरोबर अजुन एक छोटं  स्क्रॉल मिळालं होतं?

अभिजीत: हो.

प्रोफेसर: मला पूर्ण खात्री आहे कि त्याच स्क्रॉल मध्ये आपल्याला दुसऱ्या ठिकाणाचा क्लू मिळेल. फक्त आपल्याला त्या कोड लॅंग्वेजला ब्रेक कराव लागेल.

असं म्हणून प्रोफेसरांनी घड्याळावरील एक बटन दाबले. त्याक्षणी त्या घड्याळाच्या स्क्रिनवर एक बाण दिसायला लागला.

"माझ्या मागे ये."

असं म्हणून प्रोफेसर त्या बाणाने दाखवलेल्या दिशेने चालू लागले. अभिजीत त्यांच्या मागे निघाला.

                                 ते दोघेही बराच वेळ चालत होते. अचानक तो घड्याळ्याच्या स्क्रीनवरील बाण गायब झाला. प्रोफेसरांनी इकडे तिकडे नजर फिरवली आणि त्यांना डाव्या बाजूला टाईम मशीन दिसली. प्रोफेसर आणि अभिजीत तिच्याजवळ पोहोचले. मशीन त्याच अवस्थेत होती. ज्या अवस्थेत ते तिला सोडून गेले होते. टाईम मशीनची स्क्रीन पूर्ण ब्लॅंक होती.

"आपल्याला मशीनला रिसेट करावं लागेल."

असं म्हणून त्यांनी स्क्रिनच्या वरच्या बाजूला असलेल पिवळ बटन दाबले. एक बीप सारखा आवाज आला. टाईम मशीन रिसेट झाली होती. दोघेही टाईम मशीन मध्ये बसले. प्रोफेसरांनी पटापट स्क्रिनवर जंगलातील आपल्या लॅबच लोकेशन टाकलं. टाईम टाकला आणि तारीख आणि वर्ष टाकलं आणि गो च बटन दाबले. सर्वत्र निळा प्रकाश पसरला आणि आवाज करत टाईम मशीन गायब झाली.

                      ********************

                                   टाईम मशीन त्यांच्या त्या जंगलातील लॅब मध्ये प्रकट झाली होती. दोघेही टाईम मशीन मधून बाहेर आले. दोघेही खूप थकले होते. पण थकवा त्यांना जाणवत नव्हता. कारण एक रोमांचक ॲडव्हेंचर करून आले होते. त्यांच्या जीवनाला एक लक्ष्य मिळालं होतं.

"मला आता घरी जायला हवं, प्रोफेसर. मी निघतो." अभिजीत म्हणाला.

प्रोफेसर: थांब अभिजीत, तु जखमी आहेस. मला वाटतं तु आजची रात्र इथेच रहावस.

"नको प्रोफेसर, तुम्हाला अजुन बरेच काम असतील ना. या जखमांना मी सांभाळून घेईल." अभिजीत हसत म्हणाला.

प्रोफेसरांना त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला. ते 3 डायमेन्शनल पॉकेट कडे आले, जे अभिजीत तिथेच ठेऊन गेला होता. त्या पॉकेट मध्ये हात घालून त्यांनी ते छोटं स्क्रॉल काढलं, ज्यात अनाकलनीय आकृत्या होत्या. त्यांनी आपले मॅग्निफायर (भिंग) घेतल आणि त्या आकृत्यांच निरिक्षण करू लागले......

               *********************

                                    कॅप्टन गिनयू आपल्या स्पेसशिप मध्ये बसला होता. त्याची इजिप्त मधील आर्टीफिशियल इंटेलिजन्सची सिस्टीम नष्ट केल्याची आणि डेड सी स्क्रॉल्स त्यांच्या हाती लागल्याची बातमी त्याच्या पर्यंत पोहोचली होती. त्याला विश्वास होत नव्हता कि दोन तुच्छ मानवांनी त्याच्या एका  फुलप्रूफ प्लॅनचे बारा वाजवले होते. आणि त्यात डेड सी स्क्रॉल्स त्यांच्या हाती लागले होते. म्हणजे त्यांना पुढील ठिकाणाची माहिती सुध्दा मिळू शकते. तसं ते कोड लॅंग्वेज मध्ये असल्याने त्यांना आता लगेच ते ब्रेक करता येणार नाही. पण त्याला रिस्क नव्हती घ्यायची.

"झेऊरला बोलावून आण. ताबडतोब." त्याने हुकूम सोडला.

एक सैनिक पळत पळत बाहेर गेला. काही वेळातच धष्टपुष्ट दिसणाऱ्या व्यक्तीने आत प्रवेश केला. त्याचा चेहरा एकदम भयानक होता.

"आपण मला बोलावलं, कॅप्टन." झेऊर घोगऱ्या आवाजात म्हणाला.

कॅप्टन गिनयू: झेऊर, मी तुझ्यावर एक काम सोपवतोय.

झेऊर: आज्ञा करा, कॅप्टन.

कॅप्टन गिनयूने संपूर्ण काम समजावून सांगितले.

झेऊर: तुम्ही निश्चिंत रहा, कॅप्टन. मी जिवंत असेपर्यंत त्या ठिकाणापर्यंत कोणीही पोहोचु शकणार नाही.

कॅप्टन गिनयू: तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आताच निघ.

कॅप्टन गिनयूला अभिवादन करून झेऊर तिथून निघून गेला.

कॅप्टन गिनयूच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य विलसत होतं.

                       खंड पहिला समाप्त

                    ***********************

टाईम ट्रॅव्हल खंड दुसरा मिस्ट्री ऑफ अटलांटिस लवकरच प्रकाशित करण्यात येईल.

                           संदर्भ

The complete pyramids- solving the ancient mysteries by Mark lehner

The pyramids of Giza by Charles and Linda George

The pyramids and the Pentagon by Nick Redfern

The orion mystery by Robert bauval and Adrian Gilbert

The secret chamber of Osiris by Scott Creighton and Rand flem ath