Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ९

अॅंड्र्यूच्या बोलण्यावर  दोघांनाही विश्वास बसत नव्हता. प्रोफेसरांनी अभिजीतला जोराचा चिमटा काढला. अभिजीत जीवाच्या आकांताने ओरडला,

"आआआह, प्रोफेसर काय करताय?"

प्रोफेसर: म्हणजे हे स्वप्न नाही तर.

अॅंड्र्यू: नाही हे अजिबात स्वप्न नाही सत्य आहे.

प्रोफेसर डोळे फाडून त्या प्राचीन ईजिप्शियन तुरूंगाला बघत होते. ज्याच्या बद्दल आधुनिक जगात कुठेही फारशी माहिती उपलब्ध नव्हती. मात्र अभिजीतच्या डोक्यात वेगळेच विचार घर करत होते. त्याची नजर त्याच्या समोर उभ्या असलेल्या आणि २२ व्या शतकातून आलेल्या त्या रहस्यमयी माणसाला न्याहाळत होती. अॅंड्र्यूने अजून स्वत: बद्दल काहीच सांगितलं नव्हतं. त्यामूळेच अभिजीतच्या डोक्यात त्याच्या बद्दल संशयाचा किडा वळवळत होता. शेवटी न राहवून अभिजीतने त्याला विचारलच,

"पण तु हे नाही सांगितलंस कि तु इथे का आणि कसा आलास? तुझी टाईम मशीन सुध्दा खराब झाली होती का?"

अॅंड्र्यू: नाही. नाही. मी इथे एका महत्त्वाच्या कामासाठी आलोय.

अभिजीत: कोणत काम?

अॅंड्र्यू: सॉरी, ते मी आता नाही सांगू शकत. जर मला पुढे कधी सांगावस वाटल तर सांगेल. तसं सध्या आपल्याला ह्या जेलमधून बाहेर पडायचा विचार करायला हवा.

अभिजीत: पण आपण इथून बाहेर कसं पडणार? इथे तर कुठेच दरवाजा दिसत नाहीए‌. फक्त भिंतीच आहेत.

अॅंड्र्यू: मला पक्का विश्वास आहे कि दरवाजा इथेच कुठेतरी भिंतींमध्ये लपलेला आहे.

अभिजीत: एक सिक्रेट दरवाजा. मला नवल वाटत कि या प्राचीन ईजिप्शियन लोकांकडे इतकी टेक्नॉलॉजी आली कुठून?

अॅंड्र्यू: तुला खरंच असं वाटतं कि हे पिरामिड्स प्राचीन ईजिप्शियन लोकांनी बनवले आहेत?

अभिजीत: म्हणजे काय म्हणायचय तुला?

अॅंड्र्यू: कळेल लवकरच.

एवढ्यात प्रोफेसरही त्यांच्या चर्चेत सहभागी झाले,

"या तुरूंगाच्या चारही भिंती या लाईमस्टोनने म्हणजेच चुनखडीच्या दगडांनी बनलेल्या आहेत. लाईमस्टोन हा एक सॉफ्ट स्टोन असतो. ज्याला कापणं सोपं असतं आणि त्याचा कापतांना आवाजही होत नाही. फक्त प्रॉब्लेम असा आहे कि त्याला कापण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही."

अॅंड्र्यू: ओह शीट, माझ्याकडून इतकी मोठी चूक कशी होऊ शकते. प्रोफेसर, यु आर जिनियस.

असं म्हणून त्याने त्याच्या खांद्याला लटकलेल्या छोट्या पॉकेट मधून लांब धारदार करवतीसारखी वस्तु काढली. ती वस्तु त्याने लाईमस्टोनच्या भिंतीत खुपसली आणि गोल फिरवली. आरामात एक माणूस जाऊ शकेल असा रस्ता त्या भिंतीत तयार झाला होता. हे सर्व अभिजीत आणि प्रोफेसर आश्चर्यचकित होऊन बघत होते.

अॅंड्र्यू: आपण स्वतंत्र झालो. चला.

अॅंड्र्यू त्या भगदाडातून बाहेर आला. त्याच्या  मागे अभिजीत आणि प्रोफेसरही बाहेर पडले. सुदैवाने ते ज्या भागातून बाहेर पडले होते तेथे कोणीही पहारेकरी नव्हता. त्यामूळे ते आरामात हळूहळू चालत होते. अॅंड्र्यू सर्वात पुढे अत्यंत सावधपणे सगळीकडे नजर ठेवून चालत होता. त्याच्यामागे प्रोफेसर चारी बाजुला आश्चर्याने पाहत चालत होते. ते कधीच पिरामिडच्या इतक्या आत मध्ये आले नव्हते. सर्वात शेवटी अभिजीत चालत होता. मात्र त्याचा अॅंड्र्यू बद्दलचा संशय अजुनही गेला नव्हता. त्याने अचानक प्रोफेसरांना थांबवलं.

प्रोफेसर: काय रे काय झालं? का थांबवलस?

अभिजीत: मला ह्या अॅंड्र्यूवर संशय आहे.

प्रोफेसर: कसला संशय?

अभिजीत: म्हणजे बघा ना. तो कोण आहे, कुठून आला आहे, का आला आहे, कोणी पाठवलंय. याबद्दल त्याने आपल्याला काहीच सांगितलं नाही. उलट आपल्याकडून सगळी माहिती काढून घेतली. मला हा माणूस गडबड वाटतोय.

प्रोफेसर: अरे त्याला जर काही करायचच असतं तर आधीच नसतं का केलं?

अभिजीत: पण प्रोफेसर....

इतक्यात अॅंड्र्यू तिथे येऊन पोहोचला.

"तुम्ही दोघे इथे काय करताय. आपल्याकडे मुळीच वेळ नाहीये. चला लवकर."

तिघेही जण पुढे चालू लागले होते. ते ज्या रस्त्याने जात होते तो एक अरूंद रस्ता होता. अचानक अॅंड्र्यू थांबला. त्याने त्या दोघांना लपण्याचा इशारा केला. तिघेही तिथेच एका भिंतीच्या आडोशाला आवाज न करता उभे राहिले. त्यांच्या अगदी जवळून एक माणूस हातात भाला घेऊन निघून गेला. त्या माणसाला पाहील्यावर अभिजीतच्या लक्षात आलं कि ह्या माणसाने सुध्दा तेच कपडे घातले आहेत, जे त्याच्यावर आणि प्रोफेसरांवर हल्ला करणार्यांनी घातले होते. अॅंड्र्यूने पुन्हा त्या दोघांना चलायला सांगितलं.

                        काही वेळ चालल्यावर ते एका ठिकाणी थांबले. ती एक मोठी खोली होती. ते तिघेही आत गेले.

अभिजीत: हे कुठे आलो आपण?

अॅंड्र्यू: हे एक चेम्बर आहे. पिरामिड मध्ये असे असंख्य सीक्रेट चेम्बर्स आहेत.

अभिजीत: पण तुझा इथे येण्याचा हेतू काय आहे?

अॅंड्र्यूने एक दिर्घ श्वास घेतला.

अॅंड्र्यू: तु मला विचारलं होतस ना कि मी इथे काय काम करायला आलोय म्हणून.

अभिजीत: हो.

अॅंड्र्यू: खरंतर मी जे काम करायला आलोय. ते एक टॉप सीक्रेट आहे आणि मी याचा उल्लेख कोणाजवळही करायला नको. मात्र माहीत नाही का मला असं वाटतंय कि तुम्ही दोघे माझी या कामात खूप मदत करू शकता. कारण माझ्या या कामाच्या यशापशावर पृथ्वीचं पुढचं भविष्य अवलंबून आहे.

अभिजीत: तु जरा आम्हाला कळेल अश्या भाषेत बोलशील का?

अॅंड्र्यू: हे बघा. आता मी जे तुम्हाला सांगतोय त्याचावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. कारण हे खूप अनाकलनीय आहे. हे असं होऊ शकतं याचा कधी तुम्ही स्वप्नातही विचार केला नसावा.

अभिजीत: ए बाबा, प्रस्तावना बस झाली आता. सरळ मुद्द्यावर ये ना.

अॅंड्र्यू: हे पिरामिड प्राचीन ईजिप्शियन लोकांनी नव्हते बांधले.

अभिजीत: मग कोणी बांधले होते?

अॅंड्र्यू: दुसऱ्या ब्रम्हांडातून आलेल्या लोकांनी....

                                                    क्रमशः