Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १३

.... अभिजीत आणि प्रोफेसर दोघांनाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यांनी समोरासमोर एलियन्सला बघितलं होतं. 



अभिजीत: हेच ते एलियंस आहेत का?



अॅंड्र्यू: हो.



अभिजीत: पण हे तर हुबेहूब आपल्यासारखीच आय मीन माणसांसारखेच दिसतात.



अॅंड्र्यू: हो, मग मी सांगितलं ना कि ही दुसऱ्या ब्रम्हांडातील मानवी प्रजाती आहे. एलियंसचा अर्थ होतो, परग्रहावरील प्रजाती. म्हणजे त्यात कोणीही येऊ शकतो, एखादा माणूस, प्राणी किंवा सुक्ष्मजीव. 



अभिजीत: पण तुला खरंच वाटत कि हे लोक पृथ्वीवर राज्य करू शकतील.



अॅंड्र्यू: त्यांनी तसं केलय. भविष्यात. मी त्याच भविष्यातूनच तर आलोय आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो. ह्याच कॅप्टन गिनयूने पृथ्वीवर येण्याआधी दोन ब्रम्हाडांवरील जीवसृष्टी नष्ट केलेली आहे.



अभिजीत आणि प्रोफेसर: काय?



अॅंड्र्यू: हो. आणि आता त्याला आपल्या ह्या ब्रम्हांडावर विजय मिळविण्यासाठी पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठीच तो इथे आला आहे.



प्रोफेसर: पण जर ते दोन ब्रम्हांडांना संपवण्याएवढे ताकदवान आहेत, तर आपण त्यांच्याशी लढाई कशी काय करू शकतो?



अॅंड्र्यू: खरंतर आपल्याला त्यांच्याशी समोरासमोर लढाई करायचीच नाहीये. 



अभिजीत: मग?



अॅंड्र्यू: हे बघा, या पृथ्वीवर सात ठिकाणी या लोकांनी अशी काहीतरी गोष्ट लपवून ठेवली आहे, जी या पृथ्वीवर विनाश करण्यासाठी त्यांची मदत करेल. आपल्याला ते सात ठिकाणांवरील त्या गोष्टींना नष्ट करायचे आहे. त्यामुळे भविष्यात जेव्हा ते पृथ्वीवर हल्ला करतील तेव्हा त्यांची ताकद कमी असेल, मग आपण त्यांना आरामात हरवू शकतो.



अभिजीत: पण ते सात ठिकाणे आहेत कोणते?



अॅंड्र्यू: पहील ठिकाण तर हेच आहे. इजिप्तचे पिरामिड्स. बाकीचे सहा ठिकाण आपल्याला तेव्हाच कळतील, जेव्हा आपल्या हातात डेड सी स्क्रॉल्स असेल.



प्रोफेसर: पण मग आता तुझा काय प्लान आहे?



अॅंड्र्यू: सर्वात आधी आपल्याला कॅप्टन गिनयू कडून हे माहीत करावं लागेल कि डेड सी स्क्रॉल्स कुठे आहे. त्यानंतरच आपण पुढचा प्लान बनवू शकतो.



अॅंड्र्यूने अभिजीतला त्याचा प्लान समजावून सांगितला आणि प्रोफेसरांकडे वळून तो म्हणाला,



"प्रोफेसर, तुम्ही माझ्यासोबत या."



असं म्हणून अॅंड्र्यूने पिरामिडचा नकाशा असलेल ते गोल डिव्हाईस अभिजीतच्या हातात दिलं.  आणि प्रोफेसरांना घेऊन निघून गेला. 



                              अभिजीतही त्याला सांगितल्याप्रमाणे पिरामिडच्या आत घुसला. अचानक त्याला काही पहरेकरी हातात सोन्या-चांदीचे उपहार, खाण्याच सामान अश्या  अनेक वस्तू घेऊन जाताना दिसले. अभिजीतही चुपचाप त्यांच्या गर्दीत सामील झाला. बराच वेळ ते चालत होते. त्यात त्यांनी अनेक वळण घेतले, बरेच चेम्बर पार केले. नव्या माणसासाठी हा रस्ता लक्षात ठेवणं महाकठीण काम होत. म्हणूनच अॅंड्र्यूने ते डिव्हाईस अभिजीतला दिलं होतं. त्या डिव्हाईस मध्ये तो रस्ता रेकॉर्ड होत राहील. बराच वेळ चालल्यावर ते सगळे जण एका चेम्बर समोर थांबले. ते चेम्बरही किंग्ज चेंबर इतकंच मोठं होतं. सगळेजण एक एक करून त्या चेंबर मध्ये शिरले. अभिजीत सर्वात शेवटी आत गेला आणि एका कोपऱ्यात चुपचाप उभा राहिला.



                            कॅप्टन गिनयू एका सिंहासनावर बसला होता. त्याच्या आजुबाजूला त्याचे सेवक उभे होते. वजीर होरेमहेब त्याच्या आतिथ्याकडे जातीने लक्ष देत होता. एक एक पहारेकरी आपल्या हातातील वस्तू कॅप्टन गिनयू समोर ठेवत होता. आणि कॅप्टन गिनयूही एक हात उंचावून त्याचा स्वीकार करत होता. सगळ एकदम शांततेत चालू होत. अगदी पिन ड्रॉप सायलेन्स होता. सगळ्या वस्तु ठेवून झाल्यानंतर वजीर होरेमहेबने सर्व पहारेकऱ्यांना तिथून जाण्याचा इशारा केला. सगळे पहारेकरी तिथून एक एक करून बाहेर निघत होते. कॅप्टन गिनयू कडून डेड सी स्क्रॉल्सची माहीती कशी काढायची याचा विचार करत असतांनाच अचानक एका पहारेकऱ्याचा जोराचा धक्का अभिजीतला लागला. त्या धक्क्याने अभिजीतच्या हातातून ते गोल डिव्हाईस खाली पडलं आणि जोरात आवाज झाला. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष तिकडे वेधले गेले. तिथे उपस्थित एकाही व्यक्तिने ती गोल वस्तु पहीले कधीच पाहिली नव्हती. त्यामुळे सगळे जण कधी अभिजीत कडे तर कधी त्या गोल डिव्हाईस कडे बघत होते. ‌

अभिजीतने पटकन ते डिव्हाईस उचलून घेतले. वजीर होरेमहेबच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. त्याचा दांडगा आवाज पूर्ण चेंबर भर घुमला,


"कोण आहेस तु"?


एव्हाना अभिजीतला कळालं होतं कि तो खूप मोठ्या संकटात सापडला आहे. आता इथून पळून जाण्यातच भलं आहे असा विचार करून तो तिथून जाण्यास निघाला. अचानक वजीर होरेमहेबने आपल्या सैनिकांना आदेश दिला,


"सैनिकांनो, पकडा त्याला"?


त्याबरोबर अनेक सशस्त्र सैनिकांनी अभिजीतला वेढा घातला. आता अभिजीतने मनातल्या मनात देवाचा धावा चालू केला होता. ते सैनिक हळूहळू भाले तलवारी घेऊन अभिजीतच्या दिशेने सरकत होते. अचानक एक आवाज आला,


"थांबा."


सगळ्यांनी वळून पाहिले. कॅप्टन गिनयू सगळ्यांना थांबण्याचा इशारा करत होता. तो म्हणाला,


"वजीर होरेमहेब, कृपया तुम्ही आपल्या सैनिकांना घेऊन बाहेर जा. मला त्या व्यक्तिशी बोलायचय."


वजीर होरेमहेब: परंतु त्याने आपल्याला काही नुकसान पोहोचवल तर महान फैरो आम्हाला सोडणार नाहीत.


कॅप्टन गिनयू: चिंता करू नका. आम्हाला काही होणार नाही. 


कॅप्टन गिनयूने स्वत:च्या सहकाऱ्यांना सुध्दा बाहेर जाण्याची आज्ञा दिली. एक एक करून सर्व जण त्या चेंबर मधून बाहेर पडले. आता तिथे फक्त कॅप्टन गिनयू आणि अभिजीत दोनच जण उरले होते. कॅप्टन गिनयू आपल्या सिंहासनावरून खाली उतरला आणि अभिजीत जवळ येऊन उभा राहिला.


"मला माहीत आहे कि तु या सैनिकांमधला नाहीस. घाबरून नकोस. मी काहीच करणार नाही. पण तुला मला सगळं खरं सांगावं लागेल. तु कोण आहेस? कुठून आला आहेस? का आला आहेस? जर तु सगळं सांगितलंस तर मी तुला सोडून देईन. नाहीतर..."


आता मात्र अभिजीत समोर मोठाच पेच प्रसंग होता. जर खर नाही सांगितलं तर त्याच्या जिवाला धोका होता, आणि खरं सांगितलं तर त्यांचा प्लान फेल होण्याची शक्यता होती. शेवटी बराच विचार केल्यावर अभिजीतने एक निर्णय घेतला. अर्धसत्य सांगण्याचा!


कॅप्टन गिनयू: मग काय ठरवलस.


अभिजीत: मी सगळं खरं खरं सांगतो.


कॅप्टन गिनयू: गुड. पण एक मिनिट थांब.


असं म्हणून कॅप्टन गिनयू आपल्या सिंहासना जवळ आला. तिथे भलीमोठी पेटी होती. ती पेटी उघडली. त्यातून एक हेल्मेट काढल आणि आपल्या डोक्यावर घातल. ते हेल्मेट अतिशय विचित्र होते. त्या हेल्मेटच्या वरच्या बाजूला दोन मोठे अॅंटीना होते, हेल्मेटवर  हिरवे, लाल, निळे आणि पिवळ्या रंगाचे चार बटणं होते, जसं कि ते एक मशीनच होतं.


"हं आता सांग."


अभिजीत: माझ नाव अभिजीत. मी २२ व्या शतकातून आलो आहे. आणि मी इथे आलो आहे ते तुला रोखण्यासाठी. हो, भविष्यात पृथ्वीवर राज्य करण्याचे स्वप्न बघतोयस ना तु. पण मी असं होऊ देणार नाही. मी असेपर्यंत तु पृथ्वीवर काय, या इजिप्तवरही राज्य करू शकणार नाही.


कॅप्टन गिनयू: तु एकटाच आहेस. कि तुझ्यासोबत आणखी कोणी आहे?


अभिजीत: नाही. मी एकटाच आहे. माझ्यासोबत कोणीही नाही.


अभिजीत स्वत:च्या बुध्दिमत्तेवर खूश होत होता. त्याने अर्ध खरं आणि अर्ध खोटं सांगितलं होतं. जेणेकरुन त्याला जर काही झाल, तर प्रोफेसर आणि अॅंड्र्यू ते काम पूर्ण करू शकतील ज्याचा त्यांनी प्लान बनवला होता. मात्र अभिजीत एक गोष्टीपासून अनभिज्ञ होता. कॅप्टन गिनयूने जे हेल्मेट घातले होते, त्यात एक टेक्नॉलॉजी होती, समोरचा खरं बोलतोय कि खोटं हे त्या हेल्मेट मधील टेक्नॉलॉजी मुळे हेल्मेट घालणाऱ्याला कळायचं. कॅप्टन गिनयूलाही हे समजलं होतं कि अभिजीत खोटं बोलतोय. तो अभिजीत जवळ येऊन उभा राहिला. त्याने अभिजीत कडे पाहून एक स्मितहास्य केले आणि आपल्या हेल्मेट वरील लाल रंगाचे बटण दाबले. त्या हेल्मेटच्या अॅंटीना मधून एक सुक्ष्म विजेचा प्रवाह बाहेर पडला. तो विजेचा प्रवाह अभिजीतच्या डोक्याला लागला.  त्याला  डोक्याला झिणझिण्या आल्या आणि अचानक तो पुतळ्या सारखा उभा राहिला. कॅप्टन गिनयूच स्मितहास्य आता क्रूर हास्यात बदललं होतं. तो हळूच बोलला,



"अभिजीत."



अभिजीत: येस बॉस.



कॅप्टन गिनयू: तु आता माझा गुलाम आहेस. मी जसं सांगेन तसंच तु वागणार.



अभिजीत: मी आपला गुलाम आहे, बॉस.



"शाबास." असं म्हणून कॅप्टन गिनयूने एक छोटी चिप त्याच्या अंगावर लावली. आता अभिजीत जिथेही जाईल, ते कॅप्टन गिनयूला त्याच्या कॉम्प्युटर वर दिसणार होतं.



कॅप्टन गिनयू: ठिक आहे. आता जा. आणि माझ्या ऑर्डरची वाट बघ.



"येस बॉस." एवढं बोलून अभिजीत तिथून निघाला.



                                                             क्रमशः