Android app on Google Play

 

हास्य खळखळून जगवा

 

हास्य खळखळून जगवा...

उगवत्या सूर्याच्या स्वागतासाठी...

उमलणाऱ्या कळीच्या दर्शनासाठी...

भळभळत्या जखमांना 

शांत करण्यासाठी...

निर्जीव होणाऱ्या ह्रदयात

 प्रीत जागवण्यासाठी...

हास्य खळखळून जगवा...


हास्य फुलते ह्रदयातून...

कधी नुसतेच ओठातून...

कधी स्वतःच्या सुखातून...

कधी स्वतःच्याच दुःखातून...

दुसऱ्याच्या समाधानासाठी 

तरी हास्य खळखळून जगवा...

  

काय माहीत उद्याचा 

काळ कसा असेल ...?

माणसातं माणुसकीचा

 दुष्काळ असेल...

कासवही कपटाने कदाचित

 जग जिंकायला निघेल...

सारं जगचं स्वार्थी असेल कदाचित...

त्या स्वार्थाला निवळण्यासाठी...

स्वतःतील माणुसकीला

 जपण्यासाठी...

हास्य खळखळून जगवा...


उद्या आपलेच होतील परके...

स्वतःचे रक्तही करेल

 आपल्याविरुद्ध बंड...

भावना जळून जातील

 विश्वासघाताच्या आगीत...

मनाच्या असंख्य चक्षूतून 

 पाझरतील अश्रुधारा...

ह्रदयही करेल मूक 

आक्रंदन जेव्हा...

सांत्वन करण्यासाठी तरी

 हास्य खळखळून जगवा...

हास्य खळखळून जगवा....  


©®

*त्रिशिला साळवे*

*९९२२३६३६२८*