माझी कामाठीपुर्यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..!
*तात्या अभ्यंकर*
१९९१-९२चा सुमार. मी तेव्हा नौकरी करत होतो.. फोरास रोडवरील झमझम नावाच्या सरकारमान्य देशी दारूच्या बारमध्ये..क्यॅशियर कम म्यॅनेजर होतो मी..आजूबाजूला सारी वेश्यावस्ती, दारुवाले, मटकेवाले, पोलिस, गुंड.. यांचंच सारं राज्य.. आयुष्यात एक से एक अनुभव आले त्या दुनियेत. कधी सुखावणारे, कधी दुखावणारे, कधी विचार करायला लावणारे, काही चित्र, काही विचित्र, काही नैसर्गिक, काही अनैसर्गिक..अस्वस्थ करणारे..आजूबाजूला अनेक प्रसंग रोजच्या रोज घडत होते.. स्वाभाविक, अस्वाभाविक..पण प्रत्येक प्रसंग एक अनुभव देऊन गेला..
बारमध्ये असंख्य प्रकारची माणसं येत.. रोजचे नियमित-अनियमित बेवडे हजेरी लावायचेच..त्याशिवाय रोज एखादी 'काय अभ्यंकर, सगळं ठीक ना? काय लफडा नाय ना?" असं विचारणारी नागपाडा पोलिस स्टेशनच्या कदम हवालदाराची किंवा त्याच्या सायबाची फेरी.. मग कुठे बरणी उघडून फुकट चकली खा, चा पी असं चालायचं.. कधी हलकट मन्सूर किंवा अल्लाजान वेश्यांकरता भूर्जी, आम्लेट, मटन सुका, खिमापाव असं काहीबाही पार्सल न्यायला यायचे.. कधी अफूबाज, चरसी डब्बल ढक्कन यायचा..कधी बोलबोलता सहज सुरा-वस्तरा चालवणारे हसनभाय, ठाकूरशेठ सारखे गुंड चक्कर काटून जायचे.. "क्यो बे तात्या, गांडू आज गल्ला भोत जमा हो गया है तेरा.. साला आजकल बंबैकी पब्लिकभी भोत बेवडा हो गएली है..साला, एक हज्जार रुप्या उधार दे ना." असं म्हणून मला दमात घ्यायचे..
कधी त्या वस्तीत धंदा करणारे हिजडे यायचे.. उगीच कुठे ठंडा, किंवा अंडापाव, असंच काहीबाही पार्सल न्यायला यायचे.. 'ए तात्या... म्येरा पार्सल द्येव ना जल्दि.. कितना मोटा है तू..' अश्या काहितरी कॉमेन्टस करत माझ्या गल्ल्याशी घुटमळत..मी त्रासाने हाकलून द्यायला लागलो की काडकन टाळी वाजवून 'सौ किलो..!' असं मला मिश्किलपणे चिडवायचे! अक्षरश: नाना प्रकारची मंडळी यायची त्या झमझम बारमध्ये आणि केन्द्रस्थानी तात्या अभ्यंकर!
गणपतीचे दिवस होते.. रस्ता क्रॉस केल्यावर आमच्या बारच्या समोरच्याच कामाठीपुर्यातल्या कोणत्याश्या (११ व्या की १२ व्या? गल्ली नंबर आता आठवत नाही..) गल्लीत हिजड्यांचाही गणपती बसायचा. हो, हिजड्यांचा गणपती! वाचकांपैकी बर्याच वाचकांना कदाचित ही गोष्ट माहीत नसेल. परंतु मुंबैच्या कामाठीपुर्यात अगदी हिजड्यांचाही गणपती बसतो.. साग्रसंगीत त्याची पूजा केली जाते.. कामाठीपुर्यात काही तेलुगू, मल्लू भाषा बोलणारे, तर काही उत्तरप्रदेशी हिजडे आहेत ते दरसाल गणपती बसवतात.. बरेचसे मुस्लिम हिजडेही त्यात आवर्जून सहभाग घेतात..
झमझम बारचा म्यॅनेजर म्हणून मला आणि आमच्या बारच्या सार्या नौकर मंडळींना त्या हिजड्यांचं सन्मानपूर्वक बोलावणं असायचं.. 'तात्यासेठ, गनेशजीको बिठाया है.. 'दरसन देखने आनेका.. खाना खाने आनेका..' असं आग्रहाचं बोलावणं असायचं..! अल्लाजान मला घेऊन जायचा त्या गणेशोत्सवात..
संध्याकाळचे सात वाजले असतील.. मी गल्ल्यावर होतो..पूजाबत्ती करत होतो. तेवढ्यात अल्लाजान मला बोलवायला आला.. "गनेशके दरसन को चलनेका ना तात्यासेठ?"
मी दिवाबत्ती केली.. अर्जून वेटरला गल्ल्याकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि हिजड्यांच्या गणपतीच्या दर्शनाला अल्लाजानसोबत निघालो. कामाठीपुर्याच्या त्या गल्लीत गेलो.. खास दक्षिणेकडची वाटावी अशी गणेशमूर्ती होती.. नानाविध फुलं, मिठाई, फळफळावळ, थोडे भडक परंतु सुंदर डेकोरेशन केलेला हिजड्यांचा नानाविध अलंकारांनी नटलेला 'अय्यप्पा-गणेश' स्थानापन्न झाला होता.. एका म्हातार्या, स्थूल व टक्कल पडलेल्या हिजड्यानं माझं स्वागत केलं.. तो त्यांचा म्होरक्या होता. बसायला खुर्ची दिली.. झमझम बारचा म्यॅनेजर तात्याशेठ! म्हणून मोठ्या ऐटीत माझी उठबस त्या मंडळींनी केली.. अगदी अगत्याने, आपुलकीने..!
हिजड्यांबद्दल काय काय समज असतात आपले? परंतु ती देखील तुमच्याआमच्यासारखी माणसंच असतात.. आपल्यासारख्याच भावभावना, आवडीनिवडी, रागलोभ असतात त्यांचे.. ते हिजडे कोण, कुठले, या चर्चेत मला शिरायचं नाही. ते धंदा करतात एवढं मला माहित्ये. चक्क शरीरविक्रयाचा धंदा.. पोटाची खळगी भरणे हा मुख्य उद्देश. आणि असतातच की त्यांच्याकडेही जाणारी आणि आपली वासना शांत करणारी गिहाईकं! कोण चूक, कोण बरोबर हे ठरवणारे आपण कोण?
मला सांगा - एखाद्या सिने कलाकाराने म्हणा, किंवा अन्य कुणा सेलिब्रिटीने म्हणा, दगडूशेठला किंवा लालबागच्या राजाला भेट दिल्यानंतर त्याचं होणारं आगतस्वागत आणि कामाठीपुर्यातल्या हिजड्यांच्या गणेशोत्सवाला तिथल्याच एका देशीदारूच्या बारच्या तात्या अभ्यंकराने भेट दिल्यावर हिजड्यांनी त्याच आपुलकीनं त्याचं केलेलं आगतस्वागत, यात डावंउजवं कसं ठरवायचं?
लौकरच एक अतिशय स्वच्छ प्लेट आली माझ्या पुढ्यात. वेफर्स, उतम मिठाई, केळी, चिकू, सफरचंद इत्यादी फळांच्या कापलेल्या फोडी, दोनचार उत्तम मावा-बर्फी, काजुकतलीचे तुकडे..!
तो म्हातारा हिजडा मोठ्या आपुलकीनं आणि प्रेमानं मला म्हणाला..
"मालिक, थोडा नाष्टा करो.."
"बादमे तुम्हे हमारा गणेशका पूजा करना है. और बादमे खाना भी खानेका..!"
बापरे..! 'मला यांच्या गणपतीची पुजा करायच्ये?' मला काही खुलासा होईना.. 'बघू नंतर काय होईल ते होईल, आपण आपली पुढ्यातली ही डिश खाऊन काहितरी कारण सांगून सटकू इकडनं..' अस ठरवून मी समोरच्या बर्फीचा एक तुकडा तोंडात टाकला.. सुरेखच होती बर्फी.. अगदी ताजी!
समोरच्या डिशमधलं थोडंफार खाल्लं मी. जरा वेळ तसाच तिथे बसून राहिलो. 'आता दर्शन घ्यायचं आणि निघायचं' असा मनाशी विचार केला आणि उठलो.. तोच तो मगासचा टकल्या हिजडा आणि इतर दोघेचौघे हिजडे पुढे सरसावले. त्यापैकी एकाच्या हातात मोठासा स्वच्छ नॅपकीन!
"आओ तात्यासेठ, अब न्हानेका और पूजा करनेका..!"
न्हानेका और पूजा करनेका? मला काहीच समजेना. अल्लाजान होताच माझ्यासोबत. तो त्यांच्यातलाच.. त्याच्याशी बोलताना मला कळलं की आज मी त्यांचा पेश्शल पाहुणा आहे आणि मला पूजा करायच्ये किंवा सांगायच्ये!
ही कुठली पद्धत? कुणाला विचारून? मला क्षणभर काय करावं ते कळेचना! 'सगळं झुगारून निघून जावं का इथून?' हा विचार माझ्या मनात सारखा येत होता. पण माझ्या आजुबाजूला जमलेल्या, माझी इज्जत करणार्या त्या हिजड्यांच्या चेहर्यावर मला खूप आनंद दिसत होता, उत्साह दिसत होता..
'देखे क्या होता है.. जो भी होगा, देख लेंगे..' या माझ्या नेहमीच्या स्वभावानुसार मी ती मंडळी म्हणतील ते करायचं ठरवलं. अधिक माहिती विचारता अल्लाजानकडून मला असं समजलं की मी एक पांढरपेशा उच्चभ्रू आहे असा त्यांचा समज आहे आणि माझ्या हातून आज त्यांच्या गणपतीची पूजा व्हावी अशी त्या मंडळातल्या हिजड्यांची इच्छा आहे आणि तशी पद्धतही आहे..!
साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू?!
त्या गल्लीच्या मागल्या बाजूसच एका चाळवजा इमारतीत वेश्यायवसाय चालतो.. मला त्या लहानश्या खुराड्यातील तेवढ्याच लहानश्या मोरीवजा बाथरुमात नेण्यात आले.. त्या घरची मावशी अन् आजूबाजूच्या वेश्या यांनी मला वाट करून दिली.. एरवी बाराही महिने फक्त पोटातल्या भुकेच्या डोंबाचा अन् पर्यायाने केवळ वासनेचाच वावर असणार त्या खोलीत.. परंतु त्या दिवशी मला तसं काही जाणवलं नाही.. सण-उत्सवाचा, गणपतीच्या वातावरणाचा परिणाम? भोवती त्या वेश्यांची दोन-चार कच्चीबच्ची घुटमळत होती. कुणाच्या हातात गणपतीच्या पुढ्यातलं केळं तर कुणाच्या हाताता आराशीमधली चुकून सुटलेली रंगेबेरेंगी नकली फुलांची माळ, कुणाच्या हातात साखरफुटाणे तर कुणाच्या हातात कुठुनशी आलेली एखादी झांज! मला क्षणभर अभिमान वाटला तो माझ्या उत्साही व उत्सवप्रिय मुंबापुरीचा! काय काय दडवते ही नगरी आपल्या पोटात!
सोबत तो टकला हिजडा होता. त्यानं माझ्या हातात एक नवीन साबणाची वडी आणि स्वच्छ टॉवेल ठेवला..
मी स्नान करून, टॉवेल नेसून बाहेर आलो.. आसपासच्या वेश्यांचं तोंड चुकवून अंगात शर्टप्यान्ट चढवली.. त्या टकल्या हिजड्याचं मात्र मला खरंच खूप कौतुक वाटत होतं.. तो मोरीच्या बाहेरच थांबला होता.. 'हा आज आपला पाहुणा आहे आणि याला काय हवं नको ते आपण पाहिलं पाहिजे.' एवढी एकच तळमळ दिसत होती त्याच्या चेहर्यावर..! उच्चभ्रू समजातल्या सो कॉल्ड हॉस्पिटॅलिटीचा त्यानं कोणताही कोर्स केलेला नव्हता..!
तेवढ्या पाच मिनिटात त्या मावशीने चा करून माझ्या पुढ्यात कप धरला.. कोण ही मावशी? ८-१० वेश्यांचं खुराड सांभाळणारी.. तिनं मी अंघोळीहून येईस्तोवर माझ्याकरता चा देखील टाकाला?!
कपडे घातल्यावर त्या टकल्यानं ते अय्यप्पाचं पवित्र मानलं गेलेलं कुठलंसं वस्त्र उपरण्यासारखं माझ्या खांद्यावर घातलं.. आम्ही त्या खोलीतून बाहेर गणपतीपाशी आलो आणि मी मुख्य गाभार्यात शिरलो..
"तात्यासेठ, ये लक्ष्मी है.. इसको बोलो पूजा कैसे करनेका, क्या करनेका..!"
त्यांच्यातला एक लक्ष्मी नावाचा एक तरूण रूपवान हिजडा छानशी साडीबिडी नेसून तिथंच पूजा करायला म्हणून उभा होता.. माझं सहजच समोरच्या तयारीकडे लक्ष गेलं.. फुलं, अक्षता, अष्टगंध, समया, उदबत्त्या.. सगळी तयारी अगदी अपटूडेट होती.. ते सगळं पाहिल्यावर मी स्वत:ला विसरलो.. आपण एक सुशिक्षित सुसंस्कृत पांढरपेशे आहोत आणि मुंबैच्या कामाठीपुर्यात उभे आहोत ही गोष्ट मी विसरून गेलो. माझं मन एकदम प्रसन्न झालं..
सुसंस्कृत, सुसंस्कृत म्हणजे तरी काय हो? नस्ता एक बोजड शब्द आहे झा़लं.. त्या क्षणी माझ्या आजुबाजूचे ते सारे हिजडे सुसंस्कुत नव्हते काय?!
"प्रारंभी विनती करू गणपती.."
दशग्रंथी तात्या अभ्यंकराने पूजा सांगायला सुरवात केली.. तशी त्या पार्थिवाची प्राणप्रतिष्ठा वगैरे पहिल्या दिवशीच झाली असणार.. मी सांगत होतो ती केवळ संध्याकाळची धूपार्ती!
'प्रणम्य शिरसा देवं', 'शांताकारं भुजगशयनं.', गणपती अथर्वशीर्ष...' च्यामारी येत होते नव्हते ते सारे श्लोक तिथे बिनधास्तपणे आणि मोकळ्या मनाने म्हटले! अगदी गेला बाजार शिवमहिन्म स्तोत्रातल्याही सताठ ओळी मला येत होत्या त्याही म्हटल्या -
महिन्मपारंते परमविदुषो यद्यसदृषि
स्तुतिर्ब्रह्मादिनाम् अपितदवसंनास्त्वयिगिरा:
अथावाच्य..
आता आठवत नाही पुढलं काही.. पण कधी काळी ल्हानपणी मामांकडून शिवमहिन्माची संथा घेतली होती ती आता कामी येत होती. आपल्याला काय हो, शंकर तर शंकर.. तो तर बाप्पाचा बापुसच की!
ओल्या बोंबलाच्या कालवणाने चलबिचल होणारा मी, अगदी पूर्णपणे एका भिक्षुकाच्या भूमिकेत शिरलो होतो... सहीसही ती भूमिका वठवत होतो.. 'काय साला विद्वान दशग्रंथी ब्राह्मण आज आपल्याला लाभला आहे!' असे भाबडे कृतज्ञतेचे भाव आजुबाजूच्या हिजड्यांच्या चेहर्यावर मला दिसत होते.. त्यांचा तो म्होरक्या टकला हिजडा तर अक्षरश: कृतकृत्य होऊन रडायचाच बाकी होता.. श्रद्धा, श्रद्धा म्हणजे दुसरं तरी काय असतं हो?!
'गंधाक्षतपुष्पं समर्पयमि..' असं म्हणून लक्ष्मीला गंध, अक्षता व फुलं वाहायला सांगितलं..
"अबे भोसडीके उस्मान गांडू.. वो फुल उधर नजदिक रख ना..!"
फुलाचं तबक थोडं दूर होतं ते रागारागाने एका हिजड्याने कुणा उस्मानला नीट गणपतीच्या जवळ ठेवायला सांगितलं..!
गणेशपुजन सुरू असतांनाच, "अबे भोसडीके उस्मान गांडू"?
पावित्र्याच्या अन् शुचिर्भूततेच्या व्याख्या प्रत्येकाच्या, किंबहुना प्रत्येक समाजाच्या वेगळ्या असतात..!
"धूपं समर्पयामि, दीपं सर्पमर्पयामि.." दशग्रंथी अभ्यंकर सुरूच होते! आणि माझ्या सूचनांनुसार लक्ष्मी सगळं काही अगदी यथासांग, मनोभावे करत होती..की होता?!
सरते शेवटी पूजा आटपली, आरती झाली.. मला पुन्हा एकदा आतल्या एका खोलीत नेण्यात आलं.. त्या मंडळातले सारे कमिटी हिजडे अगदी कृतकृत्य होऊन माझ्याभोवती जमले होते..
'अब मुझे जाना होगा..देर हो गई है..' असं मी म्हटल्यावर थोडं तरी काही खाऊन गेलंच पाहिजे असा मला त्या टकल्यासकट इतर हिजड्यांनी आग्रह केला.. पाचच मिनिटात कुणीतरी गरमागरम पुर्या, छोले, गाजरहलवा असा मेनू असलेलं ताट माझ्या पुढ्यात घेऊन आला..
अखेर दशग्रंथी विद्वान तात्या अभ्यंकर अल्लाजानसोबत तेथून निघाले.. एक वेगळाच अनुभव घेतला होता मी.. गणपतीकडे त्या यजमान हिजड्यांकरता काय मागणार होतो मी? 'यांचा शरीरविक्रयाचा धंदा चांगला होऊ दे' - हे मागणार होतो? आणि मुळात त्यांच्याकरता देवाकडे काही मागणारा मी कोण? माझीच झोळी दुबळी होती.. त्यांच्या झोळीत माप टाकायला गणपती समर्थ होता..!
निघण्यापूर्वी त्या टकल्या हिजड्यानं माझ्या हातात एक पाकिट आणि हातात एक पिशवी ठेवली आणि मला नमस्कार करू लागला.. वास्तविक मलाच त्याच्या पाया पडावसं वाटत होतं..वयानं खूप मोठा होता तो माझ्यापेक्षा...!
तेथून निघालो. पाकिटात शंभराची एक कोरी नोट होती.. सोबत ही पिशवी कसली?
'आमच्याकडे जाताना भिक्षुकाला शिधा द्यायची पद्धत आहे..' अल्लाजानने माहिती पुरवली..
मी पिशवी उघडून पाहिली तो आतमध्ये एका पुडीत थोडे तांदूळ, दुसर्या पुडीत थोडी तूरडाळ..आणि दोनचार कांदेबटाटे होते.. डाळ-तांदुळाचा तो शिधा पाहून मला क्षणभर हसूच आलं..
'अरे हे काय? डाळ-तांदुळाचा शिधा?' मी अलाजानला विचारलं..
"डालचावल के अलावा इन्सानको जिंदगीमे और क्या लगता है?!"
अल्लाजानच्या तोंडून सहजच निघालेलं ते वाक्य बी ए, एम ए, पीएचडी... सार्या विद्यांना व्यापून त्यांच्या पल्याड जाणारं होतं, गेलं होतं.. !
मला आजही त्या शिध्यातले डाळतांदूळ पुरत आहेत