सत्व तिचं….. आगळ
आबांचा माईंबरोबर हा दुसरा विवाह होता . वयोमानानुसार व तब्येतीच्या विविध तक्रारींमुळे आबा अशात खूपच थकले होते त्यामुळे गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडून काहीच काम होत नसल्याने ते घरीच असत . दोन तरणेताठे मुलं , पण अजूनही हाताशी आलेले नव्हते. घरात अठराविश्व दारिद्र्याने थैमान घातल होत . नाही म्हणायला एक छोटसं राममंदिर मात्र त्यांच्याकडे होतं त्याच्याच भरवशावर त्या घराची उपजीविका कशी तरी सुरु होती . रामासमोर आलेल्या डाळदाणा व दक्षिणेवर कशीबशी चूल पेटत होती . माई मात्र अत्यंत धडाडीच्या, अशा ही परिस्थितीत मोठ्या उमेदीने व हसतमुखाने त्या संसार करत होत्या .
आज मात्र आबांचं व्यथित मन काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. टीचभर घरातच ते हताशपणे येरझारा घालत होते . पण माई मात्र अत्यंत शांतपणे आपल्या कामात व्यस्त होत्या . त्यांच्याकडे बघत न राहवून आबांनी विचारल ; अहो , महालक्ष्म्यांचा सण अगदी उद्यावर येवून ठेपला आणि यंदा आपली ही अशी दुर्दशा कस व्हावं ? ह्या चिंतेने मन पोखरून निघालं आहे आणि तुम्ही मात्र एवढ्या तन्मयतेने कस बर काम करू शकता ? तश्या माई हसल्या व म्हणल्या कशासाठी एवढी काळजी करताय तुम्ही ? ती माउली जरी माहेरवाशीण , लेक म्हणून येणार असली तरी अख्या जगाची मायच आहे . अखंड विश्वाची काळजी जी लिलया पेलते तिची काय बर आपण काळजी करायची ? ती अगदी साग्रसंगीतपणे थाटामाटात सगळी सेवा करवून घेईल आपल्या कडून . तीच सत्वच मुळी आगळ आहे . तेव्हा तुम्हीही सगळी चिंता तिच्या चरणी सोडून अगदी निश्चिन्त व्हा असं म्हणून माई पुन्हा कामात मग्न झाल्या. माईंची अनन्यसाधारण श्रध्दा बघून आबांचं सैरभैर झालेलं चित्त जरा स्थिर झालं. दुसऱ्या दिवशी मुहूर्ताप्रमाणे गौराईचे आगमन झाल . शेजारच्या घरून लुगड्यांची व्यवस्था झाली . घरात धान्य नसल्यामुळे गुळाच्या खड्याने महालक्ष्म्यांचे पोटं भरले गेले आणि गुळ्याच्या खड्याचाच नैवेद्य दाखवला गेला. मिळालेल्या सेवेचा मोठ्या प्रेमाने स्वीकार करून त्या माय माऊलींचे तृप्त चेहरे त्यांच्या लेकरा बाळांसमवेत प्रचंड मनमोहक तेजाने झळाळू लागले . अशातच रात्र सरली , महानैवेद्याचा दिवस उजाडला . आज महालक्ष्म्या जेवणार , घरात अन्न धान्याचा कणही नसताना मन मात्र श्रध्दा भक्तीने काठोकाठ भरलेली होती . सकाळी साडेसात आठच्या सुमारास अचानक मंगल वाजंत्रीचा आवाज सगळीकडे दुमदुमू लागला व भरजरी वस्त्रालंकार ल्यालेली वीस पंचवीस लोकांची मिरवणूक दिमाखात माई-आबांच्या मंदिरात स्थिरावली . लोटगाडीवर लादलेलं सामान मंदिरातच भराभर खाली होवू लागलं . घरातली सगळी मंडळी आ वासून बघत होती. काय चाललंय कुणालाच काही काळत नव्हतं . तेवढ्यात एक मनुष्य अत्यंत नम्रपणे हात जोडून आबांकडे आला व म्हणला तुमच्या महालक्ष्म्या पावल्या बघा आम्हाला . मागच्या वर्षी माझी सून तुमच्याकडे दर्शनाला आली होती तेव्हा हरवलेल्या मातृत्वाच्या सुखासाठी तिने त्या माऊलीकडे पदर पसरला आणि तिच्या कृपने तेरा वर्षांपासून वाट्टेल ते सगळे उपाय करून थकलेल्या माझ्या मुलाच्या व सुनेच्या मांडीत ह्या वर्षी गोड गोंडस बाळ खेळू लागला . खरंच त्या माऊलीची महिमा अगाध आहे. आज तुमच्याकडे एवढीच विनंती घेऊन आलो आहोत की बाळाच्या रूपाने तिची कृपा आमच्यावर बरसली तेव्हा आजचा महानैवेद्य बनवण्यासाठी ह्या आणलेल्या सामग्रीचा स्वीकार व्हावा व थोडं का असेना पण आम्हा सर्वांनाही ह्या पुण्यकर्मात सहभागी होण्याचं अहोभाग्य लाभावं . असं म्हणत त्या इसमाने महालक्ष्म्यांसाठी गर्भरेशमी लुगडे , बाळांसाठी कपडे त्यावर साजेसे सुंदर मोत्याचे दागिने घवघवीत दक्षिणेसहित आबांच्या स्वाधीन केले . माई व आबांच्या मुखातून शब्दही फुटत नव्हता. केव्हापासून महत्प्रयासाने थोपवून ठेवलेले अश्रू आबांच्या डोळ्यांतून अमृताप्रमाणे पाझरू लागले . त्याच अमृताचा पाझर हृदयात लेवून माईंनी अगणित चटण्या , कोशिंबिरी , मोकळ्या डाळी , चिंच गुळाचं पंचामृत इत्यादीने समृद्ध पुरणा वरणाचा मनोभावे स्वयंपाक केला . महालक्ष्म्या थाटात जेवल्या व मिरवणुकीत आलेली सगळी मंडळी सुध्दां अमृतमय महाप्रसाद घेऊन तृप्त झाली . पाठोपाठ माई व आबांचे दिवसही पालटले आणि श्रध्देबरोबरच समृध्दीही माई व आबांकडे स्थिरावली ती कायमचीच……. महालक्ष्मीच्या तेजोमय चैतन्याच्या रूपात .
भाव भक्तीच्या दिव्य गंधाने
आसमंत सर्वत्र दरवळे
प्रचिती वाचून मुळीच ना कळे
सत्व तिचे आगळे वेगळे .....
।। श्री महालक्ष्मी प्रसन्न ।। (सत्य घटने वर आधारित )