२२ डिसेंबर 'गणित दिन'
केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये गणितात असामान्य संशोधन करून अल्पावधीत जगभर प्रसिद्धी मिळवलेले थोर भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि त्यांचे व ट्रिनिटी कॉलेजचे असलेले गहिरे संबंध अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या नावाने फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी केंब्रिजमध्ये गणितातील संशोधन शिष्यवृत्ती देण्यात येते. मा. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २०१२ हे गणित वर्ष घोषित केले. प्रसिद्ध गणितज्ञ रामानुजन यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली. रामानुजन यांनी गणितातील मूळ संख्या, श्रेणी यावर बरेच काम केले आहे. या गणिताचा व्यवहारात नेमका काय उपयोग होतो असा प्रश्न पडत असेल. संगणकात तर अशा अभ्यासाची फार आवश्यकता असते. गणिताचा वापर करुन तंत्रज्ञान विकसित करण्यात येते. गणित, विज्ञान यातील कागदावर मांडलेल्या संकल्पना भविष्यातील तंत्रज्ञानाचा पाया असू शकतो. हे ज्ञान विकसित करण्याकरता तुमची बुध्दी, एक वही, एक पेन पुरेसे आहे. श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांचा २२ डिसेंबर हा जयंती दिन देशात 'गणित दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. गणित विषय ही भारतीयांनी जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. गणिताची दहशत कमी करण्याचा थोडासा प्रयत्न केला तरी ती रामानुजनांना आदरांजली ठरेल.