इंग्लंड
हिवाळा सुरू झाल्यावर रामानुजन यांना इंग्लंडची कडाक्याची थंडी सहन करणे कठीण झाले. ते रुढीप्रिय ब्राह्यण व कट्टर शाकाहारी असल्याने स्वतःचे जेवण स्वतः बनवत. त्यांना एकटेपणाही जाणवू लागला. हार्डी यांना त्यांच्यात प्रतिभाशाली गणितज्ञ दिसला. केवळ त्यांची इच्छा आणि उत्तम काळजी यामुळे रामानुजन इंग्लंडमध्ये पाच वर्षे राहिले. हार्डी त्यांचे खरे मित्र, मार्गदर्शक व तत्त्वज्ञ होते. त्यानंतर काही काळाने हार्डी यांनी मद्रास विद्यापीठास एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी लिहिले की, रामानुजन हे फार मोठे गणितज्ञ आहेत आणि इतकी प्रतिभावान व्यक्ती त्यांना पूर्वी कधी भेटली नाही. त्यांचे प्रशंसापत्र मिळाल्यावर मद्रास विद्यापीठाने रामानुजन यांची दोन वर्षांसाठी असणारी शिष्यवृत्ती पाच वर्षांपर्यंत म्हणजे मार्च, १९१९ पर्यंत वाढवली. केवळ मॅट्रिक झालेल्या रामानुजन यांना इ.स. १९१६ साली बी.ए. पदवी प्रदान करण्यात आली.
इंग्लंडच्या पाच वर्षांच्या वास्तव्यात त्यांचे २५ शोधनिबंध प्रकाशित केले गेले. यामुळे गणिताच्या विश्वात ते लोकप्रिय झाले. रामानुजनना त्या काळातील महान गणितज्ञांमधील एक मानण्यात येई. ऑक्टोबर, १९१८ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांना फेलो करून घेतले. हा सन्मान मिळवणारे ते दुसरे भारतीय होते. फेब्रुवारी १९१८ साली नौदल अभियंता आरदेशजी यांना ट्रिनीटी महाविद्यालयाकडून असा सन्मान मिळाला होता. ते पहिले सन्मानित भारतीय होते.