Get it on Google Play
Download on the App Store

नोकरी

रामानुजनना असणारी गणिताबद्दलची ओढ पाहून रामानुजन यांचे वडील चिंतित झाले होते. रामानुजनना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी २२ व्या वर्षी त्यांचे लग्न लावून देण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पत्नी जानकी यांचे वय नऊ वर्षांचे होते. रामानुजन यांनी जबाबदारी वाढल्याने नोकरी शोधण्यास सुरुवात केली. या कामी त्यांना यश मिळाले नाही; तरी शेवटी गणितच त्यांच्या उपयोगी पडले. इ.स. १९०३ पासून रामानुजन यांनी आपल्या वहीत गणिते सोडवण्यास सुरुवात केली होती. इ.स. १९१० पर्यंत त्यांनी केलेल्या संशोधनावरील कामांच्या तपशिलाने दोन मोठ्या वह्या पूर्ण भरल्या. आपल्या वह्या घेऊन ते भारतीय गणित मंडळाचे (इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी) संस्थापक पी. रामास्वामी अय्यर यांच्याकडे गेले. या वह्या पाहून रामास्वामी अतिशय प्रभावित झाले. त्यांनी रामानुजन यांना प्रेसिडेन्सी महाविद्यालय, मद्रास (चेन्नई) येथील गणिताच्या प्राध्यापकांच्या नावे एक पत्र दिले. सुदैवाने त्या प्राध्यापकांनी यापूर्वी त्यांच्या महाविद्यालयात शिकवले होते. रामानुजन त्यांना भेटले तेव्हा, त्यांनी रामानुजनना पटकन ओळखले. नेल्लोराचे जिल्हाधिकारी (कलेक्टर) रामाराव यांच्या नावे एक शिफारस पत्र त्यांनी रामानुजन यांना दिले. व्यक्तिशः रामाराव यांना गणिताची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी ठरवले की, रामानुजन यांना मद्रास येथे महालेखापालांच्या कार्यालयात नोकरी मिळावी. कालांतराने त्यांना मद्रासच्या पोर्ट ट्रस्टच्या लेखा विभागात लिपिक म्हणून नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांचा महिन्याचा पगार ३० रु. होता. त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत थोडीफार सुधारणा झाली.