गणितातील गोडी
रामानुजन यांच्या शेजारी महाविद्यालयात शिकणारा एक मुलगा राहत होता. एकदा रामानुजन यांनी त्याचे गणिताचे पाठ्यपुस्तक मागितले. त्या मुलाने रामानुजनना पुस्तक तर दिले; पण शाळेतल्या विद्यार्थ्याला महाविद्यालयाच्या पुस्तकाची काय गरज, याचे त्याला नवल वाटले. रामानुजनने पुस्तकातील सर्व प्रश्न सोडवले, हे पाहून तर त्याला फारच आश्चर्य वाटले. नंतर त्याला गणितात कोणतीही शंका आली की, तो रामानुजन यांना विचारात असे. आता तो रामानुजनसाठी महाविद्यालयातून गणितविषयी आणखी इतर पुस्तकेही आणू लागला.
केवळ दोनच वर्षात त्यांनी प्राथमिक शालेय अभ्यासक्रम पूर्ण केला आणि वयाच्या दहाव्या वर्षी ते फायनलच्या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. रामानुजन यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांनी शालेय जीवनातच अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक पुस्तकांचे वाचन केले. त्यांची पाठांतर क्षमता आणि स्मरणशक्ती असामान्य होती. त्यांना संस्कृत सुभाषितमाला, पाढे आणि अनेक संख्यांचे वर्ग-घन-चतुर्थघात-वर्गमुळे-घनमुळे पाठ होती.
वयाच्या तेराव्या वर्षी रामानुजनने ग्रंथालयातील त्रिकोणमितीवर (ट्रिग्नॉमिट्री) एक पुस्तक वाचले. पुस्तकातील प्रमेये त्यांनी आपल्या वहीत सोडवली. १५ व्या वर्षी त्यांनी जॉर्ज शुब्रिज कार यांच्या 'विशुद्ध व उपयोजित गणितातील प्रारंभिक निष्कर्षांचा सारांश' (सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट्स इन प्युअर अँड अप्लाइड मॅथेमॅटिक्स) या ग्रंथाची दोन खंडांत उपलब्ध असलेली (१८८० - ८६) प्रत मिळाले. कार यांच्या पुस्तकातील उत्तरे आपल्या उत्तराशी त्यांनी ताडून पहिली. स्वतःची प्रमेये व मते विकसित करून ते कार यांच्याही पुढे गेले.