Android app on Google Play

 

विहार वंदना...

 

आम्ही हे क्षेत्र, त्रिरत्नास समर्पण करतो.

मानवाच्या संबोधीप्राप्तीचा आदर्श, अशा बुद्धास, आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो.

ज्या धम्ममार्गाच्या आचरणास आम्ही सिद्ध झालो आहोत, त्या धम्मास आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो,

ज्यांचात परस्पर कल्याणमित्रतेचा आनंद आम्ही उपभोगतो, अशा संघास, आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो.

येथे कोणत्याही व्यर्थ शब्दांचे उच्चारण केले जाऊ नये. येथे चंचल विचारांनी आमची मने कंपित होऊ नयेत.

पंचशीलांच्या परिपालनासाठी, ध्यान-साधनेच्या सरावासाठी, प्रज्ञेच्या विकासासाठी, आणि संबोधीच्या प्राप्तीसाठी, आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो.

बाह्य जगात जरी द्वेष उफाळत असला,
तरी येथे मात्र मैत्री नांदो. बाह्य जगात जरी दुःख खदखदत असले, तरी येथे मात्र आनंद नांदो.

पवित्र समजल्या जाणाऱ्या ग्रंथाचे पठण करुन नव्हे, किंवा पवित्र समजल्या जाणाऱ्या जलाचे सिंचन करुनही नव्हे. तर संबोधि प्राप्तीसाठी प्रयत्नशील बनुन, आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो.

या परिमंडलाभोवती, या पवित्र क्षेत्राभोवती, परिशुद्धतेची कमलदले उमलोत.

या परिमंडला भोवती, या पवित्र क्षेत्राभोवती दृढ प्रज्ञेचा वज्रतट उभा राहो.

या पवित्र क्षेत्राभोवती, संसाराचे निर्वाणात परिवर्तन करणाऱ्या अग्निज्वाला उफाळोत.

येथे बसुन, येथे आचरण करुन, आमची मने प्रबुद्ध बनोत. आमचे विचार धम्म बनो, आणि आमचे परस्परातील संबंध संघ बनोत.

सर्व प्राणिमात्रांच्या सुखासाठी आणि सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी, काया, वाचा आणि मनाने आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो..