लहान सुद्धा महान असते ठाऊक आहे तुम्हाला
लहान सुद्धा महान असते ठाऊक आहे तुम्हाला
इवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला!
महा भयंकर सिंह एकदा गुहेमध्ये निजलेला
एक छोटासा उंदीर आला,
सिंहाच्या अंगावर चढुनी ओढी दाढी-मिशाला!
सिंह जागला करीत गर्जना धरिला उंदीर त्याने,
म्हणे चिमुरड्या, "तुला फाडतो माझ्या या पंजाने."
थरथर कापे, उंदीर सांगे, "येईन कधितरी कामाला!"
इवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला!
( या थरथर कापणार्या उंदराचा सिंहाने उपहास केला.
तो म्हणाला, "अरे मूर्खा तू माझ्या एका घासाचाही नाहीस!
चिमुरडा तू, वनराजाच्या कसल्या कामी येणार आहेस रे?
चल, चालता हो इथून."
सुटका होताच उंदीर बिळात पळून गेला. पण एकदा काय झालं ठाऊक आहे?)
कधी एकदा सिंह अडकला फसूनिया जाळ्यात
वनराजा हो केविलवाणा ये पाणी डोळ्यांत!
हादरे जंगल, अशी गर्जना ऐकून उंदीर धावे
सिंहाला तो सांगे, "आता माझे शौर्य बघावे!
भिऊ नका हो, रडू नका हो, सोडवितो तुम्हाला.
नका लोचनी आणू पाणी, पाळीन मी वचनाला."
सर्व शक्तीने कुरतडुनीया उंदीर तोडी जाळे
पाहून सारे मग सिंहाचे भरुनी आले डोळे!
जीव चिमुकला संकटकाळी अखेर कामी आला
इवले इवले जीव कितिदा येती मोठ्या कामाला!