Android app on Google Play

 

आवडती भारी मला माझे आजोबा

 

आवडती भारी मला माझे आजोबा

पाय त्यांचे थकलेले
गुडघ्यात वाकलेले
केस सारे पिकलेले
ओटीवर गीता गाती माझे आजोबा

नातवंडा बोलावून
घोगर्‍याशा आवाजानं
सांगती ग रामायण
मोबदला पापा घेती माझे आजोबा

रागेजता बाबा-आई
अजोबांना माया येई
जवळी ते घेती बाई
कुटलेला विडा देती माझे आजोबा

खोडी करी खोडकर
अजोबांची शिक्षा थोर
उन्हामध्ये त्यांचे घर
पोरांसंगे पोर होती माझे आजोबा