Get it on Google Play
Download on the App Store

नवरात्रातील नऊ रंग

नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत त्या ठरावीक रंगाच्या साड्या नेसतात. गावांगावांतील बँका किंवा तत्सम स्त्रीबहुल कार्यालयांमध्ये नवरात्रात असे एकरंगी दृश्य असते. या प्रथेची सुरुवात २००४ सालापासून झाली, ती अशी:-

२००४ साली मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नऊ दिवस नेसवल्या जाणाऱ्या साड्यांचे रंग 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाले. मुंबईभरातल्या महिलांनी नऊ दिवस त्या त्या रंगांच्या साड्या नेसून त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यानंतर हे दरवर्षी घडत गेले. आता नवरात्रीत वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या 'आजच्या रंगाने' मुंबई रंगून जाऊ लागली.. लोकल ट्रेन्स, सरकारी बिन-सरकारी ऑफिसे, महिलामंडळे एवढेच काय पण हॉस्पिटल्सही या रंगांच्या साड्यांनी रंगून जातात. आता मुंबईच नाही तर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव अशा अनेक गावांत नवरात्रीच्या नऊ दिवसांत रंगांची ही उधळण पहायला मिळते.

ही नवरात्रीच्या दिवसांच्या नऊ रंगांची कल्पना महाराष्ट्र टाइम्सने बहुसंख्य सामान्य आणि तमाम नोकरदार स्त्रीवर्गात जरी लोकप्रिय केली असली, तरी रंगांची मूळ कल्पना एकोणीसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती. (१८१८ सालचे पंचांग पहावे). उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.