८/१० दिवसांची नवरात्रे
शारदीय नवरात्र १९६७, २०११, २०१२, या साली ८ दिवसांचे होते, २०३८ सालीही ते आठच दिवसांचे असेल; २००० व २०१६ साली ते दहा दिवसांचे होते.
वासंतिक नवरात्र सन २००० (अष्टमी क्षय), २०१५ (तृतीया क्षय), २०१६ (तृतीया क्षय), २०१७ (प्रतिपदा क्षय) या वर्षी आठ दिवसांचे होते आणि २०१८ (नवमी क्षय), २०२५ (तृतीया क्षय), २०२६ (प्रतिपदा क्षय) या सालीही ते ८ दिवसांचे असेल. २०२९ (द्वितीया वृद्धी) या साली ते १० दिवसांचे असेल.
व्रत- नवरात्र हे एक काम्य व्रत आहे.पुष्कळ घराण्यात या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते.आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.त्यासाठी घरात पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारतात.तिथे एक वेदी तयार करतात.नंतर स्वस्तिवाचन पूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात.मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात.यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात.व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ रहायचे असते.आश्विन शुद्ध नवमी अखेर हे व्रत चालते.या व्रतात नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करतात, अखंड दीप लावतात,घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात.क्वचित होमहवन व बलिदानही करतात.नऊ दिवस रोज कुमारीची पूजा करून तिला भोजन घालतात.शेवटी स्थापित घट व देवी यांचे उत्थापन करतात. काही कुटुंबात देवीला कडाकण्या बांधण्याची पद्धतही प्रचलित आहे.
देवीची अन्य नवरात्रे याप्रमाणे- १.पौष शुकल सप्तमी ते पौर्णिमा =शाकंभरी नवरात्र २.मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी किंवा अष्टमी ते पौर्णिमा =योगेश्वरी अंबेजोगाई नवरात्र ३.चैत्र शुक्ल सप्तमी ते पौर्णिमा =सप्तश्रुंगी नवरात्र