देवीची नऊ रूपे
जुनीगंगा माता कोपरगाव
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो.यामुळे आपल्या नवीन शक्ती,नवा उत्साह,उमेद निर्माण होत असते.बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणा-या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो.सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य,संयम ,उपासना,यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.स्मरणशक्ती चांगली होवून बौद्धिक विकास होतो.म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काल आहे असे मानले जाते.
नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते, असा समज आहे. आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपासहित भ्रमण करणे, म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणार्या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे, अशी समजूत आहे. हे नऊ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी, तसेच आदिशक्तीच्या मारक व चैतन्यमय लहरींचे युद्ध चालू असते. या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेले असते व दुर्गादेवीच्या शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने सूक्ष्म शक्तींवर हल्ला करत असते, अशी कल्पना आहे. याचे प्रतीक म्हणून घट व त्यातील नंदादीप यांना प्रतीकात्मक रूपात पूजले जाते. घटात दीपाच्या उष्णतेमुळे निर्माण झालेले वातावरण हे ब्रह्मांडात नऊ दिवस अहोरात्र सुरू असलेल्या युद्धातून निर्माण झालेल्या तप्त वायुमंडलाशी साधर्म्य दर्शवते, तर दीप हा आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रांतून निर्माण होणार्या तेजाचे प्रतीक म्हणून कार्य करतो. घरात घटपूजन केल्याने वास्तूमध्येही दुर्गादेवीचे मारक चैतन्य कार्यरत होऊन वास्तूमधील त्रासदायक लहरींचे निर्दालन करते, अशी या मागची धार्मिक श्रद्धा आहे. मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात सांगितले आहे- " शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते. (८९.११.१२)
अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.
१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले.देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात.उमा, गौरी,पार्वती,जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे असून दुर्गा, काळी,चंडी,भैरवी , चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत