खेळ आणि चित्रपट
अक्षर प्रभू देसाई
चित्रपटात अनेक प्रकारची genre (जॉनर) असतात. Genre ह्या शब्दाचा अर्थ आहे शैली. पण प्रत्यक्षांत त्याचा उपयोग होतो "वर्गीकरण" ह्या अर्थाने. म्हणजे रोमान्स हे एक जॉनर आहे तर भयपट हे दुसरे. देश कालमानाप्रमाणे अनेक नवीन नवीन जॉनर अस्तित्वांत आहेत. जपान मध्ये तर शेकडो विचित्र जॉनर आहेत. गॉडझिला हा मूळ जपानी चित्रपट ह्याचे जॉनर आहे कायजू म्हणजे महाप्रचंड दैत्य असलेला चित्रपट. भारतात भारतीय पुराण हे आमचे एक जॉनर आहे तसेच 'नागमणी' हे फक्त भारतीय जॉनर आहे. अनेकांना वाटते कि "पुनर्जन्म" हे भारतीय जॉनर आहे पण प्रत्यक्षात पुनर्जन्म विषयावरील चित्रपट हॉलिवूड मध्ये सुद्धा येतात. कर्ज हा ऋषी कपूरचा अत्यंत लोकप्रिय चित्रपट खरे तर हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट "Reincarnation of Peter Proud" ह्याची कॉपी आहे. त्या काळांत हॉलिवूड मध्ये पुनर्जन्म चित्रपटांचा अतिशय सुकाळ होता आणि त्यामुळे सुमारे ८०% अमेरिकन लोक त्या काली पुनर्जन्म ह्या वर श्रद्धा बाळगून होते.
विषयांतर नको. 'क्रीडापट' हे एक असेच जॉनर आहे. भारतीय सिनेसृष्टीचा इतिहास लिहायचा झाला तर पहिल्या पाच चित्रपटांत लगान (२००१) चे नाव सहज येईल. मदर इंडिया नंतर ऑस्कर साठी नॉमिनेट झालेला हा दुसरा भारतीय चित्रपट. अमीर खान , ग्रेसी सिंग ह्यांच्या अभिनयाने समृद्ध आणि आशुतोष गोवारीकर ह्यांची विशिष्ट दिग्दर्शनशैली ह्यामुळे हा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला. रेहमान ह्यांची गाणी तर अप्रतिम होती. पारतंत्र्याच्या काळांत गुलाम भारतीय आणि गोरे साहेब ह्यांच्यात क्रिकेट च्या खेळाची पैज लागते आणि विविध संकटांचा सामना करून ते जिंकतात. कथानक थोडे बेगडी वाटले तरी प्रत्यक्षांत चित्रपट उत्कंठा वाढवणारा होता.
लगान हा चित्रपट व्हिक्टरी ह्या १९८१ चित्रपटाशी थोडा साम्य ठेवून होता. नाझी पोलीस आणि त्यांचे युद्धकैदी ह्यांच्यात फ़ुटबाॅलची मॅच ठरते आणि शेवटी कैदी जिंकतात पण त्यांना गोळी घालून ठार मारले जाते असा हा चित्रपट होता.
भारताचे क्रिकेटप्रेम किंवा क्रिकेटवेड सर्वश्रुत आहे. त्यामुळे अनेकांनी क्रिकेट आणि बॉलिवूड ह्यांची सांगड घालून पैसा कमावण्याचा प्रयत्न केला. देवानंद ह्यांनी आपल्या शेवटच्या कारकिर्दीत अव्वल नंबर नावाचा अमीर खानला घेऊन एक चित्रपट बनवला. हा चित्रपट कदाचित अमीर खानचा सर्वांत भिकार चित्रपट असेल अगदी मेला चित्रपटाच्या हुन सुद्धा.
२००५ साली आपल्या मराठी श्रेयस तळपदे ह्याला घेऊन इक्बाल नावाचा एक अत्यंत चांगला चित्रपट हिट झाला. लो बजेट असला तरी त्यातील श्रेयस तळपदे आणि नासिरुद्दीन शाह ह्यांचा अभिनय अतिशय उच्च दर्जाचा होता. क्रिकेट वरील हिट ठरलेला हा दुसरा चित्रपट.
लगान च्या यशाने अनेकांना थोडा हुरूप आला. व्हिक्टरी ह्या नावाने हरमन बवेजा ह्या ह्रितिक सारख्या दिसणा-या नटाने एक चित्रपट २००९ मध्ये केला. हरमन बावेजा ह्याने काही महिने आधी लव्ह स्टोरी २०५० नावाचा प्रचंड बिग बजेट चित्रपट केला होता आणि तो चित्रपट आजतागायत बॉलिवूड मधील सर्वांत भिकार चित्रपटांपैकी एक मानला जातो. माझ्या मते लव स्टोरी २०५० पेक्षा अधिक खराब जर कोणता आधुनिक चित्रपट असेल तर तो राम गोपाळ वर्मा यांचा आग.. व्हिक्टरी हा चित्रपट सपशेल आपटला. आणि या चित्रपटाने हरमन बावेजाला कळून चुकले आणखीन धडपड करण्यात अर्थ नाही.
२००७ साली शाहरुख खानने चक दे इंडिया नावाचा भन्नाट चित्रपट केला. महिला हॉकीवर आधारित हा चित्रपट लो बजेट असूनसुद्धा सुपर हिट झाला आणि कदाचित शाहरुखच्या सर्वांत चांगल्या चित्रपटात वरच्या नंबर वर असेल. त्याच वर्षी धन धना धन गोल नावाचा फ़ुटबाॅल वर आधारित जॉन अब्राहम चा चित्रपट आला आणि आपटला. इंग्लंड मधील भारतीय लोकांचे जीवन दाखवणारे चित्रपट त्या काळी प्रसिद्ध होते आणि रॉनी स्क्रूवालाने तिथे हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला. हाच फॉर्मुला वापरून पतियाळा हाऊस हा क्रिकेट आणि लंडन ह्यांचे समीकरण दाखवणारा चित्रपट अक्षय कुमार आणि निखिल अडवाणी ह्यांनी आमच्या पुढे आणला आणि चित्रपट चांगले कथानक असून सुद्धा विशेष चांगला चालला नाही.
पण २००८ साली जन्नत नावाने भट्ट भावांनी इम्रान हाश्मी ह्याला घेऊन एक चित्रपट केला जो क्रिकेटमधील सट्टेबाजीवर आधारित होता. हा चित्रपट बऱ्यापैकी चालला आणि नंतर भट्ट जोडगोळीने जन्नत २ सुद्धा बाजारांत आणला.
पण २०१० च्या दरम्यान भारतात क्रिकेट सोडून इतर खेळसुद्धा लोकप्रिय झाले. ऑलिम्पिक मध्ये भारतीयांचे प्रदर्शन २०१२ साली सगळ्यांत चांगले होते. भारताने चक्क ६ मेडल्स आणली. ह्यामुळे देशांत इतर खेळाकडे लोकांचे लक्ष गेले. सानिया मिर्झा, साइना नेहवाल, मारी कॉम, राजवर्धन सिंग राठोड, अभिनव बिंद्रा, इत्यादी अनेक खेळाडू लोकांच्या मनात बसले.
ह्या सर्व नव्या बदलावर चित्रपट सृष्टीचे लक्ष नसते गेले तरच आश्चर्य. २०१२ मध्ये पान सिंग तोमर हा चित्रपट आला. माझ्या मते हा सर्वांत चांगला भारतीय क्रीडापट. पानसिंग तोमर एक सत्य कथा आहे आणि त्याच नावाच्या एका खेळाडूवर आधारित आहे. भारतीय सैन्यातील एक खेळाडू अतिशय प्रतिकूल स्थितीत खेळतो आणि नंतर निवृत्त होऊन गावी जातो. गावी जाताच दुष्ट सरकारी बाबू जमीनदार इत्यादी मंडळी त्याचे शोषण करतात. ते पाहून तो बागी बनतो. चंबळच्या खोऱ्यात त्यांना सरकार डाकू म्हणते. एक देशप्रेमी जवान ते सामाजिक विषमतेशी लढा देणारा बागी असा हा त्याचा प्रवास खरोखर पाहण्यासारखा आहे. चित्रपटाने बऱ्या पैकी पैसा सुद्धा केला.
त्यानंतर आला.. मिल्खा सिंग ह्याच्या जीवनावरील चित्रपट भाग मिल्खा भाग. फरहान अख्तरने जीवापाड मेहनत घेऊन मिल्खा सिंग ह्याचे जीवन पडल्यावर आणले. मिल्खा सिंग ह्याला फ्लयिंग जाट म्हणत असत आणि ऑलिम्पिक मध्ये एक शतांश सेकंदने त्याचे मेडल हुकले होते. पण त्यानंतर कितीतरी दशके मिल्खा सिंग चा रेकॉर्ड कोणीही भारतीय तोडू शकला नाही.
मेरी कोम हे नाव कुणाला ठाऊक नाही ? तीन मुलांची ही आई झाशीच्या राणी लक्ष्मीबाई सारखी वाटते. बॉक्सिंग ग्लोव्हज् घालून हिने भल्याभल्यांना रिंग मध्ये कोसळवले आहे. मेरी कोम काही मुंबई दिल्लीतील शहरातील खेळाडू नसून मणिपूर मधील कोम जमातीतील महिला. प्रियांका चोप्रा हिने मेरी कोम चे जीवन रुपेरी पाड्यावर आणण्याचा विडा उचलला आणि बऱ्यापैकी मेहनत घेऊन तो साध्य सुद्धा केला. माझ्या मते चित्रपट मेरी कोम च्या जीवनातील अपार मेहनत चांगल्या प्रकारे दाखवू शकला नाही.
व
ह्याच काळांत अझरउद्दीन च्या जीवनावर एक चित्रपट येऊन गेला. हा चित्रपट, चित्रपट कमी आणि प्रोपागंडा चित्रपट जास्त वाटला. अझरुद्दीन हा खरोखर चांगला खेळाडू होता पण एक माणूस म्हणून लोकांना त्याला समजून घेणे निव्वळ अशक्य होते. क्रिकेटला धर्म मानणाऱ्या देशांत त्याने फिक्सिंग चा गुन्हा केला होता.
सचिनची बायोपिक येऊन गेली आणि MS धोनी ची सुद्धा. दोन्ही चित्रपटांनी बऱ्यापैकी गल्ला कमावला आणि ह्याच धर्तीवर आणखीन चित्रपट येऊ पाहत आहेत. २०१० चे दशक माझ्या मते क्रीडापट ह्या जॉनर साठी फार महत्वाचे होते आणि आता दर वर्षी एक ना दोन मोठे क्रीडापट येतील ह्यांत शंका नाही.
अमीर खानने दंगल नावाचा स्त्री कुस्तीवरचा सत्यघटनेवर आधारित सुपरहिट चित्रपट २०१६ मध्ये केला आणि तो चीन मध्ये सुद्धा लोकप्रिय झाला. सलमान खान ने त्याला जवाब म्हणून सुलतान हा तर्कदुष्ट आणि फ्लॉप चित्रपट केला. हा चित्रपट कुस्तीवर आधारित होता.
जुने क्रीडापट
फार कमी लोकांना ठाऊक असेल कि क्रीडापट हे भारतीयां साठी नवीन नाहीत. शतरंज के खिलाडी हा शंभर टक्के क्रीडापट नसला तरी दोन बुद्धिबळाच्या खेळाडूंचे आयुष्य दाखवणारा होता. सत्यजित रे ह्यांच्या अनुभवी दिग्दर्शनाने ह्या चित्रपटाला अजरामर केले. बुद्धिबळ खेळता खेळता एक नवाब कश्या प्रकारे भित्रट बनून जीवनाची बाजी हरतो ह्याचे त्यांत चित्रण आहे.
१९९२ सालचा जी जिता वही सिकंदर चित्रपट तुफान चालला. त्यातील पहला नशा हे गाणे इतके प्रचंड लोकप्रिय आहे कि आज सुद्धा १६-१७ वर्षांची मुले ते ऐकतात. भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक क्रीडापट कदाचित अमीर खानने केले असतील. अमीर खानचा हा चित्रपट होता जो जिता वही सिकंदर. हा चित्रपट दोन शाळांतील सायकल रेस वरून असणाऱ्या स्पर्धेवर होता. अमीर खान मार्मिक सिंग आणि आयेशा जुल्का ह्यांनी आणि खूप चांगल्या भूमिका केल्या होत्या.
नया दौर हा दिलीप कुमार ह्यांचा चित्रपट सर्वांना ठाऊक आहे. घोड्याच्या टापांचे पार्श्वसंगीत देऊन ओ.पी. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेले मांगके साथ तुम्हारा हे गाणे कोणी ऐकले नाही ? हा १००% क्रीडापट नसला तरी ह्यांतील मूळ कथानक बस आणि टांगा ह्यांच्या शर्यतीवर आधारित आहे. त्याकाळी आपला देश गरीब होता आणि आधुनिक तंत्रज्ञानाला घाबरणारी समाजवादी विचारसरणी घेऊन बसला होता. त्यामुळे अतिशय जुनाट आणि बुरसटलेली विचारसरणी ह्या चित्रपटांत मांडली गेली होती.
नया दौर मध्ये बस ला घाबरणारे भारतीय टांगेवाले आणि दंगल मधील छोट्याश्या गांवातील लहानशी फोगट मुलगी जी रशियन, जपानी मुलींना उचलून पटकण्याचे स्वप्न साध्य करते ह्यांत आमच्या देशाने किती प्रगती केली आहे हे दिसून येते. कुठलेही शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंच्या चढवण्याचे काम आमच्या देशातील गांवातील फोगट भगिनी असो वा धोनी करू शकतात हा विश्वास आमच्या हृदयांत आहे.