Android app on Google Play

 

डियर इंडिया व्हाट्स रॉंग विथ यु........?

 

विक्रम अरने
पुणे

असेच एकदा मी सहज इंडिया ला विचारले....... डिअर इंडिया व्हाट्स रॉंग विथ यू?

ती शांत झाली आणि मग ती अशी बोलायला लागली मला समजेनाच मी असे काय तिला विचारले...?

बलात्कार, अत्याचार, असहिष्णुता, कलाकारांचा बहिष्कार, गो रक्षकांचा सुळसुळाट, तथाकथित संस्कृती रक्षकांची सेना, कास्टिंग काऊच, पुरस्कार सोहळा व त्यावर राष्ट्रपती पदक विजेत्यांचा बहिष्कार, आतंकवाद, दहशतवाद, ट्रोलिंग, न्यायाधीशांचा संशयास्पद मृत्यू, साक्षीदारांना धमकावणे आणि त्यांचा मृत्यू, पुतळ्यांच्या विटंबना, दलितांबरोबर सहभोजनाचा पार्सल जेवण आणून केला जाणारा थाट, वंदे मातरमची सक्ती, भारत माता की जय घोषणेचा उदो उदो, वैज्ञानिकत्वाची पुराणकालीन घटनांशी ओढूनताणून घातली जाणारी सांगड, माध्यमे व वर्तमान पत्रांची मुस्कटदाबी, नमामी गंगे, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूंना दत्तक देण्याची नामुष्की, जगातील सात आश्चर्यात समावेश असणाऱ्या ताजमहालला राज्य प्रमुख स्थळ यादीतून वगळणे, उजवीकडे बीफ बंदी तर डाव्या राज्यात बीफ प्रचार, शेतकऱ्यांची वाजतगाजत कर्जमाफी तर ती मिळवण्यासाठी तांत्रिक अडचणी, जोरजोरात विदेशात  दवंडी पिटवून पिटला जाणारा विकासाचा डंका, देशाची मानांकनात खालावलेली विकासाची पत, अवघड नोटबंदी, सर्जीकल स्ट्राईक, विचारवंतांची हत्या, मन की बात, लाहोर भेट, संसदेच्या पायरीवर माथा टेकवून केलेले वंदन ते विविध मुद्दयांवर फिरवलेली पाठ, बेताल वक्तव्ये, आधार ची किचकट गुंतागुंत, पत्रकार परिषदेला दिलेला खो, विदेशातील जनसमुदायांसमोर नव्हे तर विदेशातील भारतीय जनसमुदायांसमोर केलेली मोघम भाषणबाजी, देशाकडे मागील साठ वर्षातील राज्यकर्ते व त्यांच्याकडून केलेल्या कामाचा हिशोब मागता मागता पुढील पन्नास शंभर वर्षे देशाची करून ठेवलेली अधोगती, मंत्री व त्यांच्या शैक्षणिक पात्रता यावर ओढलेली काळी चादर, विजय मल्ल्या, ललित मोदी, निरव मोदी, चोक्सी, यांनी चोरी करून देशाच्या चौकीदारासमोर केलेले पलायन, विदेशातील काळा पैसा व त्यातून मिळणाऱ्या पंधरा लाखांवर एफ.डी चे रचलेले मनोरे, रोहित वेमुलाच्या आत्महत्येसंदर्भात नव्हे तर जणू त्याची मूळ जात शोधण्यासाठी नेमलेली तज्ज्ञ समिती,  कन्हैया, जे.एन.यु , पुण्यातील एफ टी आय मधील नेमणुका, मंडळांची नांवे बदल, मानाच्या पदांवर लाळघोट्या भक्तांच्या  नेमणुका, सामाजिक माध्यमांचा अतिरेक, कधी असिफा तर कधी गीता, साधूंना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा, ऑक्सिजन सिलेंडर विना तडफडून तडफडून जीव सोडणारी निष्प्राण बालके, उना, कोरेगाव भीमा येथील दंगली, मंत्र्यांचे घोटाळे त्यांना लगेच मिळणारी क्लीन चिट, रेल्वे अपघात, आंतरराष्ट्रीय बाजारात कवडीमोल दरावर किमती असतानाही पेट्रोलची भारतातउच्चांकी किंमत, डोकलामचा तिढा, बुलेट ट्रेन, लोणारचे राजकारण, साधू साध्वीची बेताल वाणी, स्वच्छ भारत अभियान, जी.एस.टी ला आधी असणारा विरोध व नंतर लागू झाल्यापासून आजतागायत न सुटलेले कोडे - ना मंत्र्यांना, ना व्यापाऱ्यांना, व ना सामान्य माणसांना, पण लक्षात घेतो कोण?

स्वातंत्र्योत्तर काळापासून अखंडीत व यशस्वीपणे सुरू असलेल्या योजना आयोगावर हातोडा  मारून अस्तित्वात आलेला नीति आयोग आहे कुठे, काय करतोय, कोणालाच माहिती नाही, सरदार पुतळा, आंबेडकर स्मारक, चहा पुराण तर दहा लाखांचा सूट, व्यापम घोटाळा, अनेकांचे बळी, तिहेरी तलाक, ब्रह्मचारी वक्त्यांनी उधळलेली हिंदूंना पाच पाच संतानांची मुक्ताफळे, लोकसभा/राज्यसभा यांचे सभापती की सभापतींची लोकसभा/राज्यसभा जिथे कोणालाच बोलू दिले जात नाही ना ऐकून घेतले जात नाही, शासकीय कार्यालयांत राष्ट्रपुरुषांपेक्षा प्रधानसेवकांची तसबीर मोठी, शाळेतील अभ्यासक्रम व त्याच्याशी छेडछाड, निवडक उद्योग समूहाच्या फायद्याच्या सरकारी योजना, काहींची चाळीस हजार रुपयांची गुंतवणूक ऐंशी हजार कोटी रुपये झाली, राज्यपालांबरोबर संगनमत करून आलेली अल्पमतातील सरकारे, प्रश्न त  खूप आहेत, परंतु विचारले कोणी तर देशद्रोही ठरविले जाण्याची भीती, शेतकरी आत्महत्या, वाढतच जाणारी सुशिक्षित तरुणांची बेरोजगारी, एकीकडे स्वदेशीचा नारा तर दुसरीकडे बहुराष्ट्रीय कंपन्यांना  रेड कार्पेट, स्वस्तातील लढाऊ विमानांची तिप्पट दराने खरेदी, मंदिर व मशीद यांचे भिजत घोंगडे, काश्मीरच्या 370 कलमाची असहायता, रोहिंगे, अरुणाचल प्रदेश व चीन वाद, सैन्यातील वरिष्ठांच्या वर्तवणूकविषयी व मिळणाऱ्या सोयी सुविधांविषयी कैफियत मांडणारा जवान, भीम अॅप चा उदो उदो, भीमराव रामजी आंबेडकर, सतराशे साठ देशांना भेटी व प्रमुख यांना आलिंगन पण देशातील पीडितांच्या कुटुंबाचे नाही कसलेच सांत्वन, घसरलेला विकासदर व वाढलेली गुन्हेगारी व बेरोजगारी, कॅशलेस ट्रांझक्शन, व ए टीएम मध्ये पैशांचा ठणठणाट, मी बोलणार फक्त तुम्ही निमूटपणे ऐकायचं, तुमचा आवाज, तुमचे प्रश्न मी ऐकेल किंवा ऐकणार ही नाही, मेरी मर्जी सरकार, बेताल वक्तव्य करणारे लोक, राणी पद्मावती च्या आत्मसन्मानासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे कोणाच्या जीवंत लेकीवर अत्याचार झाला तर मात्र घरातच बसून गंमत पाहणारे, लेखकांनीच स्वतःच्या लेखणीस दिलेला जाहीर गळफास, कळपातील लोकांनाच जाहीर होणारे राष्ट्रीय सन्मान, संविधानामुळे मिळालेली सत्ता सोडवत नाही आणि आरक्षणाचा तिढा सोडवायचा नाही,  सी बी आय , न्यायलये जणूं हुकूमाचे पत्ते लागली गरज की दे सोडून...

चित्रपट गृहातील राष्ट्रगीत, मशिदींचे भोंगे, धार्मिक मिरवणुका, भडक हिंसाचार, बघ्याची भूमिका घेऊन चोथा होईपर्यंत चघळणारे तुम्ही आम्ही, तसेच नवीन मुद्दा मिळाला की जुने विसरून जाणारे ही आपणच.

एवढी अगतिकता, एवढी कळकळ, आधी नाही जाणवली रे कधीच, बोलायचे तर खूप काही आहे पण ऐकणार रे कोण? आणि जरी कोणी ऐकलेच तर उत्तर देईल का? मन खूप सुन्न होते कधी, उगीचच शांत बसते विचारांच्या गोंधळात, संशयकल्लोळ, काहूर माजते विचारांचे नुसते, काल हे घडले, आज हे घडले आणि उद्या आणखी काय होणार? नाही मिळत रे या प्रश्नांची उत्तरे आणि तरी तू मला विचारतोस..." डियर इंडिया, व्हाट्स रॉंग विथ यू?"

आणि मी स्तब्ध, शांत, आपली लिखाणाची डायरी व पेन उचलतो व इंडियाकडे पाठ करून चालत राहतो. कारण आता मला स्वतःलाच प्रश्न पडला आहे..... डियर व्हाट्स रॉंग विथ मी?