१५. बहिर्मुख...अंतर्मुख...
ज्ञान ज्योतीतूनच प्रकाशाचा उद्रेक व्हावा ही इच्छा...
आंतरिक जागरूकता वाढली की, बाह्य जागरूकता कमी होऊ लागते. बाह्य विश्वातील मनाची एकाग्रता अपोपच भंग पावते. खरतरं हे मायेतून विलग होण्याचं लक्षण. आतला आवाज मोठ्याने ऐकू येऊ लागला की, बाहेरचा आवाज आपोआपच कमी ऐकू येतो. त्यात नवल ते काय! पण ही सामान्यांना बोध न होऊ शकणारी बाब...मन तासंतास भरकटत रहाते,कुठेतरी शून्यात हरवून बसते. नकळत लागणारी ती तंद्री बरी वाटते. परंतु शरीराला याचा बोधच नसतो. वर्तमानात काय घडत आहे हे त्याच्या मर्यादे क्षमतेच्या पलीकडचेच. अशाने नकळत मायेची विरक्ती येऊ लागते. असूनही न असल्याची भावना नकळत समाधान देत असते.पण बाह्य शरीराला ही बाब चिंतीत करणारी असते. आता इंद्रिय शिथिल होऊ लागलेली असतात. त्यांच्या गरजा ही कमी-कमी होत चाललेल्या असतात. ज्ञानेंद्रियांची वासना मंदावते. शारीरिक गरजांकडे दुर्लक्ष होऊ लागते. मायेची कटकट वाटू लागते. तिच्या पासून जितके अलिप्त रहाता येईल तितके बरे वाटू लागते. जगाकडूनच्याअपेक्षा नष्ट होतात. मायेच्या चिखलात बरबटलेल्या हातांशी हातमिळवणी करण्याची घृणा वाटू लागते. या चिखलातून सुटका करून घेण्याची इच्छा कुठेतरी निर्माण झाल्याची जाणीव नकळत मेंदूला अस्वस्थ करते. अधिकाधिक प्राप्त करण्याची इच्छा असल्याने बाह्य जगातील मायेच्या चिखलात आकंठ डूबलेल्या नि डूबू पहाण्याची महत्त्वकांक्षा असणाऱ्यांची कीव वाटू लागते. आपणही या चिखलात इतरांसारखे बुडालो की जग आपल्याला शहाणे म्हणणार किती हा मूर्खपणा! नजरेला दिसेल नि संतुष्टीच्या प्रतीक्षेत दिसेल तेवढं सर्व मिळवायचं,साठवायचं आणि आयुष्यभर जमा करतच रहायचं यातच काय तो आनंद, हेच जीवनाचे यश,हीच सुखी समृद्धी जीवनाची संकल्पना. ज्यात कशाचीच शास्वती नाही. या मायेच्या पाठी कितीही धावलो तरी एक दिवस हे सर्व निरुपयोगी ठरणार आहे हे ऐकून घ्यायला मन तयार नसतं. तर बऱ्याचदा सर्व कळतं पण वळत मात्र नाही अशी स्थिती असते. मर्यादा आडव्या येतात,नाती आडवी येतात. क्षणभंगुर स्वप्ने,आशा-आकांशा,सुख-समृद्धीच्या संकल्पना आडव्या येतात.तर कधी-कधी या दोन विरोधाभासी जगाची तुलना करण्याचाही मोह आवरता येणे कठीण होऊन बसते. कुठे ते आंतरिक विश्वातील ज्ञान गंगेत डुबकी मारण्याचे सुख व कुठे ते क्षणभंगुर सुखाने, स्वार्थाने ग्रासलेले महत्त्वकांक्षी विश्व? तुलना व्यर्थ. आणि मग...जगाला मायेच्या अंधाराने व्यापून टाकले आहे हे क्षणो-क्षणी जाणवतं रहाते. या अंधारातच जगाला हरवून जायचे आहे, दुसऱ्यांचे या अंधारात हरवलेले अंधःत्व व स्वतः अंध होण्याची महत्त्वकांक्षा या विश्वाला किती गडद अंधारात घेऊन जाणार आहे याची कल्पना करुन अंतरतम्याचा आवाज ऐकू येणारे मन या निरर्थक महत्त्वकांक्षी विश्वापासून दूर पळू लागते. बाह्य विश्वातील, अंधारात घेऊन जाणारे अज्ञान पाहून ज्ञानेंद्रियांमार्फत शरीरापर्यंत पोहोचणाऱ्या संवेदनांची जाणीव नकोशी वाटू लागते. बाह्य विश्वात पसरलेला गोंधळ पाहून,अंतर्मुख होऊन शांत बसून राहण्याचा कल वाढतो. मायेत हरवलेल्या कोणाला काही समजवण्याचे धैर्य एकवटले जात नाही. या अवस्थेत शरीराची चिंता अधिकच वाढते. त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची भीती आपोआपच अनैसर्गिक गरजा वाढवते. आपापल्या संकल्पनेनुसार सुख प्राप्तीच्या लालसेने आंतरिक विश्व व बाह्य विश्व यांचे द्वंद्वव सुरू होते. या द्वंद्वात मनाची घुसमट होऊ लागते. मनातील ज्ञानरुपी ज्योतीची तळमळ वाढते. अंतरातम्याने तेवत ठेवलेली सुष्म ज्योती मनाच्या या घालमेलीत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि मग कधीतरी एक दिवस याच संघर्षात, अंतरातम्याच्या धग-धगत्या ज्ञान ज्योतीतूनच प्रकाशाचा उद्रेक होऊन सर्वत्र पसरलेल्या मायरुपी अंधाराचा नायनाट व्हावा ही इच्छा नकळत कुठेतरी जन्म घेऊ पहाते.