१. धगधगती दिवाळी
शाळेला दिवाळीची सुट्टी लागून दोन-तीन दिवस झाले होते. अभ्यासात न रमणारे मन गोष्टीची पुस्तके वाचण्यात, टीव्ही बघण्यात आणि खेळण्यात चांगलेच रमले होते. त्याची परीक्षा नुकतीच संपली होती. ह्या सुट्टीत शाळेच्या पुस्तकांना हातही लावायचा नाही असे त्याने मनोमन ठरवले होते. त्यामुळे हल्ली त्याचा बराचसा वेळ मौजमजा करण्यामध्येच जात होता.
दिवाळीचा पहिला दिवस होता. तो आज भल्या पहाटेच उठला होता. चंदनाचे उटणे लावून त्याची आंघोळ झाली होती. नवीन कपडे परीधान करुन घराबाहेर पडण्यासाठी तो उत्सुक होता. त्याने आपले फटाके एका पिशवीमध्ये घेतले आणि तो घराबाहेर पडला. घराबाहेरील मैदानात त्याचे बरेचशे मित्र फटाके फोडण्यासाठी जमा झाले होते. सर्व मित्र मिळून आपापले फटाके फोडू लागले. फटाके फोडताना सर्वांनाच खुप मजा येत होती. ही मजा फार काळ टिकावी म्हणुन तो एक-एक करत त्याच्या पिशवीतील फटाके बाहेर काढुन फोडत होता. त्याच्या पिशवीतील फटाके आता संपण्याच्या मार्गावर आले होते.
फटाक्यांची पिशवी त्याने एका सुरक्षित ठिकाणी ठेवली होती. त्यातुन फटाके घेऊन काही अंतर थोडा दुर जाऊन तो फटाके फोडत होता. आणि मग पुन्हा फटाके घेण्यासाठी ती पिशवी ठेवलेल्या ठिकाणी येऊन पुन्हा त्यातील काही फटाके घेऊन फोडण्याचा त्याचा कार्यक्रम सुरु होता.
त्याच्या हातातील फटाके संपल्याने पिशवीमधील उरले-सुरलेले फटाके आणण्यासाठी तो पिशवीजवळ आला. पिशवीत हात घालून त्याने फटाके चाचपुन पाहिले. तेव्हा पिशवीतील उरलेले फटाके अचानक कमी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. तितक्यातच त्याचे लक्ष समोर खेळत असलेल्या दोन लहान मुलांकडे गेले. त्यांच्या हातातही फटाके होते. त्यांच्या अंगावरील कपड्यांवरुन त्याला त्यांच्या गरीबीचा अंदाज आला. अर्धनग्न अवस्थेत असलेली ती मुले त्याचेच फटाके वाजवत होती; ही गोष्ट क्षणार्धातच त्याच्या लक्षात आली. त्या मुलांनी त्याचे फटाके चोरले होते. या गोष्टीचा त्याला खुप राग आला होता. रागाच्या भरात तो त्यांच्या दिशेने जाऊ लागला, तशी ती मुले थोडी सावध झाली आणि बाजुलाच असलेल्या झोपडीत पळून गेली. बराच वेळ झोपडी बाहेर उभे राहुन त्याने ती मुले झोपडीबाहेर पडण्याची वाट बघीतली. पण ती मुले काही बाहेर येण्याचे नाव घेत नव्हती. मग शेवटी कंटाळुन तो पुन्हा आपल्या मित्रांमध्ये खेळण्यासाठी सामिल झाला. त्याने हा सर्व प्रकार त्याच्या मित्रांनाही सांगितला होता. त्यामुळे त्यांनाही त्या मुलांनी केलेल्या कृत्याचा खुप राग आला होता. पण चार फटाक्यांसाठी यांच्या नादी कोण लागणार या विचाराने त्यांनी तो विषय तिथेच संपवला.
खेळून घरी परतल्यावर त्याला खुप भुक लागली होती. तो नाश्ता करु लागला. पण त्याचे लक्ष मात्र खाण्याकडे नव्हते. काही वेळापूर्वी घडलेला प्रसंग त्याला सारखा-सारखा आठवत होता. ‘त्या मुलांनी आपल्याला न विचारताच आपले फटाके चोरले’ या गोष्टीचा त्याच्या मनातील राग अद्याप कमी झाला नव्हता. तरीही त्यांची दयनीय अवस्था पाहुन त्यांच्या गरिबीचे त्याला दु:खही वाटत होते. ह्या प्रसंगामुळे, त्या मुलांच्या अंगावरील मळलेले आणि ठीक-ठिकाणी फाटलेले कपडे, त्यांची एवढीशी झोपडी, त्यात राहणारे त्याचे मोठे कुटुंब या सर्व गोष्टींचा तो पहिल्यांदाच विचार करत होता. त्यांच्या दारिद्रयामुळेच आज त्यांच्यावर फटाके चोरण्याची वेळ आली होती, शेवटी ती देखील माणसेच, त्यांना देखील मन आहे. त्यांना सुद्धा फटाके फोडून आनंदी होण्याचा अधीकार होता. आपण आपले सण आनंदाने साजरे करायचे पण यांना मात्र सर्वच दिवस सारखे. गरीबांना सण साजरे करण्याचा अधीकार नाही का? का त्यांनी फक्त रोज कामच करत आपले आयुष्य घालवायचे? ही लोकं माणसे नाहीत का? माणुस म्हणुन त्यांच्या अशा मन मारुन जगण्याचा कोणी विचार करत असेल का? यांची गरीबी कधी नष्ट होऊ शकेल का? यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण तरी किती असतील? आपण त्यांच्याकडे कुठल्या नजरेने बघतो? अशा मुलांचे भविष्य कसे असेल? अशाप्रकारच्या कितीतरी प्रश्नांनी त्याच्या मनाला भांबावून सोडले होते. आता त्याला त्या मुलांची दया येऊ लागली होती. त्या मुलांचे निरागस चेहरे सारखे-सारखे त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागले. आपल्या फटाक्यांमुळे त्यांच्या जीवनात काही क्षण का होईना पण आनंद मात्र नक्कीच निर्माण झाला असेल या विचाराने त्याला थोडेसे समाधान वाटले.
दुसऱ्या दिवशी तीच मुले पुन्हा त्याच्या नजरेस पडली. त्यावेळी ती मुले फुटलेल्या फटाक्यातील दारु जमा करुन तिला आग लावण्याचा प्रयत्न करत होती. त्याला त्यांची ही स्थिती पहावत नव्हती. त्या मुलांनी कालच्या दिवशी केलेल्या कृत्याचा राग आत्तापर्यंत त्याच्या मनातुन नष्ट झाला होता. तो त्यांच्या जवळ गेला तशी ती मुले पुन्हा पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. पण त्याने त्यांना पळून जाण्यापासून रोखले त्यातील एका मुलाच्या हातात त्याने आपल्याजवळील काही फटाके दिले. फटाके मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पसरली. कदाचितत त्यांच्या जीवनात, पहिल्यांदाच त्यांना कोणीतरी फटाके दिले असतील. हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व काही स्पष्ट करत होता. काही वेळातच ती मुले फटाके घेऊन आपल्या झोपडीत गेली. अद्याप त्यांनी त्यातील एकही फटाका फोडला नव्हता. आता ते फटाके त्यांचे झाल्याने ते त्यांना फोडण्याची घाई करणार नव्हते. कदाचित ते फटाके फोडण्याकरिता चांगल्या क्षणाची वाट पाहत असावेत.
त्यांच्या झोपडीच्या बाहेर त्यांच्याच कुटुंबातील कोणीतरी स्त्री चुलीवर भाकऱ्या भाजत होती. तीन दगडांची साधी चुल होती ती! ती मुले झोपडीच्या आत जाताच तो आपल्या मित्रांबरोबर खेळण्यासाठी तिथुन निघुन गेला. खेळुन झाल्यानंतर तो आपल्या घरी परतला. त्यावेळी दुपारचे बारा-एक वाजले असतील. त्या दिवशी कडक ऊन पडले होते. उन्हात खेळल्याने तो खुप घामाघुम झाला होता. घरी आल्यावर गटागटा पाणी पिऊन त्याने टिव्ही लावला. थोड्यावेळाने त्याचे जेवण झाले तरी टिव्ही अजुनही सुरुच होता. एक- दीड तासानंतर जेव्हा त्याला झोप येऊ लागली तेव्हा कुठे त्याने तो टिव्ही बंद केला.
आत्तापर्यंत तो गाढ झोपी गेला होता. बाहेरुन कसलेतरी आवाज त्याच्या कानावर येत होते. कोणीतरी ओरडत आहे, रडत आहे अशाप्रकारचे ते आवाज होते. पण अजूनही झोप त्याच्या डोक्यावरच होती, त्याला उठायचा कंटाळा आला होता. तो आवाज आता अधिकच वाढला होता. आता त्याला स्पष्टपणे लोकांच्या बोलण्याचा, आरडा ओरडा करण्याचा, आणि रडण्याचा आवाज ऐकु येऊ लागला. तसा तो जागा झाला आणि खिडकीतून बाहेरचे काही दिसते का? ते बघु लागला. त्याच्या घरातलेही खिडकीतुनच बाहेर बघत होते. त्यावरुन बाहेर नक्की काहीतरी गंभीर घडले असावे या गोष्टीचा त्याला अंदाज आला होता.
त्याने खिडकीबाहेर डोकावून पाहिले. त्याच्या घराजवळ असलेल्या दोन झोपड्यांना आग लागली होती. त्यातील एक झोपडी ती दोन मुले राहत असलेली झोपडी होती. आणि दुसरी सुद्धा त्यांच्यापैकीच कुणाचीतरी होती. दोन्ही झोपड्या भिषण आगीत जळत होत्या. आत्तापर्यंत तिथे बरीचशी माणसे जमा झाली होती. कोणी आग विझवण्याचा प्रयत्न करत होते, तर कोणी झोपड्यांच्या आतील सामान वाचवण्याचा.
तो आणि त्याच्या घरातले सुद्धा आता त्या ठिकाणी पोहोचले. जळणाऱ्या झोपड्यांपैकी एका झोपडीमध्ये कोणीही नव्हते, तर दुसऱ्या झोपडीमधील ती दोन लहान मुले झोपडी बाहेर होती. त्यांच्या झोपड्यांना आग लागुनही ते दोघे सुरक्षित असल्याने त्याला बरे वाटले.
दोन्ही झोपड्यांमध्ये राहणारी सर्व मोठी माणसे कामावर गेली होती. ती माणसे इमारतींच्या बांधकामात रोजंदारीवर मिळेल ती कामे करणारी होती. आपल्या दोन्ही झोपड्या जळताना पाहुन ती मुले मोठ-मोठ्याने रडत होती. त्यातील एका मुलाने झोपडीतील काही वस्तू आगीपासून वाचवल्या होत्या. परंतुतरीही त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी झोपडीसकट जळून खाक झाल्या होत्या. त्यामध्ये त्यांचे कपडे, अंथरुण, टिव्ही आणि काही पैसेसुद्धा जळून गेल्याचे नंतर समजले. घडलेल्या भयंकर प्रकाराने ती दोन्ही मुले पार खचली होती. तिथे जमलेल्या माणसांनी त्या मुलांच्या घरातले येईपर्यंत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता; ज्याचा फार काही उपयोग होणारा नव्हता. ज्या डोळ्यांनी आपले संपूर्ण घर जळताना बघितले होते, त्या मुलांच्या डोळ्यांमध्ये आता अश्रुशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते.
ही आग नेमकी कशामुळे लागली? ह प्रश्न विचारला असता, त्या मुलांनी जे काही सांगीतले ते खुप भयंकर-भयावह व अस्वस्थ करणारे होते. त्या मुलांकडे काही फटाके होते. त्यांनी त्या फटाक्यांमधील सर्व दारु एकत्र केली. कारण असे केल्याने एक मोठा फटाका तयार होईल अशी त्यांची वेडी आशा होती. जेव्हा फटाक्यांच्या त्या दारुवर त्यांनी चुलीतला एक धगधगता निखारा ठेवला तसा त्या फटाक्यांच्या दारुने पेट घेतला. क्षणार्धात आगीचा मोठा भडका उडाला. उन्हात तापलेल्या त्यांच्या गवताच्या झोपडीने आगीच्या त्या भडक्याबरोबर पेट घेतला. त्या मुलांना काही कळायच्या आतच ती आग वेगाने सर्वत्र पसरली. बघता बघता ती आग इतकी वाढली, की त्या दोन मुलांना ताबडतोब झोपडीच्या बाहेर पडावे लागले. तरी त्यातील मोठ्या मुलाने झोपडीतील काही मोजक्या वस्तू आगीपासुन वाचवल्या होत्या; याच गोष्टीचे त्यांच्या कुटुंबियांना समाधान मानावे लागणार होते.
त्या घटनेबरोबर त्या झोपड्यांमध्ये रहाणारी माणसे आपला उरला सुरला संसार घेऊन दूर कुठेतरी निघुन गेली. ती कायमचीच! हा सर्व दुर्दैवी प्रकार आपण त्यामुलांना दिलेल्या फटाक्यांमुळेच घडला ही गोष्ट न राहून त्या मुलाला अस्वस्थ करत होती. त्या मुलांबरोबर घडलेल्या दुर्दैवी घटनेसाठी तो मुलगा स्वत:ला दोषी मानत होता. त्या दोन मुलांचे दु:खी चेहरे त्याला कधीही विसरता येणारे नव्हते. त्या दिवशी ती मुले आपल्या कुटुंबाबरोबर निघुन तर गेली पण... जाताना त्याच्या मनात त्या धगधगत्या दिवाळीच्या आठवणी मात्र कायमच्या सोडून गेली.