प्रास्ताविक...आत्ताचा प्रश्न
उन्हाळ्याचे दिवस होते. सणसणीत ऊन पडले होते. घराबाहेर पडलेल्या सर्वांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्यात भरीत भर म्हणजे लाईट गेली होती. पंखा नसल्याने अधिकच गरम होत होते. गर्मीने बेजार झालेल्या बहुतेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली होती. त्यामुळे एकाच रांगेत असलेली फक्त काही मोजकीच दुकाने सुरु होती. नेहमी गजबजलेल्या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या माणसांची गर्दी सुद्धा फार कमी होती. बहुदा ऊनामुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळले असावे. त्या रस्त्याच्या एका कोपऱ्यात एक भली मोठी कचराकुंडी होती. जवळपास तीन-चार दिवसांपासून कचरा उचलणारी महानगरपालिकेची गाडी न आल्यामुळे, आतापर्यंत कचराकुंडीच्या बाहेर कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. ऊन तापल्यामुळे त्या कचऱ्याचा भयंकर घाणेरडा वास त्या रस्त्यावर पसरला होता. त्यामुळे रस्त्यावरुन येणारी जाणारी माणसे त्या कचराकुंडी जवळून जाणे टाळून प्रसंगी दुसऱ्या बाजुच्या रस्त्यावरुन ये-जा करत होती.
अशा स्थितीत एक स्त्री त्या कचराकुंडीच्या अगदीच जवळ जाऊन उभी राहिली. तीच्या अंगावर अत्यंत मळलेले जेमतेम कपडे होते. कपडे कसले? चिंध्याच होत्या त्या! पायात चपला नसलेली ती स्त्री आपली नजर त्या कचऱ्यावरुन भरभर फिरवत होती. तिला त्या कचऱ्यामध्ये कशाचा शोध होता? यापेक्षा ती इतका वेळ त्या ठिकाणी, कचऱ्याच्या उग्र वासात उभीच कशी काय राहू शकते? हाच मोठा आश्चर्यकारक प्रश्न होता. काही वेळाने तीला त्या कचऱ्यात काहीतरी दिसले. ज्यामुळे तीच्या चेहऱ्यावर थोडेसे तेज झळकू लागले. क्षणार्धातच ती त्या रस्त्यामधील साचलेल्या कचऱ्यामधून मार्ग काढत कचराकुंडीच्या अधिकच जवळ गेली. तीने त्या कचऱ्यामधुन एक मोठी पिशवी उचलली व ती पिशवी ती रस्त्याच्या दुसऱ्या कडेला घेऊन गेली.
रस्त्यावरुन येणारे जाणारे लोकं तिच्याकडे जराही लक्ष न देता आपल्याच नादात मुकाटपणे चालत होती. अग्नीचा वर्षाव करणारा सूर्य आकाशात तळपत असताना, ज्याला-त्याला आपापले काम लवकर उरकून घरी जाण्याची किंवा जिथे ऊन लागणार नाही अशा आडोशाच्या ठिकाणी जाण्याची घाई होती. त्यामुळे त्या स्त्रीकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडेही वेळ नव्हता.
त्या स्त्रीने कचऱ्यातून उचलेल्या त्या भल्या मोठया पिशवीची गाठ सोडून तीने त्यातुन एक थर्माकॉलचे ताट बाहेर काढले. आधल्या दिवशी, त्या रस्त्याच्याच बाजूला झालेल्या लग्न समारंभातील जेवण झाल्यावर टाकून दिलेली ताटे होती ती! बघता-बघता तीने एक-एक करत त्या पिशवीतुन सर्व ताटे बाहेर काढली. तीने त्या ताटांमधील लोकांनी खाऊन टाकलेले उरले-सुरलेले अन्न त्यातीलच एका ताटात जमा केले आणि ती आपल्या मार्गाने चालू लागली.
काही वेळ चालल्यानंतर तिचे घर आले. लाकडे, कपडे आणि होर्डिंग-बॅनरचे साहित्य यांच्यापासून बनवलेली एक झोपडी होती ती! ती लांबूनच येताना दिसल्यावर, त्या झोपडीतून तीची दोन लहान मुले धावत तिच्याजवळ आली. आणि तीला बिलगली. त्यानंतर ते तिघेही झोपडीत गेले. टाकलेल्या कचऱ्यातून जमवा-जमव करुन आणलेल्या त्या शिळ्या अन्नाचे तीने तीन वाटे केले. क्षणाचाही विलंब न करता ते तिघेही आनंदाने ते खाऊ लागले. काल रात्री भिक मागूनही पैसे किंवा अन्न न मिळाल्याने रात्रीपासून उपाशी असलेल्या त्या जीवांनी काहीच क्षणात ते अन्न फस्त करुन टाकले. कचऱ्यातून मिळालेल्या अन्नातून का होईना पण त्यांचा आजच्या दुपारचा जेवणाचा प्रश्न मिटला होता. त्यामुळे आता त्याच्या डोळ्यासमोर रात्रीच्या जेवणाचा प्रश्न आ वासून उभा होता.