६. नशीबातले जीवन
नुकतीच ट्रेन सुरु झाली होती. बऱ्याच दिवसांनी ते सर्वजण आज असा एकत्र प्रवास करत होते. ट्रेन तशी रिकामी असल्यामुळे सर्वांना बसण्याकरिता एकमेकांच्या आजु-बाजुलाच जागा मिळाली होती. बोलता-बोलता एक-एक विषय निघत होता. त्यावर त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगत होत्या. अशाच कुठल्यातरी विषयावरुन नशीबाविषईच्या गप्पा रंगत असताना त्यांच्या पैकीच एकाने त्याच्या बरोबर घडलेला एक प्रसंग सांगण्यास सुरुवात केली.
"काही वर्षांपूर्वी माझ्याबरोबर घडलेला तो जीवघेणा प्रसंग कधी आठवला, तर आजही अंगावर काटा येतो. जीव बैचेन होऊन जातो. भितीने हृदयाचे ठोके वाढू लागतात. कधी-कधी तर हा प्रसंग आपल्याबरोबर घडलेला आहे यावरच विश्वास बसत नाही. परंतू जेव्हा जेव्हा हा प्रसंग आठवला जातो तेव्हा-तेव्हा मला नशीब नावाच्या गोष्टीवर मात्र विश्वास ठेवावाच लागतो."
"त्या दिवशी सकाळीच माझे आणि माझ्या भावाचे मोठे भांडण झाले होते. त्यामागचं कारणही तसं फार महत्वाचं नव्हतं. शुल्लकशा कारणावरुन त्याने सकाळ सकाळीच घरामध्ये मोठा वाद निर्माण केला होता. त्या दिवशी मी त्याच्यावर भरपूर संतापलेलो होतो. त्याच्याशी भांडताना रागाच्या भरात मी त्याला वाटेल ते बोलून मोकळा झालो, तरी तो सुद्धा काही माघार घेण्यास तयार होईना. माझाच भाऊ तो! त्याने माझे पार डोके फिरवले होते. शेवटी त्याच्या दोन थोबाडीत मारुन भांडणाचा शेवट केला. माझी बॅग तर तयारच होती. पटकन बॅग उचलली आणि शाळेत जायला निघालो."
"आधीच भांडणामध्ये माझा बराचसा वेळ वाया गेला होता. त्यामुळे मी शाळेच्या दिशेने घाई-गडबडीत पटापट पावले टाकत चालत होतो. त्यावेळी मी पूर्वेत रहायचो आणि माझी शाळा होती पश्चिमेला... हे सर्व कशासाठी? तर चांगल्या शिक्षणासाठी. घरातल्यांची हौस बाकी काय? असो पण लांब असली, तरी आमची शाळा मात्र मस्त होती. जाऊदे... आपला विषय भरकटायला नको तर कुठे होतो मी... आं...ऽऽऽ हां मला शाळेत पोहोचायला आधीच उशीर झाला होता. म्हणुन रेल्वेच्या थेट पुलाखालुन म्हणजे थेट रुळावरुनच मी चालत होतो. कारण पुलावरुन जायचे म्हटले तर जिने चढुन पुल संपेपर्यंत चालायचे आणि मग पुन्हा जिने उतरावे लागले असते. त्यात माझा बराचसा वेळ वाया गेला असता आणि तसेही शाळेत पोहोचायला रुळावरुन जाणेच सोईस्कर होते ... कारण आमची शाळा स्टेशनच्या अगदी जवळच होती. पण पुलावरुन गेल्याने थोडेसे अंतर वाढायचे आणि तेच जर ह्या रुळावरुन मार्ग काढत गेलो, तर तिथुन शॉर्टकट होता."
"रुळावरुन चालताना मनामध्ये घरात घडलेला प्रसंग थैमान घालत होता. मी त्याला थोबाडीत मारायला नको होते. असेच सारखे-सारखे वाटत होते. पण त्यावेळी माझाही नाईलाजच होता. तशी आमची फार कधी भांडणे होत नाहीत... आणि झाली तर... तितक्यात त्याचे बोलणे मध्येच तोडत " ये तू मुळ विषयाकडे ये रे... तु रुळावरुन चालत होतास ना... मग पुढचे बोल पटपट... उगीच तुमच्या घरच्या गोष्टी नको मध्ये मध्ये." बरं. तर मी माझ्या विचारांच्या तंद्रीत तिथुन चालत होतो. त्या विचारांच्या तंद्रीत माझ्या अगदी समोर... ट्रेन, कधी आली, ते माझे मलाच कळले नाही. ज्यावेळी ट्रेनचा भोंगा वाजला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ट्रेन होती. ती फक्त एक ट्रेन नव्हती. तो मृत्युच होता माझा! जो मला समोरुन वेगाने येताना दिसत होता. क्षणभर तर मी स्तब्धच झालो होतो. अशावेळी मला काय करावे, काहीच सुचत नव्हते. काहीही करुन मला लगेचच त्या रुळावरुन बाजुला व्हायचे होते. मी त्या रुळावरुन बाजुला जाण्याच्या प्रयत्नात होतो. पण नेमक्या त्याच वेळी माझ्या पायातला बुट रुळामध्ये अडकला. एकिकडे वेगाने येणारी ट्रेन होती, तर दुसरीकडे त्या रुळामध्ये अडकलेला माझा पाय... मी खुप प्रयत्न करत होतो; पण माझा अडकलेला पाय काही केल्या तिथुन निघत नव्हता. शेवटी जोराने पाय खेचला तेव्हा कुठे माझा पाय त्या रुळामधुन बाहेर आला. पण बुट अजुनही रुळांमध्ये अडकलेलाच होता. मला त्याची पर्वा नव्हती. पण तोपर्यंत ट्रेन माझ्या अगदीच जवळ आली होती. कसलाही विचार न करता मी माझे शरीर त्या रुळावर झोकुन दिले. जसे काही मी त्या रुळाला तिथल्या सिमेंटच्या लोखंडी पट्ट्यांना आणि त्यातील खडींना आलिंगनच दिले होते. अशावेळी आपण कोणालाही आलिंगन देऊ शकतो. अशी निर्जीव गोष्टींना सुद्धा... त्यांचाही कधी-कधी आपल्याला आधार वाटतो. त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदाच मृत्युचे भय काय असते ते मी अनुभवले होते. धड-धड आवाज करत वेगाने धावणारी ट्रेन माझ्या अंगावरुन जात होती. तीच्या त्या वाढत्या भयावह आवाजाबरोबर माझ्या हृदयाची धडधडही वाढत होती. ट्रेन भर वेगाने माझ्यावरुन धावत होती. त्यामुळे माझे शरीर भीतीने थर-थर कापत होते. ट्रेनचा तो भयानक आवाज जणू माझ्या कानाचे पडदेच फाडणार असेच मला वाटु लागले होते. ट्रेनच्या भरपूर वेगामुळे माझ्या अंगावर भरपुर धुळ उडत होती. ती माझ्या नाका-तोंडातही शिरु लागली होती. त्यामुळे मला नीट श्वास घेणेही अशक्य झाले होते. त्यात भरीत भर म्हणजे ट्रेनच्या प्रचंड वजनामुळे आणि वेगामुळे रुळावरील सिमेंटच्या पट्ट्या आणि माझ्या दोन्ही बाजुचे रुळ थोडे-थोडे वर खाली होत होते. त्यामुळे रुळावर झोकुन दिलेले माझे शरीर सुद्धा दोन-तीन इंच वर खाली होऊन माझ्या संपूर्ण शरीरात कंपने निर्माण होत होती. ट्रेनची चाके वेगाने रुळाला घासून जात असल्याने त्या कंपनातुन आगीच्या ठिणग्या निर्माण होत होत्या. सुदैवाने त्या माझ्यापर्यंत पोहोचत नव्हत्या. परंतू त्या भयावह वातावरणात माझा जीव मात्र घुसमटु लागला होता. माझे डोके जड होऊन सर्व जग माझ्या भोवती फिरत असावे असा अनुभव येऊ लागला. त्यावेळी मला भोवळ येऊ लागली होती. तरी मनात नवे विचारचक्र अजुनही सुरुच होते. क्षणार्धात माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्याचा जीवनपट माझ्या समोर उभा राहिला. सुरुवातीला माझी माणसे मला आठवली. त्यांच्याबरोबर जोडलेल्या आठवणी कदाचित आता कायमच्याच मिटणार असे वाटु लागले. कसलीही पूर्वी कल्पना नसताना अशाप्रकारे अचानक इतका भयंकर मृत्यु यावा? अशी कल्पनाही कधी कोणी केली असेल का? आपल्या मृत्युनंतर लोकं आपल्याबद्दल काय विचार करतील? त्यांना आपल्या मृत्युचे सुख-दुःख वाटेल? की काहीच वाटणार नाही? त्यांनी मला कधी समजुन घेतले असेल का? माझी कुठली ओळख त्यांच्या मनामध्ये असेल? असे कितीतरी प्रश्न माझ्या मनात दाटुन आले होते. कदाचित त्या प्रश्नांची उत्तरे मला कधीच मिळणार नव्हती!"
"ट्रेनचा आवाज अचानक बंद झाला. सर्वत्र शांतता पसरली. माझ्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज मला स्पष्टपणे ऐकु येत होता. मी माझे खडीत खुपसलेले डोके भीत-भीत हळूच वर काढले. ट्रेन आता माझ्यापासून दूर निघुन गेली होती. माझ्या आजुबाजुला लोकांची गर्दी जमा होऊ लागली. कदाचित त्यांनी माझ्याबरोबर घडलेला सर्व प्रकार आपल्या डोळ्यांनी बघितला असावा. त्यांच्या पैकी एकाने मला हात दिला. मी त्याच्या हाताला पकडून उठलो. आणि आपल्याला कुठे काही लागले आहे का याच्याकडे लक्ष न देता मी माझ्या अवती भोवती जमलेल्या माणसांच्या गर्दीकडे बघु लागलो, ती सर्व माणसे फक्त माझ्याकडे बघत होती. त्यामुळे मी थोडासा अस्वस्थ झालो. माझ्याच निष्काळजीपणामुळे मला ह्या जीवघेण्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते. ज्यामुळे मला स्वत:ची थोडीशी लाज वाटु लागली होती. जमलेल्या माणसांपैकी काही माणसं आपापसात कुजबुजत होती, तर काही जणं मलाच प्रश्न करीत होती. त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत मी त्या गर्दीतुन वाट काढत पुढे-पुढे चालू लागलो आणि आपल्या शरीराकडे निरखुन पाहु लागलो. आश्चर्य म्हणजे मला कुठेही, साधे खरचटले देखील नव्हते. फक्त माझे कपडे मात्र खुप खराब झाले होते. आणि माझा बुट अजुनही त्या रुळामध्येच अडकलेला होता. रेल्वेच्या रुळावरील ते वीस-तीस सेकंदाचे क्षण माझ्या मन-मस्तिष्कवर जणु आता कायमचेच कोरले गेले आहेत."
इतके बोलून त्याने आपले बोलणे थांबवले. काही वेळाने त्यांचे इच्छित स्थानकही आले. तरीही सर्वांचे मन मात्र त्यांच्या मित्रांने सांगीतलेल्या प्रसंगाच्या विचारांमध्येच हरवून गेले होते.