१४. दुसरी बाजू
"म्हणालो ना... तू अजून अशा कन्सेप्टवर काम केलेले नाहीस; मग अजुन किती प्रश्न विचारशील? त्यापेक्षा तुला सर्व वाचूनच दाखवतो. म्हणजे प्रश्नच मिटला."
"हम्म... बरं चल सुरु कर पटकन. अजुन टाईमपास नको उगीच."
त्याने खिशातुन एक कागद काढला आणि तो त्याला त्यावरचा मजकूर वाचून दाखवू लागला.
"सकाळची अकरा-साडे अकराची वेळ होती. संपूर्ण रस्ता गजबजलेला होता. त्यामागचे कारणही तसेच होते. आज दसरा असल्यामुळे कुठल्या ना कुठल्या निमीत्ताने खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या माणसांमुळे, रस्त्यावर नेहमीपेक्षा थोडीशी अधिकच वर्दळ दिसत होती. त्या रस्त्याच्या कडेला लागूनच काही छोटी-मोठी दुकाने होती. त्यात टेलर, इस्त्रीवाला, किराणावाला सलून अशाप्रकारे एकाच रांगेत एकमेकांना चिकटून बरीच दुकाने होती. पण त्या सर्व दुकानांच्या रांगेत एक दुकान मात्र असे होते की, त्याकडे रस्त्यावरुन येणाऱ्या- जाणाऱ्या माणसांचे लक्ष आपोआपच वेधले जात होते. खरे तर त्याला नीट दुकानही म्हणता येणार नाही. सर्व सामान्यांच्या भाषेत त्याला ‘गाडी’ असे म्हणता आले असते.
रस्त्याच्या कडेला असलेल्या सर्व दुकानांच्या रांगेसमोरच अगदी रस्त्यावर उभी असलेली, एका हार विक्रेत्याची गाडी होती ती! बऱ्याच वर्षांपासून ती गाडी त्याच ठिकाणी उभी असल्यामुळे अशाप्रकारे रस्त्यात गाडी उभी केल्यामुळे, कोणालाही त्याच्याविषयी काहीच तक्रार नव्हती. किंबहुना त्या गाडीमुळे अद्याप कोणाच्याही कामात कधी अडथळा न आल्याने, ही बाब फार कोणाच्या लक्षातही येणारी नव्हती. त्या गाडीवर नेहमीच, म्हणजे सकाळचे आठ वाजल्यापासून ते रात्रीचे आठ-नऊ वाजेपर्यंत तो हार विक्रेता...हारवाला एकटाच बसत असे. बऱ्याच वर्षांपासून ती गाडी त्याच ठिकाणी असल्यामुळे त्याचा तीथे बऱ्यापैकी धंदाही होत असे. पण आजची परिस्थिती काहीशी वेगळी होती. आज त्या हाराच्या गाडीवर नेहमीचा हारवाला नसून, हार विकण्यासाठी त्याचा सहा-सात वर्षांचा लहान मुलगा त्या गाडीवर बसला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मुलाने आपल्या अंगावर वस्त्र म्हणून एक शर्ट आणि चड्डीच्या जागी मुलींचा स्कर्ट घातला होता. त्याने अशाप्रकारचे कपडे का परिधान केले होते? हे फक्त त्याचे त्यालाच माहिती असावे. त्याच्या अशा विचित्र वेशभुषेमुळे त्या रस्त्यावरुन येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांचे लक्ष आपोआपच त्याच्याकडे वेधले जात होते.
तिथल्याच एका सलूनमधल्या केस कापणाऱ्या न्हाव्याकडे आज अद्याप कोणीही गिऱ्हाईक न आल्यामुळे तो नव्हावी त्या रस्त्यावरील हाराच्या गाडीजवळ उभा राहून टाईमपास करत होता. तितक्यात त्याचे लक्ष त्या मुलाने आपल्या अंगावर परिधान केलेल्या मुलींच्या स्कर्ट कडे गेले. त्याबरोबरच त्याला हसू फुटले. "अरे मूर्खा तू हे काय घालून आला आहेस?" असे म्हणून तो त्याला चीडवू लागला. तितक्यातच त्याच्या जोडीला त्याच परिसरातील त्या न्हाव्याच्या ओळखीची दोन बिनकामी उनाड मुले तिथे आली. त्यांनीही त्या लहानग्या मुलाला त्याच्या कपड्यावरुन चिढवून, त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली. जवळपास वीस-पंचवीस वर्षांची ती दोन मुले आणि चाळीशीतील तो न्हावी, ही तीन माणसे मिळून त्या बिचाऱ्या लहान मुलाला सारखे चिढवून मुक्तपणे तोंडसूख घेत होते. मोठमोठ्याने हसत होते. त्या मुलाला वाटेल तसे काहीही बोलत होते. जणू अशा गोष्टी करण्यातच, त्यांच्या जीवनाचा खरा आनंद लपलेला असावा, अशाप्रकारचे त्यांचे ते विकृत वर्तन त्यांच्या तोकड्या बुद्धीमत्तेचा परिचय करुन देत होते. त्यातच त्यांचे घसा फाडून भेसुरपणे हसणे त्यांची खरी लायकी सुद्धा दर्शवत होते. ह्या सर्व गोष्टींचा त्या लहान मुलाला खुप त्रास होत होता. पण त्यांना काही बोलण्याची हिंमत मात्र त्याच्याकडे नव्हती. नाहीतरी करू तरी काय शकणार होता तो? तो चाललेला सर्व प्रकार निमुटपणे सहन करत होता. बरे इतके करुनही ते थांबले नाहीत त्यांनी मांडी घालून गाडीवर बसलेल्या त्या मुलाला, तिथे उठुन उभे राहण्यास सांगितले. पण काही केल्या तो मुलगा तसे करण्यास तयार नव्हता. कारण आपण जर उठून उभे राहिलो तर, आपण परिधान केलेला मुलींचा स्कर्ट सर्वांना अजुनच स्पष्टपणे दिसू लागेल आणि मग ते सर्व पुन्हा आपल्यावर हसू लागतील; हे त्याच्या आता चांगलेच लक्षात आले होते. तो मुलगा आपले म्हणणे ऐकत नाही हे लक्षात आल्याबरोबरच, त्या दोन टपोरी मुलांपैकी एकाने जबरदस्ती त्याचे हात ओढुन, त्याला आपल्या जागेवर उभे केले. त्यांनी तसे करताच त्या मुलने परिधान केलेले, ते कपडे अधिकच विचित्र दिसू लागले. त्यानंतर त्यांनी त्या मुलाला, त्याने परिधान केलेला स्कर्ट उतरविण्यास सांगितले. काहीही झाले तरी तो तसे करु शकत नव्हता आणि तसेही त्या मुलाने आपले शरीर झाकण्यासाठी कुठली वस्त्रे परिधान करावीत? हे सांगण्याचा त्यांना काहीही अधिकार नव्हता. पण तरीही ते, त्या मुलाला तो मुलींचा स्कर्ट आपल्या अंगावरुन काढुन टाकण्यास भाग पाडत होते. तेव्हा तो मुलगा "नाही. मी तसे करु शकत नाही. मागील एक महिन्यापासून माझे वडील खुप आजारी आहेत. त्यामुळे बरेच दिवस हाराची गाडी बंद होती...उपचारावर आजवर बराच पैसा खर्च झाला...आज दसरा असल्यामुळे निदान आज तरी धंदा होईल आणि आम्हांला चार पैसे मिळतील म्हणुन त्यांनी मला घरीच हार बनवून दिले आणि इथे येऊन विकण्यास सांगीतले...एक चड्डी फाटल्यामुळे आणि दुसरी चड्डी धुवायला टाकल्यामुळे मी नाईलाजाने माझ्या बहिणीचा हा स्कर्ट घालून इथे गाडी सांभाळण्यासाठी आलो. आज हा स्कर्ट घातल्यामुळे मला निदान माझे शरीर तरी नीट झाकता आले. इतकेच माझ्यासाठी पुरेसे आहे. बाकी मुलींचे कपडे आणि मुलांचे कपडे असा फरकच आम्हा गरीबांना माहित नाही." असे बरेच काही तो त्या निर्दयी लोकांना सांगत होता. पण त्यांच्यावर त्याच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट त्याचे बोलणे ऐकुन ते त्या मुलाच्या अंगावरील स्कर्ट खेचुन जबरदस्तीने उतरवण्याचा प्रयत्न करु लागले. तसा तो बिचारा लहान मुलगा आरडा-ओरडा करु लागला.
त्याच्या तो आवाज ऐकुन रस्त्यावरुन जाणारा एक तरुण पुढे आला. मगासपासून त्याने तिथे घडलेला सर्व प्रकार आपल्या डोळ्यांनी बघितलेला होता. तो तिथे आला आणि त्याने सरळ त्या उनाड मुलांपैकी एकाला कानाखाली झापड लाऊन दिली तेवढ्यात त्याच्या पाठोपाठच त्याचे पाच सहा मित्रही तिथे आले. इतक्या मुलांना एकत्र पाहुने ती दोन उनाडक्या करणारी मुले आणि तो न्हावी थोडे नरमले होते. "काय चाललंय? याला का मारलंस? तुझा काय प्रॉब्लेम हाय का? " दुसऱ्या उनाड मुलाने काहीशा लहान आवाजात त्याला विचारले. तसा तो तरुण थोडा मिश्कीलपणे हसला आणि बोलू लागला. "कमाल आहे तुमच्या लोकांची आज ह्या लहान मुलाने त्याचे शरीर झाकण्यासाठी पुरेसे कपडे नाहीत म्हणून त्याच्या बहीणीचा स्कर्ट थोड्यावेळेकरता परिधान केला, तर ते तुम्हांला पटत नाही. पण आज जेव्हा शिकल्या-सवरलेल्या मुली पुरुषांप्रमाणे शर्ट पँन्ट घालतात तेव्हा त्यांचे तसे वागणे तुम्हांला शहाणपणाचे लक्षण वाटते किंवा ते प्रोफेशनल आहेत असे वाटते. म्हणजे स्त्रीयांनी पुरुषांचे कपडे वापरले तर ते तुम्हांला चालते पण एखादा मुलगा कधी मुलींचे कपडे परिधान करतो याची साधी कल्पनाही तुम्हांला करवत नाही. बरं या मुलाने तसं कोणत्या परिस्थितीत केलं ते सुद्धा तुम्हाला माहीत आहे. त्याला काय हे कपडे घालून मिरवायचे होते? की हौस होती? आणि दुसरा मुद्दा आज स्त्री पुरुष दोन्ही समान आहेत, तर असे का? याचे उत्तर तुमच्याकडे नसणार याची मला खात्री आहे. स्त्रीयांनी पुरुषांची कामे करायची नाहीत, पुरुषांनी स्त्रियांची कामे करायची नाहीत, स्त्रीयांचे अमूक कपडे, पुरुषांचे अमूक कपडे, स्त्रीया म्हटले की त्यांनी असेच वागले पाहिजे, पुरुष म्हटले की त्याचे वागणे असेच असावे...अरे अजुन किती दिवस आपण हेच, तेच-तेच विचार करणार आहोत? ह्या विचारांच्या पलिकडे ही दुसरे एक जग आहे हे आपण किती सोईस्करपणे विसरतो. आजचा माणूस चंद्रादी ग्रहांवर पोहोचला. वैज्ञानिक क्षेत्रात दिवसेंदिवस होणाऱ्या प्रगतीविषयी तर बोलायलाच नको. पण तरीही अजून माणसाला स्त्री आणि पुरुषामधील भेदभाव बंद करता आलेले नाही. काय यालाच प्रगती म्हणतात? आपण कितीही मोठ-मोठे शोध लावले. वैज्ञानिक प्रगती केली तरी जोपर्यंत स्त्री आणि पुरुषांमधील भेदभाव करणाऱ्यांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपण विकसित झालो असे आपल्याला म्हणताच येणार नाही." इतके बोलून तो मुलगा शांत झाला त्याच्या बोलण्यामुळे त्या तीघांच्याही माना खाली गेल्या होत्या. त्याच्या बोलण्यामुळे कदाचित त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली असावी. आतापर्यंत त्याच्या बोलण्याच्या आवाजामुळे तिथे काही माणसे जमली होती. त्या मुलाच्या विचारांशी आपण सहमत आहोत हे दर्शवण्यासाठी त्यांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले."
"काय मग कशी वाटली कथा?" त्याची कथा ऐकुन त्याचा मित्र थोडासा धीर-गंभीर होऊन विचारमग्न झाला होता. त्याने त्याला दोनदा-तीनदा प्रश्न केल्यावर, कुठे तो त्याच्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला.
"संकल्पना चांगली आहे. परंतु..."
"काय परंतु... मनाला पटण्यासारखे नाही ना... परंतू हेच उदाहरण दूसऱ्या बाजुने मांडले असते तर नक्कीच पटले असते ना..."
"दूसऱ्या बाजुने म्हणजे?"
"म्हणजे मुलींच्या बाजुने रे..."
"हा... मं.ऽऽ तेच तर...ही कथा लैंगिक विषमतेवर भाष्य तर करते. पण मुलांच्या बाजूने यावर भाष्य केले ना तर ते ऐकायला...बघायला फार विचित्र वाटते रे... किंबहूना असा विचारच मनाला पटत नाही. आणि शेवटी-शेवटी तर खुपच भाषणबाजी वाटते."
त्यावर तो स्मीत हास्य करुन म्हणाला, "खरे आहे तुझे म्हणणे. ही संकल्पना बऱ्याच जणांच्या मनाला पटणारी नाही आणि शेवटी भाषणबाजीही वाटणार. पण कधीपर्यंत? जो पर्यंत तू एकाच बाजुने विचार करणे सोडून देऊन दुसऱ्या बाजुने विचार करणे सुरु करत नाहीस तोपर्यंत. मला माहित आहे तुला काय अपेक्षित होते. कथेत पुरुषाने स्त्रीवर अन्याय अत्याचार करायला हवा होता... हेच ना! म्हणुन मुद्दामुनच मी तुला ही कथा ऐकवली. कथेतील लहान मुलाने मुलींचा स्कर्ट परिधान केला साधं हे देखील तुला पटणार नसेल तर मग एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषावर अन्याय अत्याचार केला हे तर तुम्हांला सहनच होणार नाही."
"थोडासा विचार कर...ही कथा तर काल्पनिक होती. परंतु ती सुद्धा तुमच्या पचनी पडणारी नव्हती; तर मग तुम्ही सत्य स्वीकारूच शकणार नाही. वर्षानुवर्षे नाण्याची एकच बाजू बघण्याची तुम्हाला इतकी सवय लागली आहे की, नाण्याला दुसरी बाजु देखील असते याचा तुम्हाला विसर पडला आहे. त्यामुळे तुमच्या सारख्यांबरोबर अशा विषयांवर भाष्य करणे हा देखील मूर्खपणाच ठरेल नाही का?"