२. पक्षपाती रांगा
गणेशोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली होती. दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा सर्व मित्रांचे, मुंबईतील सुप्रसिद्ध गणपतीच्या दर्शनाला जायचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे ते सर्वजण सकाळी सात वाजताच त्या ठिकाणी पोहोचले. गजाननाच्या दर्शनासाठी भावीकांची मोठी रांग लागली होती. दर्शनासाठी असलेल्या या रांगेची नेमकी सुरुवात कुठुन होते? हे शोधण्यातच त्यांचा जवळपास अर्धातास निघून गेला तेव्हा कुठे त्यांना रांगेचे टोक सापडले. इतकी लांबलचक रांग होती ती! ते सर्व जण त्या रांगेत त्या रांगेत जाऊन उभे राहीले. क्षणार्धातच त्यांच्यामागे अजुन काही माणसे येऊन उभी राहिली. आणि बघता-बघता बघता त्यांच्यामागेही भावीकांची मोठी रांग तयार झाली. गणपती विसर्जनापर्यंत दररोज लागणारी ही रांग अशीच अखंड वाढत जाणार होती. दररोज लाखोंच्या संख्येने येणारे भाविक रांगेत तासंतास उभे राहुन गजाननाचे दर्शन घेणार होते.
दर्शनासाठी असलेली ही रांग अतिशय संथ गतीने पुढे-पुढे जात होती. जिचा सर्वांनाच कंटाळा आला होता. तरीही सर्वांच्या मनात दर्शनासाठी असलेल्या ओढीमुळे सर्वजण उत्साही दिसत होते. दोरीच्याआधाराने पुढे-पुढे जाणाऱ्या त्या लांब लचक रांगेमध्ये भाविकांची तुडुंब गर्दी भरली होती. त्या रांगेत आई-बापाबरोबर आलेली लहान मुले, मित्र- मैत्रिणींबरोबर आलेली तरुण मंडळी आणि वयोवृद्धही तासंतास उभे होते. संथगतीने पुढे सरकणाऱ्या रांगेचा वेग अचानकच वाढे त्यामुळे रांगेतील भाविकांची पुढे जाण्यासाठी धावपळ सुरु होई तर कधी-कधी रांग पुढे न गेल्यामुळे पाच-पाच मिनिटे आहे त्याच ठिकाणी थांबावेही लागे. अशाप्रकारे पुढे जाणाऱ्या रांगेचा अचानकच वाढणारा आणि कमी होणारा वेग सर्वांनाच जागृत ठेवण्याचे काम करत होता.
भाविकांच्या भक्तीची परीक्षा पहाण्यासाठी आगीच्या ज्वाळा ओकणारा सूर्य आता डोक्यावर आला होता. सतत पुढे-पुढे जाणाऱ्या रांगेमध्ये तासंतास उभे राहुन वैतागलेल्या भाविकांना तो अधीकच त्रस्त करत होता. त्यामुळे रांगेतील गर्दीतील भाविकांच्या शरीरातुन घामाच्या धारा वाहत होत्या. सुदैवाने रांगेच्या शेजारीच जागोजागी पाण्यासाठी उभारलेली दुकाने उपलब्ध असल्याने निदान पाण्यासाठी तरी तडफड होणार नव्हती. परंतू रांगेत एके ठिकाणी थांबून पाणी घेण्याच्या नादात रांगेतील कंटाळलेली मागची माणसे थेट पुढे जात होती.
भाविकांची परीक्षा घेऊ पाहणाऱ्या सूर्यनारायनाच्या प्रखरतेमुळे सर्वांचे अंग उन्हात भाजुन निघत होते. त्यातच तासंतास उभे राहिल्यायाने कित्येकांचे पाय दुखू लागले होते. कोणाला भुक लागली होती, तर कोणाला तहान ... तरीही या सर्व परिस्थितीवर मात करुन भाविक कसलीही तक्रार न करता मुकपणे पुढे-पुढे चालत होते. तर काही भाविक 'गणपती बाप्पा मोरया' अशाप्रकारच्या उत्स्फूर्त घोषणा देऊन, त्रस्त झालेल्या इतर भाविकांचे मनोबल वाढवून जल्लोशाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. तर काही आपापसात थट्टा-मस्करी, विनोद करुन आपला उत्साह टिकवून ठेवण्याचे कार्य करीत होते.
सकाळी सात वाजल्यापासून रांगेत उभे असलेल्यांनाही अद्याप बाप्पाचे दर्शन झाले नव्हते. परंतू त्यांची रांग मात्र मंडपाच्या जवळ आली होती. मंडपाजवळ मोठ्या जाड-जुड अशा दोरींच्या सहाय्याने उभ्या-आडव्या रेषा ओढाव्यात त्याप्रमाणे भाविकांच्या रांगेला स्वरुप प्राप्त झाले होते. आता निदान तासभर तरी त्यांना त्याच मैदानातून भविकांची रांग उलट-सुलट फिरणार होती. त्यामुळे लवकर दर्शन मिळावे या हेतुने मैदानातुन उलट-सुलट फिरणाऱ्या रांगेतुन बाजुच्या रांगेत शिरू पहाणाऱ्या माणसांकडे बघुन इतर भविकांचा मनस्ताप वाढत होता. तरी देखील ती मुले शांतपणे हा सर्व प्रकार पाहून त्यावर चर्चा करत होती. रांगेत सकाळपासून ते आत्तापर्यंत त्यांच्या पाठीमागे उभे असलेले एक तरुण जोडपे सुद्धा आपली रांग सोडून दुसऱ्या रांगेत शिरण्याच्या प्रयत्नात होते. त्याचे पाहुन त्यांच्या मागची बरीचशी मंडळी त्यांचे अनुकरण करु पाहत होती. आपली रांग तोडून दुसऱ्या रांगेत शिरण्यामुळे ढकला-ढकली, चेंगरा-चेंगरी सारखे प्रकार वाढत होते. एका रांगेतील लोकं आपली रांग तोडून दुसऱ्या रांगेत शिरल्याने आत्तापर्यंत जवळपास शंभर-दिडशे माणसे रांगेतुन आपोआपच त्यांच्या पुढे निघून गेली होते. रांगेतील सर्वांनीच जर असे केले असते, तर सकाळपासून इतक्या अडचणींवर मात करुन निमुटपणे तासंतास रांगेत ताटकळत उभे रहाण्याच्या कृतीला कहीच अर्थ उरला नसता. ज्यामुळे इतर भक्त मंडळी मूर्ख ठरलीअसती.
हा सर्व प्रकार त्या मुलांमधील एकाला सहन होणारा नव्हता. ज्यावेळी त्यांच्या पाठीमागचे ते जोडपे त्यांच्या बाजुची जाडजुड दोरी वरती करुन मधुनच दुसऱ्या रांगेत शिरण्याचा प्रयत्न करु लागली त्यावेळी त्याचा स्वत:च्या मनावरील ताबा सुटुन त्याच्या मुखातुन आपसूकच शिव्या बाहेर पडू लागल्या. एखाद्या धारदार शस्त्राने वार करावे असेच त्याच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द होते ते! रागाच्या भरात कसलेही भान न ठेवता तो त्यांना शिव्या देत होता. त्याच्या आवाजाने सर्वांना एक क्षण स्तब्ध केले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा सर्व प्रकार घडत असतांना त्याला थांबवण्याचाही कोणी प्रयत्न करत नव्हते. कदाचित रांग तोडून दुसऱ्या रांगेमध्ये शिरणाऱ्या बेशिस्त लोकांचा इतरांनाही त्या मुला इतकाच राग आला होता. त्या मुलाच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या शिव्यांमार्फत जणू त्यासर्व प्रामाणिक भाविकांचा मनस्ताप व्यक्त होत होता. त्यामुळे त्या मुला ने त्यांना शिव्या देणे कितपत योग्य होते, याचा विचार न करताना हा सर्व प्रकार मुकपणे पहाणाऱ्या सर्वांनीच जणु त्या शिव्या देणाऱ्या मुलाला मुकपणे आपला पाठिंबाच दिला होता.
पुन्हा रांग पुढे-पुढे जाऊ लागली. त्या मुलाचा राग आता शांत झाला होता. काही वेळाने अचानक रांग आहे त्याच ठिकाणी थांबवण्यात आली. रांग पुढे न सरकण्यामागचे कारण कोणालाच माहीत नसल्यामुळे लोकांची उलट-सुलट चर्चा रंगू लागली. सकाळपासून रांगेत उभे राहून कंटाळलेले लोक रांग पुढे जाण्याचे थांबल्याने अधिकच चीड-चीड व्यक्त करु लागले होते. काही वेळाने ‘आरतीची वेळ झाल्याने रांगेला तिथेच थांबवण्यात आले आहे’ ही बातमी सर्वत्र पसरली. परंतू काही वेळाने ती रांग पुढे सरकू लागल्यावर भाविकांना जे सत्य समजले ते काही वेगळेच होते. रांगेला पुढे जाण्यापासून मध्येच थांबवण्याचे कारण चित्रपटसृष्टीतील एक कलाकार होता आणि त्याहुन आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्यावर एक गंभिर गुन्हा केल्याचा आरोप सिद्ध झालेला असून, तो कलाकार नुकतीच जेलची हवा खाऊन सध्या काही दवसांच्या सुट्टीवर (पॅरोलवर) जेलच्या बाहेर आला होता. अशा प्रकारच्या गुन्हेगाराला कुठल्याही अडचणी शिवाय गजाननाचे दर्शन घेता यावे फक्त याकरीता त्याला कडक सुरक्षेसह थेट गजाननाच्या मूर्तीसमोर नेऊन सोडण्यात आले होते. तो व्यक्ती गुन्हेगार असला तरीही तो चित्रपट सृष्टीमधील एक नामवंतबकलाकार असल्यामुळे त्याच्याकरिता गजाननाच्या दर्शनाची खास अशी वेगळी सोय करण्यात आली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या सर्व निंदनीय प्रकाराचे थेट प्रक्षेपण, त्या संस्थेमार्फत जागोजागी बसवलेल्या टिव्हीवरुन उपस्थितांनाही दाखवण्यात संस्थेला धन्यता वाटत होती.
हा सर्व गैरप्रकार पाहिल्यावर त्या मुलाचा मनस्ताप आधीकच वाढला होता. या घटनेवरुन, आजकाल असे गैरप्रकार जागोजागी घडत असल्याचेही त्याच्या लक्षात आले. एखाद्या गुन्हेगाराला फक्त तो एक प्रसिद्ध व्यक्ती आहे म्हणुन खास प्रकारची वागणुक दिली जाते. त्याला व्यवस्थित दर्शन मिळावे याकरिता तासंतास रांगेत ताटकळत उभ्या असलेल्या सर्व भाविकांना संस्थेचे कार्यकर्ते मूर्तीमोर पाच सेकंदही नीट हात जोडून उभे राहु देत नाहीत. परंतू पाच मिनिटांपूर्वीआलेल्या बड्या हस्तींना मात्र याच संस्थेमार्फत थेट दर्शनाची सोय, तसेच त्यांच्या प्रार्थनेकरिता त्यांना बराच वेळही उपलब्ध करुन दिला जातो. बरं इतके करुनही त्या संस्थेची मंडळी थांबत नाहीत, तर त्या प्रसिद्ध हस्तीला आरतीचा मानही दिला जातो. अशा हस्तींबरोबर संस्थेच्या कार्यकर्त्यांना छायाचित्रे काढता यावीत यासाठी प्रसंगी लाखोंच्या संख्येने ताटकळत उभ्या असलेल्या भाविकांना वीस-वीस मिनीटे ते आहेत त्याच ठिकाणी तसेच उभे ठेवले जाते. म्हणजेच पैसा प्रसिद्धी आणी सत्ता यापुढे लाचार असलेल्या संस्थांमार्फत देवाच्या दारीसुद्धा सामान्य माणसापेक्षा खास अशी वेगळी वागणुक दिली जाते मग तो जरी गुन्हेगार असला तरी...म्हणजे एकीकडे मनात भक्ती भाव असो,नसो केवळ 'दुनिया जाते म्हणून आपणही देवदर्शनाला जावे व काहीही करून त्या मूर्तीचे दर्शन घ्यावे, अशी मानसिकता असलेले लोकं तर दुसरीकडे प्रामाणिकपणे देवदर्शनाकरिता रांगेत तासंतास उभे राहनाऱ्या भाविकांची पर्वा न करता नुकत्याच आलेल्या बड्या व्यक्तीला देवदर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी खटपट करणारी ती नालायक संस्था. किती भयंकर चित्र होते हे! आजकाल गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी सर्रासपणे आढळून येणारे हेच चित्र त्याला या सर्व गोष्टींचा पुन्हा नव्याने विचार करायला भाग पाडणारे होते.
एक काळ असा होता की, हाच गणेशोत्सव समाजाला संघटित करण्याचे मध्यम होता. विखुरलेल्या समाजातील लोकं एकत्र यावी, त्यांनी मिळून मिसळून जिवाभावाने गणेशोत्सव साजरा करावा. ज्याने समाजातील घटक एकमेकांशी जोडले जातील. त्यांच्यात बंधुभाव निर्माण होऊन समाजात एकोपा वाढेल या विचाराने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. परंतु हल्ली तो मूळ उद्देश हरवून या उत्सवाचे विकृतीकरण सुरू झाल्याचे दिसून येतं आहे. पर्यावरणाची पर्वा न करता प्लास्टर ऑफ पॅरिसचे मोठं- मोठे गणपती आणून, डिजेवर मोठ्मोठया आवाजात सिनेमांची अर्थहीन गाणी लावून, रात्र-रात्र पत्ते खेळून, राजकारण्यांना व बड्या हस्तींना खोटी प्रसिद्धी देऊन, गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत....हे सर्व निंदनीय प्रकार पाहून मनाला बधिरता येते. आणि मग,आजच्या पिढीतील हिंदू सणांचे होणारे विकृतीकरण विचार करायला भाग पाडते....हीच आहे का ती आपली महान संस्कृती? अशा प्रकारे सण उत्सव साजरे करून संस्कृती जपण्याची भाषा करणारी मंडळी कुठल्या प्रकारचा वारसा पुढील पिढीला देऊ इच्छितात? या सर्व गोष्टींमध्ये आपली पारंपरिक संस्कृती, एकात्मता, भक्तिभाव, प्रेम-जीव्हाळा या सर्व गोष्टींसाठी कुठेच जागा नसते.... इथे जागा असते ती फक्त चढा- ओढ, मजा-मस्ती आणि थिल्लरपणाला. मूठभर अज्ञानी, अविचारी समाजकंटकांच्या आशा विकृत धोरणांमुळे आणि वैचारिक लाचारीने त्यांना बळी पडलेल्या भ्रमित समाजामुळे आपल्या सण-उत्सवाचा कुठला अर्थ आज समाजात पसरत आहे? याची समस्त हिंदू बांधवांनी चिंता करावी अशी वेळ खरोखरचं आली आहे. जिथे खऱ्या भक्ताची नाही कदर,आणि नको त्यांना आदर,अशी स्थिती असलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी देव-दर्शनासाठी लावाव्या लागणाऱ्या अशा अर्थहीन व पक्षपाती रांगांची त्याला इतकी चीड आली की, त्या दिवसानंतर त्याने देवदर्शनासाठी अशा प्रकारच्या पक्षपाती रांगेत उभे रहाणेच सोडून दिले... ते अगदी कायमचे!