Get it on Google Play
Download on the App Store

शालिमार : प्रकरण पाचवे : The library

शालिमार : प्रकरण पाचवे : The library


कैलास सुतकी चेहरा घेऊन ऑफिस मध्ये बसला होता. स्वरा कधी नव्हे ती ३० मिनिटे लेट होती. जंजीर मधल्या अमिताभ प्रमाणे ती ऑफिसचा दरवाजा ढकलून आंत घुसली.


"तू रिपोर्ट केला नसेलच म्हणून मी लिहायला बसले." तिने एक फायल कैलास समोर ठेवली. "जन्नत हॉस्पिटल केस" वर ठळक अक्षरांत लिहिले होते. ती आपल्या सर्वांत चांगल्या फॉर्मल सूट मधेय अली होती. वाळवंटांत गुलाबाचे फुल दिसावे त्याप्रकारे त्या भकास सरकारी ऑफिस मध्ये स्वरा दिसत होती. इतकी हुशार असली तरी कधी कधी ती आपले काम थोडे जरुरी पेक्षा जास्तच सिरियसली घेते असे कैलासाला वाटले.


"स्वरा, there is no need for any report". कैलासने तिला सांगितले.


"पण राठोड साहेबानी काल किंचाळून सांगितले ते ? " तिने आश्चर्याने विचारले . "हा ! सर्वप्रथम जन्नत हॉस्पिटल केस आमच्या कडे unofficially आली. आज सकाळी मी टाइम्स मध्ये फोन केला तेंव्हा जन्नत हॉस्पिटलची आग म्हणजे अपघात होता आणि आग लागल्या नंतर पोलीस आणि अग्निशमन तिथे पोचले अशी कथा घडवण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस आणि भारत सरकार ह्यांनी मिळून हे प्रकरण मिटवले आहे. ऑफिसशिअली आम्ही त्या केसवर नव्हतोच. त्यामुळे रिपोर्ट लिहायचा प्रश्नच येत नाही. हो पण मी तुझा निबंध जरूर वाचेन. " त्याने हसत स्वराला म्हटले. ती थोडी ओशाळली होती.


"damn कैलास ! तेलही गेले आणि तूपही गेले अशी आमची अवस्था झाली आहे. सफायर ऑक्शन आणि आता जन्नत हॉस्पिटल दोन्ही केस मध्ये आम्ही पराभूत झालो आणि गुन्हेगार सुद्धा हाती आले नाहीत. shame on us !" स्वराच्या आवाजांत रुक्षपणा होता.


"पण वाईट वाटून नको घेऊस कारण मी तुला आज एका नवीन ठिकाणी घेऊन जाणार आहे. तुला नवीन मित्र मिळतील"


"मागच्या वेळी wayside pub मध्ये घेऊन गेला होतास आणि एका wanted गुन्हेगारांशी ओळख  करून दिली होती. ह्यावेळी कुणा अतिरेक्यांशी मित्र म्हणून ओळख करून देणार आहेस का ? " स्वराने विचारले.


"१९९८ साली मुंबई पुणे जुन्या हायवे वर एक सरकारी गाडी जात होती. त्यांत रेल्वे कर्मचाऱ्याचे पगार घेऊन सशस्त्र गार्डस चालले होते असा ऑफिशिअल रेकॉर्ड होता. त्याकाळी मुंबईत डॉन लोकांची उतरती कळा होती. अनेक शूटर्स इत्यादी बेकार फिरत होते किंवा पोलिसा पासून लपून फिरत होते. करीमुद्दीन मुसा ह्या शूटरने हि गाडी लुटण्याचा बेत आखला. आणि त्याने ती गाडी हायवे वर थांबवली आणि हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. पण गाडीचे गार्डस त्यांच्या अपेक्षे पेक्षा जास्त प्रशिक्षित होते. मुसा तिथेच मारला गेला. त्याचे दोन सहकारी गंभीर जखमी झाले आणि ती गाडी तशीच पुढे गेली." कैलास तिला सांगत होता. स्वरा ऐकत होती.


"हो मी वाचले आहे हे. त्याकाळी ती बातमी विशेष प्रसिद्ध झाली होती" स्वराने म्हटले.


"पण मी हे सर्व एका प्रत्यक्ष दर्शी व्यक्ती कडून ऐकले आहे." कैलास ने तिला सांगितले. ती थोडी विस्मयचकित झाली होती.


"रस्त्यावर झाड टाकून मुसाने रस्ता आधी ब्लॉक केला. आणि त्या गाडीच्या मागे आणखीन एक झाड टाकून मागील ट्रॅफिक बंद केले. ह्या दोन्ही झाडांच्या मध्ये फक्त हि गाडी आणि मुसाची एक व्हेन होती. मुसाने पुढून गोळीबार केला पण गाडीची पुढील कांच बुलेट प्रूफ होती. मूसच्या ४ साथीदारांनी छोटा बॉम्ब लावून त्या गाडीचे मागील दार उडवले. आंत २ सशस्त्र गार्डस असावेत अशी त्यांची अपेक्षा होती पण त्याऐवजी आंत ८ लोक होते. मुसा आणि त्यांचे सर्व साथीदार मारले गेले. आणि सशस्त्र गाडीतील जवानांनी झाड कसे बसे हटवून आपली गाडी तेथून नेलीच. पोलिसांनी नंतर येऊन पंचनामा केला. पण मुसाच्या चार साथीदारां पैकी एक होता छोटा अमिन. अमिन जवळ जवळ मेला असला तरी हॉस्पिटल मध्ये तो काही तास शुद्धीवर होता. अमीन ची एक बहीण होती ती तात्काळ हॉस्पिटल मध्ये आली. त्या दिवशी संध्याकाळी अमिन चा मृत्यू झाला आणि तो धक्का सहन ना होऊन त्याच्या बहिणीने आत्महत्या केली असे पोलिसांनी रिपोर्ट मध्ये लिहिले." कैलास आपली कथा स्वराला सांगत होता.


"पोलिसांनी लिहिले ? म्हणजे तसे घडले नव्हते असे म्हणायचे आहे काय कैलास ? " स्वराने प्रश्न केला.


"अंडरर्वल्ड च्या दुनियेत नाती कधी भरवशाची असत नाहीतच. अमिनची मोठी बहीण गुंड शंकर पुजारी ह्याच्या साठी काम करते असे. ती वॉन्टेड असल्याने कधीही ओळख दाखवत नसे. अमीन ला हॉस्पिटल मध्ये भेटणारी त्याची छोटी बहीणच नव्हती तर थोरली बहीण शबाना सुद्धा होती. फक्त शबाना हॉस्पिटल मध्ये कधी अली आणि कधी गेली ह्याचा थांगपत्ता कुणालाही लागला नाही. अमीन आणि शबानाचे त्या हॉस्पिटल वॉर्ड मध्ये संभाषण झाले. त्याच दिवशी संध्याकाळी अमीन चा मृत्यू झाला आणि भावनावेगाने त्याच्या छोट्या बहिणीने खिडकीतून उडी मारून जीव दिला".


"म्हणजे शबानाला त्या गाडीबाबत खूप महत्वाची माहिती होती आणि हि माहिती तिला होती हे इतर कुणालाही ठाऊक नव्हते" - स्वरा


"Correct. शबाना सध्या निवृत्त झाली आहे. ९० च्या दशका नंतर अंडरवर्ल्ड मधील बहुतेक डॉन पळून गेले किंवा मारले गेले. त्यांचे जवळचे साथीदार जे होते त्यांनी अज्ञातवास पत्करला. शबाना मला भेटली तेंव्हा तिने मला सांगितले कि अमीन ने त्या गाडीत काय होते हे पहिले होते. त्यांत रेल्वे चा पैसे नव्हता तर काळजीपूर्व बरणीत साठवून ठेवलेले मानवी गर्भ होते. हे सर्व भ्रूण सरकारी खर्चाने अत्यंत प्रशिक्षित कमांडोच्या निरीक्षणाखाली पुण्यात पाठवले गेले होते. त्यावेळी मी त्यावर विशेष लक्ष दिले नाही पण जन्नत हॉस्पिटलच्या प्रकरणा नंतर इथे काही तरी सरकारी षडयंत्र चालू होते असे वाटते"


"पण कैलास ह्या दोन्ही घटना फार जुन्या आहेत. वर्तमान परस्तिथीत वैद्यकीय क्षेत्राने इतकी प्रगती केली आहे कि आज काल असे प्रयोग होत असतील असे वाटत नाही आणि होत असले तरी त्यांत बेकायदेशीर असे काही आहे किंवा सरकारी षडयंत्र आहे असे कसे म्हणून शकतो ? " स्वराच्या प्रश्नात तथ्य होते. कैलास थोडा विचाराभिमुख झाला. कैलास कडे अफाट अनुभव होता आणि स्वराला ठाऊक नाहीत अश्या अनेक गोष्टी त्याला ठाऊक होत्या. भारत सरकार मध्ये काय काय षडयंत्र शिजत असतात हे तिला सांगूनही पटले नसते पण कुणी तरी त्यांचे लक्ष ह्या प्रकरणा कडे जाणून बुजून अश्यासाठी वेधले होते कि वर्तमान परिस्तिथीत काही तरी त्याचा संबंध होता. तो काय होत हे शोधणे आवश्यक होते.


कैलासाने आपले विचार स्वराला पटवले. शबाना बेगम ला भेटायची संधी मिळते हे पाहून स्वराने स्वराने आपले जे काही आक्षेप होते ते बाजूला ठेवले. मुंबई अंडरवर्ल्ड हा तिचा विषय होता. आपल्याला त्यातील सर्व काही ठाऊक आहे असे तिला वाटायचे पण शबाना बेगम विषयी तिला काहीही माहिती नव्हती. एकेकाळी मुंबई शहरांत दहशत माजविणाऱ्या एका गुंडाची महत्वाची साथीदार आज तिला पाहायला मिळणार होती.


ठाणे नगरपालिकेच्या मालकीचे एक स्मशान आहे. त्याच्या बाजूला थोडीशी वनराई. कैलासने गाडी त्या वनराईच्या गेट पुढे थांबवली. ९ फूट उंच भिंतीच्या मागे प्रशस्त अश्या जागेंत ती वनराई होती. "wow , हि जागा झपाटलेली वाटते कैलास" तिने कैलासाला म्हटले.


"हि झपाटलेली जागा आहेच मुळी पण भूता खेतांनी नाही तर काही अतृप्त जिवंत आत्म्यानी" कैलास


त्याने गेट उघडून गाडी आंत घेतली. आंब्यांच्या झाडांच्या मागे एक इमारत दिसत होती. अगदी सर्वसाधारण सरकारी इमारत.


"१९७० च्या दशकानंतर RAW ने देशभरांत अनेक सेफ हाऊस बांधली होती. RAW एजन्ट्स इथे कधी कधी आश्रय घ्यायचे किंवा आपल्या टार्गेट्स ना इथे ठेवायचे. इथे त्यांची शस्त्रे, दळणवळण उपकरणे इत्यादी ठेवली जायची. ह्या सर्वांचे बजेट प्रधानमंत्री कार्यालयातून गुप्तपणे यायचे. इंद्रकुमार गुजराल जेंव्हा पंतप्रधान झाले तेंव्हा त्यांनी RAW चे पंख कापले. RAW सारख्या संघटना कायद्याच्या खालून काम करतात त्यामुळे गुन्हेगार, माफिया इत्यादींशी त्यांचा जवळचा संबंध असतो. गुजराल ह्यांनी तो निर्णय घेतल्या नंतर अनेक ऍजेंट्स नि RAW चे रिसोर्सेस आपल्या नावावर करायचा प्रयत्न केला. कागदोपत्री कुठेही ट्रेल नसल्याने ते सहज शक्य सुद्धा होते. अश्याच एका एजंट ने हे सेफ हौस आपल्या ताब्यांत घेतले. तो माझ्या ओळखीचा होता. त्या एजन्ट ने ते शबाना, मगनलाल, किशनसिंग आणि तोडरमल ह्यांना राहायला दिले. ठाणे नगरपालिकेने "वाचनालय" म्हणून हि बिल्डिंग बांधली होती. हि मंडळी आता ह्याला लायब्ररी म्हणून संबोधित करते." कैलासने इमारतीच्या पायऱ्या चढताना स्वराला माहिती दिली.


"मोस्ट वॉन्टेड लोकांना आश्रय देणे हा फार मोठा गुन्हा आहे. नोकरी तर जाईलच पण वर ५ वर्षांची सजा. तुझ्या बरोबर काम करताना मी पोलीस कमी आणि गुन्हेगार जास्त समजते" स्वराने त्याला म्हटले.


"इतनी खूबसूरत छोकरी ? " आंतून आवाज आला आणि व्हीलचेर वरून एक महिला पुढे आली.


"नमस्कार शबाना आपा, कैसी हो ? " कैलासने तिला नमस्कार केला.


शबानाच्या बाजूला एक लहान १५-१६ वर्षांची  मुलगी होती. ती कदाचित तिची नोकर असावी.


शबानाने प्रसन्न मुद्रेने स्मितहास्य दिले. "आमचे काय, आम्ही मृत्यूची वाट बघायची."


वाचनालयाच्या मध्यभागी एक वर्तुळाकार हॉल होता. कैलास ला घेऊन शबाना तिथे अली. तिथे एका टेबलवर दोघे वयस्क पट्टे खेळत होते तर राजस्थानी धाटणीच्या मिश्या ठेवलेला माणूस कोपऱ्यांत टीव्ही पाहत बसला होता. त्यांनी सर्वानी कैलासाला पाहून आनंदाने हातातील काम टाकले आणि ते त्याच्या स्वागतास आले .


कैलासने प्रत्येकाची ओळख करून दिली आणि स्वराला लक्षांत आले कि ते सर्वजण तिला पाहून जास्त खुश झाले होते.


मगनलाल दाऊद च्या अनेक अकाउंटंट पैकी के होता. किशनसिंग आर्मीतून निवृत्त होऊन छोटा शकील साठी सुरक्षा द्यायचे काम करायचा तर तोडरमल एक स्मग्लर होता. रावांचे वर पन्नाशी उलटून गेलेले होते. आज बाजारांत भाजी घ्यायला येणाऱ्या एखाद्या मध्यम वर्गीय माणसाप्रमानेच त्यांची सर्वांची चर्या होती. एके काली लोक ह्यांना घाबरत असत, ह्यांनी अनेकांचे मुडदे पाडले असतील असे त्यांना पाहून वाटत सुद्धा नव्हते.


कैलासने त्यांना जन्नत हॉस्पिटलचा संपूर्ण किस्सा सांगितला. शबाना च्या चेहेऱ्यावर ते ऐकून खिन्नता पसरली. स्वरा लक्षपूर्वक सर्वांचे चेहेरे न्याहाळत होती.


"कैलास, खूप वर्षे झाली त्या घटनेला. मला नव्हते गुन्ह्याच्या जगांत यायचे. मी आले तेंव्हा किमान अमीनला त्यापासून दूर ठेवेन असे वाटले होते. काय नाही केले मी त्याच्यासाठी. शिकण्यासाठी विदेशांत पाठवायची संपूर्ण तयारी केली होती पण तो सुद्धा ह्या दलदलीत ओढला गेला. पण त्या हॉस्पिटल मध्ये त्याला मारले गेले. अमीन तरी गुन्हेगार होता पण झैनाब चा काय दोष होता ? आणि पोलीस ? जे लोकांचे रक्षक आणण्याचा आव आणतात त्यांनी तिला खिडकीतून ढकलले ? ओरडली असेल का ती त्यावेळी ? मला हाक मारली असेल का तिने ? अमीना आपा कुठे असशील असा विचार आला असेल का तिला पडताना वरून खाली ? आज सुद्धा हे प्रश्न डोक्यांत येऊन मी रात्री अपरात्री उठते. कैलास मी खूप शोध घेतला रे पण काहीही हाती आले नाही. सरकार नक्की काय प्रयोग करत होते ह्याची माहिती IB आणि RAW मध्ये सुद्धा नव्हती. जे काही चालले होते ते आमच्या सारख्या माफिया साठी सुद्धा फार डीप होते कैलास.” शबाना जुन्या आठवणी येऊन थोडीशी भावनाविवश झाली होती.


"इतकी वर्षे तू काही करू शकली नसलीस तर आज आम्हा सर्वां कडे एक संधी आहे. कुणी तरी ह्या जुन्या षड्यंत्राला वर काढायचा प्रयत्न करत आहे. पण काही तरी धागेदोरे सापडल्याशिवाय आम्ही अंधारात चाचपडल्या प्रमाणे वागू. We need something". कैलासने तिला म्हटले.


मगनलाल पुढे झाला. "कैलास, समजा कुणाला भ्रूण पाहिजेच असतील तर इतकी लपवा छपवी कशाला करायला पाहिजे ? दोन नंबर सरकारी वाले .. " त्याने स्वराकडे पहिले आणि "दोन नंबर सरकारी म्हणजे IB आणि RAW, ह्यांना अनेक मार्ग आहेत. जोगेश्वरी मध्ये अनेक म्हशींचे गोठे आहेत. त्यामुळे तिथे अनेक गुरांचे डॉक्टर्स सुद्धा आहेत. ह्यांत एक जुना डॉक्टर म्हणजे डॉक्टर लेले. डॉक्टर लेलेंचे क्लिनिक म्हणजे मानवी अवयव स्मगल करणाऱ्यांचा एके काळचा अड्डा होता. लेले आज रिटायर झाले असले तरी भ्रूण गोळा करणाऱ्या एजेन्सी ने त्यांना १००% संपर्क साधला असेलच. मगनभाई चे नाव घेतले तर लेले सगळी माहिती देतील. पण नेहमी प्रमाणे कुणाला अटक वगैरे होणार नसेल तरच. " मगनभाईनी दिलेली माहिती अपुरी असली तरी एक चांगला धागा होता.


"मी ती चौकशी आधीच केली होती मगन. डॉक्टर लेले कडे किडनी होत्या, लिव्हर होते पण भ्रूण नव्हते. त्यांनी त्या व्यवसायांत कधीच पाय घातला नव्हता.  " शबानाने म्हटले. "म्हणजे हे दार सुद्धा बंद झाले" स्वराने निराशेने म्हटले.


"पण तेंव्हा तू मगनभाई चे नाव घेतले नव्हतेस शबाना" मगनभाईनी म्हटले. "भले लेले त्या धंद्यांत नसतील किंवा असतील पण जर कुणी त्यांच्याशी सम्पर्क साधला असेल तर त्याची माहिती त्यांनी तुला नसती दिली. पण कैलासाला ती माहिती ते देतील".


कैलास आणि स्वरा तो धागा घेऊन बाहेर आले. "पाहिलेस हि लोक जितकी वाटतात तितकी वाईट नाहीत" कैलासने तिचे मत जाणून घ्यायला तिला म्हटले.


"हो पण ह्या लोकांवर विश्वास ठेवावा असे मला वाटत नाही. त्यांच्या हावभावातून ती मंडळी काही तरी लपवत होती असेच मला वाटले. आणि जन्नत हॉस्पिटल ची केस ऑफिशिअली बंद असल्याने आम्ही जास्त चौकशा करू सुद्धा शकत नाही. डॉक्टर लेले आमच्याशी का बोलतील ? आणि दोन CBI ऑफिसरनी दाऊदच्या अकौंटन्ट चा हवाला देऊन चौकशी करावी ? We are playing this dangerously close to chest कैलास" स्वराने आपले तर्क प्रस्तुत केले.


कैलासाला सुद्धा तिच्या म्हणण्यात तथ्य वाटले पण सध्या त्यांच्याकडे आणखीन काहीही लीड नव्हती. अश्यांत डॉक्टर लेले शी संपर्क साधण्याशिवाय आणखीन काहीही उपाय नव्हता. शालिमार? कैलासाच्या डोक्यांत ते नाव पुन्हा पुन्हा येत होते. शालिमार मधील आपले काँटेक्टस वापरले तर ? पण तिथे आणखीन काही तरी काम मोबदला म्हणून करावे लागले असते. कैलासने ह्या आधी तसे काम केले होते आणि आणखीन तसली कामे करणे त्याला पसंद नव्हते. त्याशिवाय ह्या संपूर्ण प्रकरणाचा संबंध शालिमार शी आला तर प्रकरण आणखीन गुंतागुंतीचे होऊ शकत होते.


"मी एक काम करते. लेले कडे जाण्याच्या आधी मी डॉक्टर लेलेंची संपूर्ण माहिती काढते. त्यांचे बॅंक खाती इत्यादी तपासते. IB मध्ये त्यांच्यावर काही माहिती आहे का हे पहाते. कुठल्या तरी मानवी अवयव तस्करी संबंधी हि चौकशी आहे असे भासवता येईल. संपूर्ण तयारीनिशीच आम्ही डॉक्टर लेले कडे जाऊ. काय म्हणतोस ? " स्वरा


"तू सांगतेस ते बरोबर आहे." कैलासने गाडी गेटच्या बाहेर घेतली.


लायब्ररी मधून त्याला नेहमीच अशा असायची आणि आजपर्यंत त्याला लाइब्ररीने निराश कधीही केले नव्हते.