आपले नेहरू 16
गरिबांचे कैवारी
नेहरू श्रीमंतींत वाढले असले, स्वच्छ पोषाख करीत असले तरी त्यांना गरिबांची घृणा नाहीं. एकदां दिल्ली स्टेशनांतील झाडूवाला दुरून त्यांच्याकडे बघत होता तर ते त्याच्याकडे गेले व त्याला हृदयाशीं धरते झाले. अमेरिकेंत एका गरीब मोटार ड्रायव्हरच्या मोटारींतून गेले व त्याचा नि स्वत:चा त्यांनीं फोटो काढवला. लांबून आलेल्या नीग्रो मातेजवळ प्रेमानें हस्तांदोलन केलें. एक अमेरिकन भगिनी म्हणाली : “असा पुरुष आमच्या देशांत जन्माला यायला हवा होता !”
मुलांचें प्रेम
मुलांवर त्यांचें फार प्रेम. कितीहि कामांत असले तरी मुलें कांहीं विचारायला आलीं तर त्यांची शंका फेडतील. अमेरिकेंतील मुलांना स्वाक्षर्या देत उभे राहिले. जपानी, अमेरिकन व रशियन मुलांना त्यांनीं हत्ती पाठवले. जगांतील मुलांचे ते मित्र आहेत.
उतावळा स्वभाव
त्यांना चोख काम हवें असतें. अलाहाबाद म्युनिसिपालटीचा कारभार २५ वर्षांपूर्वी त्यांनीं किती उत्कृष्ट टालवला. त्यांना बावळटपणा सहन नाहीं होत. त्रिपुरी काँग्रेसच्या वेळेस झेंड्याच्या दोरीची गुंतागुंत पाहून म्हणाले : “किसने किया ? कौन है जिम्मेदार यहाँ ? गोली मारो उसको !” परंतु रागावले तरी लगेच शांत होतात. महात्माजी म्हणाले : “जवाहरलालांना उतावीळपणा शोभतो.”
पोहण्याचे भोक्ते
ते कधीं कुठें अडायचे नाहींत. मध्यंतरीं पेट्रोल कमी मिळे तर ते सायकलवरून जात येत. घोडा तर त्यांना प्यारा. लंडनला घोड्यावरून दौड करून आले. आणि मागें मुंबईला आले तर पहांटे चारलाच जुहूला जाऊन सागराच्या लाटांशीं धिंगामस्ती करीत होते !
प्रेमळ जीवन
घरगुती जीवनांत ते अति प्रेमळ आहेत. बहिणींचे वाढदिवस लक्षांत ठेवतील. पत्रें लिहितील, भेटी पाठवतील. त्यांचीं मुलें खेळवतील. इंदिरेचीं मुलें म्हणजे त्यांची करमणूक.