Get it on Google Play
Download on the App Store

आपले नेहरू 7

व्यापक दृष्टीचे शिक्षक

ते बहीण कृष्णा हिला म्हणाले : “हा जिनीव्हाचा नकाशा घे. हें ट्रामचें वेळापत्रक. हीं तिकिटांचीं कूपनें. जा हिंड फीर. हा इंग्लिश-फ्रेंच शब्दकोश घे.” तिनें फ्रेंच शिकावें म्हणून एकदां रागावले. प्रत्येकानें कांहीं शिकावें, वेळ फुकट दवडूं नये, परावलंबी नसावें, असें त्यांना फार वाटतें. बरेंच सामान घेऊन मंडळी चालत जात होती. कृष्णा म्हणाली : “पाय थकले. मोटार कर ना रे भाई ?” भाई म्हणाला : “मोटार केली तर मग रात्रीं नाटकाला नाहीं जायचें. काय पाहिजे बोला.” नाटकाचा आनंद गमावण्याऐवजीं सगळ्यांनीं पायीं जायचें कबूल केलें.

उन्हाळ्यांत युरोपांतील अनेक विद्यार्थी जिनीव्हाला जमतात. तो महान् मेळावा असतो. हिंदी, चीनी, सिलोनी, अमेरिकन, फ्रेंच, जर्मन सारे तेथें जमावयाचे. जवाहरलाल त्यांच्यांत मिसळावयाचे. प्रख्यात फ्रेंच साहित्यिक रोमाँ रोलाँ यांनाहि ते मधून भेटत. घरीं कृष्णा स्वयंपाकपाणी करी. जवाहरलालहि मदत करायचे. कृष्णाला खिजवायचे : “तूं फार सुखांत वाढलीस. काम करीत जा. श्रम करीत जा. श्रम करीत जा. सुखासीन जीवनानें व्यक्तिमत्त्वाचा विकास नाही होत.” अनेक क्रान्तिकारक भेटायला यायचे. धनगोपाल, वीरेन्द्र चट्टोपाध्याय यायचे, थोडावेळ रहायचे, जायचे. जवाहरलाल इटलींतही नेपल्स वगैरे पाहून आले. पॅरिसला अनेक फेर्‍या व्हावयाच्या.

ब्रूसेल्स येथें साम्राज्यविरोधी संघाची स्थापना करण्यांत येत होती. जवाहरलालांना हिंदचे प्रतिनिधि म्हणून आमंत्रण देण्यांत आलें. ते गेले. आजच्या इंडोनेशियाचे पुढारी त्या वेळेस प्रथमच जवाहरलालांना भेटले. थोड्या दिवसांनी मोतीलालहि युरोपांत आले. १९२७ मध्यें रशियन क्रांतीच्या १० व्या वार्षिक दिनाला मॉस्कोहून पितापुत्रांना आमंत्रण आलें होतें. मंडळी तिकडे गेली. जवाहरलाल बरेंच बघून आले. १९२७ च्या डिसेंबरांत कोलंबोला सारी मंडळी आली. मद्रासला १९२८ मध्ये काँग्रेसचें अधिवेशन होतें. तें आटोपून आनंदभवनांत हे प्रवासी पुन्हा आले.

स्वातंत्र्याचा ठराव

१९२८ च्या डिसेंबरांत कलकत्ता काँग्रेस भरली. मोतीलालजी अध्यक्ष होते. वसाहतीच्या स्वराज्याचा ठराव तेथें मंजूर झाला. जवाहरलालांचा विरोध होता. महात्माजी म्हणाले : “सरकारला एक वर्षाची मुदत देऊं. नाहींतर स्वातंत्र्याचा ठराव करूं व त्यासाठी लढा देऊं.” एक वर्ष हां हां म्हणतां गेलें. देशभर युवक चळवळी उभ्या राहिल्या. उत्तर प्रदेशांतील युवक चळवळीचे पंडितजी अध्यक्ष होते. अखिल भारतीय कामगार चळवळीचेहि ते अध्यक्ष झाले. याच सुमारास हिंदी कम्युनिस्टांवर सरकानें खटला भरला. मीरत खटला म्हणून तो प्रसिध्द आहे. त्यांच्यासाठीं जवाहरलालांनीं बचावसमिति नेमली. परंतु खटल्यांतील व्यक्ति आपापलींच प्रचंड वक्तव्यें आणीत व न्यायमूर्तींसमोर वाचीत. बचावसमितीशीं ते सहकार करीत. ना. जवाहरलालांना वाईट वाटलें. १९२९ ची लाहोर काँग्रेस आली. जवाहरलालांचें नांव अध्यक्ष म्हणून उत्तर प्रदेशानें सुचविलें. गांधीजींनी तें उचलून धरलें. त्यांनीं लिहिलें : “तो स्फटिकाप्रमाणें निर्मळ आहे. शूर आहे. त्याचा उतावीळपणाहि त्याला शोभतो. राष्ट्र त्याच्या हातांत सुरक्षित आहे.” लाहोरची काँग्रेस भरली. महात्माजींनीं दिलेली वर्षाची मुदत संपली होती. ३१ डिसेंबर १९२९ रोजीं स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झाला. रावी नदीच्या तीरावर रात्रीं बारा वाजता जवाहरलालांनीं स्वातंत्र्याची प्रतिज्ञा सांगितली, लाखोंनीं ती उच्चारली. २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्याचा देशभर आदेश गेला.