आपले नेहरू 5
१९१८ मध्यें पहिलें महायुद्ध थांबलें. हिंदूस्थानला स्वयंनिर्णयाचा हक्क द्या, असें सांगण्यासाठीं राष्ट्रसभेचें शिष्टमंडळ विलायतला गेलें होतें. लो. टिळकहि गेले होते. मध्यंतरीं काय सुधारणा देतां येतील तें बघायला माँटेग्यू साहेब या देशांत येऊन गेले होते. परंतु सुधारणा देणें दूरच राहिलें. रौलेट कायदा भारताच्या डोक्यावर बसाला. महायुद्धाच्या काळांत देश स्वतंत्र करण्यासाठीं भारतांत गदर चळवळ झाली. तळेगांवच्या समर्थ विद्यालयांतील दामोदर पिंगळे त्यांतच फांशीं गेला. रासबिहारी घोष जपानकडे गेले. स्वातंत्र्योत्तर काळीं अमेरिकेंत नेहरू गेले असतां सॅनफ्रानसिस्को येथें गदर चळवळींतले जुने देशभक्त भेटले. ज्या स्वातंत्र्याच्या ध्येयासाठीं त्यांनीं यमयातना भोगल्या, मातृभूमीपासून दूर वनवास भोगले तें ध्येय पूर्ण झालेलें पाहून त्यांना किती कृतार्थता वाटत होती ! स्वतंत्र झालेल्या आपल्या मातृभूमीच्या एका सत्पुत्राचा अमेरिकेंत झालेला तो जयजयकार पाहून त्या वृद्ध देशभक्तांचे हृदय आनंदानें उचंबळलें. अशी ती गदर चळवळ त्या वेळेस झाली. ब्रिटिश सरकारनें चौकशी केली. चौकशी-समितीनें अहवाल प्रसिद्ध केला. त्याच्या आधारें सरकारनें रौलेट कायदा पास केला. संशयावरून वाटेल तेव्हां पकडण्याचा या बिलानें पोलिसांना अधिकार देण्यांत आला होता. महात्माजी साबरमतीच्या तीरावरून म्हणाले : “मानवाची ही विटंबना आहे. सार्या राष्ट्रानें बिलाचा निषेध करावा.”
एप्रिल १९१९ चे ते दिवस. प्रार्थना, हरताळ, उपवास, सभा असा तो कार्यक्रम होता. सारें राष्ट्र नवतेजानें उभें राहिलें. नि:शस्त्र जनतेला मार्ग मिळाला. दिल्लीला गोळीबार झाले. गुरख्याच्या बंदुकीसमोर श्रद्धानंदांनीं छाती उघडी केली व म्हटलें : “चलाव तेरी गोली.” तिकडे पंजाबांत जालियनवाला बागेंत सभेला हजारों लोक जमलेले. त्यांच्यावर दारूगोळा संपेपर्यंत गोळ्या झाडण्यांत आल्या. शेकडों मेले. लष्करी कायद्याचा धिंगाणा सुरू झाला. त्या वेळेस मोतीलालजी, देशबंधू दास पंजाबांत चौकशीसाठीं गेले. मदत करायला जवाहरलालहि गेले. गांधीजीहि आले. सरकारनें सार्या प्रकारावर सारवासारव केली. गंगेच्या तीरावर राष्ट्रसभेचे नेते जमले. स्वातंत्र्य-प्राप्तीपर्यंत झगडत रहायला त्यांनीं निर्धार केला. परंतु कसें झगडायचें ? असहकार व कायदेभंग हाच एक मार्ग होता. जवाहरलाल तो मार्ग घ्यायला अधीर झाले. मोतीलालांच्या मनाची कालवाकालव होत होती. आजवर जीवन सुखांत गेलेलें. गांधीजींचा मार्ग म्हणजे सतीचें वाण. पितापुत्रांचे रात्ररात्र वाद होत. कधीं कधीं रागानें शब्दाशब्दी होई. बहिणींना चिंता वाटे. आईचा कंठ दाटे. हृदय फाटे. पितापुत्रांची मतभेदानें ताटातूट होणार का ?
महात्माजी एकेक मोहरा मिळवीत चालले. लोकमान्य देवाघरीं गेले होते. महात्माजी म्हणाले :
“आता एक क्षणभरहि लोकमान्यांचें निशाण खालीं ठेवतां येणार नाहीं.” मोतीलाल व देशबंधु या दोन भीमार्जुनांची जोड मिळावी म्हणून गांधीजींची पराकाष्ठा. मोतीलालजींचा फोटो पाहून ते एकदां म्हणाले : “केवढ्या पुरुषाशीं मला झगडायचें आहे ? ही हनुवटी, हे डोळे. अपार निश्चयी हा पुरुष आहे. याला जिंकून घेणें कठिण आहे.” परंतु महात्माजींनी मोतीलालांना जिंकलें. गांधीजींच्या मार्गानें जायला ते तयार झाले. पितापुत्र समरस झाले, पुन्हा मोकळेपणा आला.
आनंदभवनांत क्रान्ति झाली. ते आवडते घोडे, त्या घोड्यांच्या गाड्या, घरांतील तें उंची सामान, त्या कलात्मक वस्तु, सुंदर भांडीं नाना देशांतून आणलेलीं- सारें विकण्यांत आलें. आचारी, बटलर, अनेक नोकरचाकर, यांना प्रेमानें निरोप देण्यांत आला. घरांत साधेपणा आला. जुने बडे बडे स्नेही येतनासे झाले. आता देशासाठीं तळमळणार्या खादीधारी लोकांची जा-ये सुरू झाली. गांधीजींनीं राष्ट्राच्या विचारांत, आचारांत, पेहरावांत क्रान्ति केली. तें नवदर्शन होतें. जवाहरलाल म्हणतात : “माझ्यासमोर जीवनाचा स्वच्छ मार्ग नव्हता. अंधार होता. महात्माजींनीं प्रकाश दिला. त्यांच्यामुळें जीवनाचा अर्थ मला कळूं लागला, कां जगावें तें कळूं लागलें.”