आपले नेहरू 8
१९३० साल उजाडलें
स्वातंत्र्याचा ठराव झाला. पुढें काय ? महात्माजी स्वस्थ नव्हते. त्यांनीं व्हाइसरॉयकडे त्या ऐतिहासिक अकरा मागण्या धाडल्या. दोन ओळींचा नकार आला. गांधीजी म्हणाले : “भाकर मागितली, मिळाले दगड !” १९३० च्या १२ मार्चला महात्माजी दांडीयात्रेला बाहेर पडले. म्हणाले : “आधीं मी सत्याग्रह करीन, मग सारे करा.” आणि त्याप्रमाणें झालें. सारें राष्ट्र उठावलें. सर्वत्र लाठीमार, गोळीबार. जवाहरलालांना अटक झाली. जूनमध्ये मोतीलालांनाहि झाली. परंतु आजारीपणामुळें त्यांची सुटका करण्यांत आली. ते मसुरीला जाऊन राहिले. इतक्यांत जवाहरहि सुटले. मुलाला भेटायला पिता येत होता. जवाहर स्टेशनवर होता. गाडीला उशीर झाला. तिकडे सभेला जवाहरलालजींना जायचें होतें. शेवटीं ते गेले. पिता स्टेशनवर उतरला तों समोर पुत्र नव्हता. घरीं ते मुलाची वाट पहात होते. परंतु तिकडेच त्याला अटक झाल्याची वार्ता आली. क्षणभर मोतीलाल खिन्न झाले. परंतु म्हणाले : “अत:पर औषधें नकोत. माझा आजार गेला. मलाहि काम करूं दे.”
मोतीलाल गेले
परंतु प्रकृति सुधारेना. १९३१ च्या जानेवारींत जवाहर सुटला तो घरीं येऊन सरळ पित्याच्या खोलींत गेला. पितापुत्रांनीं मिठी मारली. मग मोकळा होऊन पुत्र अंथरुणावर बसला. अखेर अश्रु आलेच. मुलगा भेटला म्हणून मोतीलालांचें मुख फुललें होतें. जवाहरलालांच्या डोळ्यांत करुण वेदना होती. येरवड्याहून गांधीजी सुटले. तेहि तडक अलाहाबादला आले. मोतीलालांना ४ फेब्रुवारीस क्षकिरणोपचारांसाठीं लखनौस नेण्यांत आलें. ५ तारखेस रात्रीं प्रकृति अधिकच बिघडली. पत्नीला म्हणाले : “मी पुढें जातों. तुझी वाट बघेन.” कृष्णा रडूं लागली. तिला जवळ घेऊन म्हणाले : “माझ्या छोट्या मुलीनें शूर असलें पाहिजे.” गांधीजींना म्हणाले : “मी स्वराज्य पहायला नाहीं. परंतु तुम्हीं तें आणलेंच आहे.” मुखावर शान्ति पसरली. गायत्री मंत्राचा जप करीत हा पुण्यप्रतापी पुरुष ६ फेब्रुवारी १९३१ ला पहाटे देवाघरीं गेला !
असा भाऊ कुठें मिळेल ?
गांधीजी दिल्लीला वाटाघाटींसाठीं गेले. दु:ख गिळून जवाहरहि गेले. आयर्विनबरोबर तडजोड झाली. कराचीला राष्ट्रसभेचें अधिवेशन होतें. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना सरकारनें फांशीं दिलें. भगतसिंगांना जवाहरलाल भेटले होते. त्या घटनांचा अमिट परिणाम त्यांच्या मनावर झाला होता. कराचीला मूलभूत मानवी हक्कांचा ठराव पास झाला. गांधीजी लंडनला निघाले. नेहरू घरीं थोडी व्यवस्था लावीत बसले. त्यांनीं लहान बहिणीला लिहिलें : “घर व जें कांहीं आहे तें तुझें व आईचें. मी विश्वस्त म्हणून सारें पाहीन. मला व माझ्या कुटुंबाला फारसें लागणार नाहीं. आपण नीट राहूं.” बहीण कृष्णा ‘ना खंत ना खेद’ या पुस्तकांत लिहिते : “असा भाऊ कुठें मिळेल ?”
आई दु:खी होती. पतीच्या आधीं आपण भरल्या कपाळानें, भरल्या हातांनीं जाऊं, असें तिला वाटे. परंतु उलटें झालें. वेळ मिळे तेव्हां मातृभक्त जवाहरलाल आईजवळ बसून तिचें दु:ख हलकें करायचे.