Get it on Google Play
Download on the App Store

आपले नेहरू 2

आनंदभवन

त्या वेळेस जवाहर १० वर्षांचा होता. मोतीलालजींनी तेव्हां आनंदभवन राजवाडा विकत घेतला. अनेक फेरफार तेथें करण्यांत आले. कृत्रिम धबधबे, कृत्रिम कैलासपर्वत. आणि तेथें एक शंकराची जटाधारी मूर्ती होती. तिच्या मस्तकांतून गंगा वाहण्याची युक्ति केलेली होती. सभोंवतीं अनेक-रंगी व नानागंधी फुलांचे ताटवे. दुसर्‍या बाजूला अनेक घोडे, शिकारी कुत्रे. राजाचें वैभव तिथें होतें.

पवित्र जागा

आनंदभवनाची जागा पवित्र होती. वनवासी रामाला भरत ज्या ठिकाणीं भेटला होता, ती ही जागा. जवळच भारद्वाज ऋषींचा प्राचीन काळीं आश्रम होता. तेथें पूर्वकाळीं एक मोठें विद्यापीठ होतें. अजून दरसाल तेथें मोठी यात्रा भरते. हजारों लोक येतात आणि पांखरें वडावर बसावीं त्याप्रमाणें आनंदभवनाचा आश्रय घेतात.

अशी ही पुण्यपावन प्राचीन जागा. तेथें राहील त्याला वनवास भोगावा लागेल, शत्रूंशीं, संकटांशीं झुंजावें लागेल, असें का ती जागा सांगत होती ? परंतु वनवासानंतर वैभवहि नाहीं का मिळणार ? महात्माजींनीं साबरमतीला आश्रम स्थापला तीहि जागा अशीच. प्राचीनकाळीं तेथें दधीची ऋषींचा आश्रम होता. दधीचीनें इंद्राला स्वत:चीं हाडें वज्र करण्यासाठीं दिलीं. पवित्र अस्थींच्या त्या वज्रानें इंद्रानें शत्रूचा नि:पात केला. दधीचीप्रमाणें गांधीजींनींही राष्ट्रासाठीं, मानवतेसाठीं हाडें तिळतिळ झिजविलीं आणि शेवटीं गोळ्या मारणार्‍यासहि प्रणाम करून शेवटची पूर्णाहुति दिली, प्रेमाचा अमर संदेश दिला. आनंदभवनाची व महात्माजींच्या आश्रमाची जागा मनांत येऊन माझ्या मनांत कितीदां तरी गंभीर विचार येतात. व्यक्तीच्या व राष्ट्राच्या, जीवन-वस्त्रांत कसे कोठून धागेदोरे विणले जात असतील, त्याची कल्पना कोण करूं शकेल ?

अनेक शिक्षक

जवाहरलालांना शिक्षण देण्यासाठीं निरनिराळ्या विषयांतील तज्ज्ञ शिक्षक मोतीलालांनीं ठेवले. कोणी इंग्रजी शिकवी, कोणी गणित, कोणी इतिहास, कोणी शास्त्र. जवाहरलाल आज अनेकशास्त्रपारंगत आहेत. सुंदर सुंदर शेकडों कविता त्यांना पाठ आहेत. मुंबईला आपल्या बहिणीकडे कधीं आले म्हणजे सुंदर कविता वाचून दाखवायचे. ते फार सुंदर रीतीनें काव्य वाचतात, म्हणतात, तन्मय होतात. त्यांनीं लिहिलेल्या आत्मचरित्रांत अनेक ठिकाणीं सुंदर सुंदर इंग्रजी कविता आहेत.