आपले नेहरू 3
विलायतेंत प्रयाण
वयाच्या चौदाव्या वर्षी जवाहरलालांना विलायतेंत हॅरो येथें शिकण्यासाठीं ठेवण्यांत आलें. आईबाप स्वत: त्याला घेऊन गेले होते. त्याची नीट व्यवस्था लावून मायबाप परत आले. दोन वर्षे हॅरोला काढून पुढें जवाहरलाल केंब्रिजला गेले. शास्त्र विषय घेऊन ते पदवीधर झाले. १९०८ मध्यें ते हिंदूस्थानांत परत आले होते. मग पुन्हा परत गेले. बॅरिस्टरीचा त्यांनीं अभ्यास केला. इतरहि शेंकडों ग्रंन्थ वाचले. त्यांना सर्व प्रकारच्या वाचनाची आवड. पुढें एकदां अटक झाल्यावर लहान बहीण कृष्णा हिला पत्र लिहून म्हणतात :
“तुझा आज वाढदिवस नि मला अटक झाली. मी तुला सुंदर भेट देणार होतों. तुझा भाऊ जरा विसरभोळा आहे. परंतु लहान बहिणीची त्याला नेहमीं आठवण येते. हें बघ, आतां असें कर. एखाद्या पुस्तकांच्या दुकानांत जा. आणि प्राचीन ज्ञानभांडाराचीं, मध्ययुगांतील श्रद्धेचीं, अर्वाचीन संशयवादाचीं आणि भावी नवयुगाचीं सुंदर सुंदर पुस्तकें विकत घे व भावाची लाडक्या बहिणीला भेट समज. तीं पुस्तकें वाच. त्यांतून एक जादूचें शहर निर्माण कर. तेथें नकोत दु:खें, नकोत कष्ट. परंतु असें हें शहर बांधायला अविरत झगडावें लागतें.” या पत्रावरून जवाहरलालांची दृष्टी तिन्ही काळांत कशी वावरत असते तें दिसेल. भूतकाळांतील जें जें भव्य, त्यांतून ते स्फूर्ति घेऊन भविष्याचा नकाशा डोळ्यांसमोर ठेवून आज वर्तमानकाळांत क्षणाची विश्रांति न घेतां झगडत राहतील.
मायभूमीला परत
१९१२ मध्यें जवाहरलाल शिक्षण संपवून परत आले. घरची मंडळी सारी मसुरीला होती. आज जवाहर येणार होता. घरांत आनंद, धांवपळ. आईची उत्कंठा तर असीम होती. दोन लहान बहिणी पांखरांप्रमाणें वाट बघत होत्या. एक बहीण बारा वर्षांची, दुसरी पांच वर्षांची. १९०८ मध्यें जवाहरलाल विलायतेहून येऊन परत गेले तेव्हां ती वर्षाची होती. आज ती भावाला बघणार होती. मोठ्या बहिणीचें नांव सरूप आणि या धाकटीचें नांव कृष्णा. घोड्यांच्या टापा ऐकूं आल्या. मंडळी बाहेर आली. घोड्यावरून तरुण जवाहर खालीं उतरला. त्यानें छोट्या बहिणीला एकदम उचलून घेतलें.
“बरीच मोठी झालीस कीं ? चांगली बाई शोभतेस !” असें तिचा पापा घेऊन वडील भाऊ म्हणाला. बहीण गोंधळली, बावरली. जवाहरलालनें तिला खालीं ठेवलें. आपल्या भावाकडे ती प्रेमानें, भीतीनें बघत होती.
पुढें सारी मंडळी अलाहाबादला आली. जवाहरलाल पुढें काय करणार ? पित्याचीच गादी पुढें चालवणार का ? इंग्लंडमध्यें राहून ते आले होते. स्वातंत्र्याच्या कल्पना घेऊन आले होते. लहानपणापासून गोर्यांची त्यांना चीड येई. विशेषत: इंग्रजांची. दक्षिण आफ्रिकेंत बोअर युद्ध सुरू झालें. इंग्रजांचा पराभव व्हावा असें तेंव्हा ९-१० वर्षांच्या या मुलाला वाटे. रशियाचें व जपानचें युद्ध १९०४-५ मध्यें सुरू झालें. रशियाचा पराजय व्हावा असें त्यांना वाटे. दुसर्यांना गुलाम करणार्यांचा पराभव व्हावा ही तीव्र भावना लहानपणापासून त्यांच्या मनांत. हिंदूस्थानांतील कोट्यावधि मुलांत हीच भावना असे. इतिहासाच्या पुस्तकांतील इंग्रजांचीं चित्रें विद्रूप करायचीं, देव राजाचें रक्षण करो असें वाक्य त्यांत ‘न’ घालायचा, असें त्या वेळचें वातावरण होतें.