Android app on Google Play

 

चिनी व जपानी मूर्तीविज्ञान

 

चिनी प्रतिमाविद्येला इ. स. पू. १००० वर्षांपासूनची प्रदीर्घ परंपरा आहे. तिच्यावर मेसोपोटेमिया, बॅबिलोन येथील प्रतिमाविद्येचा काही अंशी आणि ग्रीक व रोमन प्रतिमाविद्येचा अत्यल्प परिणामही झाला असला, तरी ती आजतागायत टिकून आहे. चिनी मूर्तिकलेचे सर्वांत जुने व उल्लेखनीय अवशेष इ. स. पू. ३०० पासून पहावयास मिळतात. चिनी प्रतिमाविद्येला इ. स. तिसऱ्या शतकानंतर विशेष बहर आला.


चिनी कलेतील समृद्ध प्रतिमाविद्येमध्ये ताओ मताचे मूळ प्रतीक- यीन् व यांग या वक्राकारांनी बनलेले वर्तुळ यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांखेरीज बुद्ध व त्याचे अवलोकितेश्वरादी आविष्कार तसेच अन्य देवदेवता ह्यांच्या पाषाण, ब्राँझ, लाकूड इ. माध्यमांतील विपुल मूर्ती व त्यांच्या जीवन-प्रसंगांची शिल्पे यांचा अंतर्भाव होतो. कित्येकदा मूर्तीवर चमक आणण्यासाठी लाखेच्या पुटाचाही उपयोग केल्याचे आढळते.

या मूर्तींमध्ये मानवी वैशिष्ट्ये प्रकर्षाने दिसून येतात. तथापि भारतीय मूर्तींच्या तुलनेत त्यांच्या निर्मितीचे प्रमाण कमी असते. तसेच प्रतिमांच्या मानाने चीनमध्ये रेशमी वस्त्रांवर द्विमितीय बुद्ध, त्याचेअन्य आविष्कार व त्याच्या जीवनकथा मोठ्या प्रमाणावर रंगविलेल्या आढळतात.

 जपानमधील प्रतिमाविद्येला इ. स. सातव्या शतकात चालना मिळाली.  आरंभीची काही शतके चिनी व कोरियन शिल्पकलेचा मोठा प्रभाव दिसतो. तो नवव्या शतकापर्यंत तरी टिकून होता.

लाकूड, धातू व पाषाण या तिन्ही माध्यमांत जपानी प्रतिमा निर्माण झाल्या. दहाव्या ते बाराव्या शतकांतील जपानी प्रतिमाविद्या बरीचशी प्रभावमुक्त व स्वतंत्र असल्याचे आढळते. तथापि तेराव्या शतकातील जपानी प्रतिमाविद्येवर मात्र चिनी प्रतिमाविद्येचा पुनश्च परिणाम झाला.

पुढे सतराव्या शतकापासून मात्र स्वतंत्र जपानी प्रतिमाविद्या खऱ्याखुऱ्या अर्थाने बहराला आली. वैशिष्ट्यपूर्ण निसर्गचित्रण, लाखेच्या पुटामुळे निर्माण झालेली चमक व शोभिवंतपणा आणि तांत्रिक कौशल्य ही तिची वैशिष्ट्ये होत.