भारतीय मूर्तीविज्ञान
इ. स. पू. सु. चौथ्या शतकात भारतात मोठ्या प्रमाणात मूर्तीपूजेला आरंभ झाला. वेदपूर्वकालीन सिंधुसंस्कृतीत विविध मूर्ती वा प्रतिमा आढळल्या आहेत. त्यात योगी पशुपती, भूदेवता समाविष्ट आहेत. मूर्तींचे यापूर्वीचे उल्लेख असले, तरी ते फुटकळ स्वरूपाचे आहेत. वेदकालातही मूर्ती होत्या असे एक मत आहे. काही पुराणे सोडल्यास तिथपासून अठराव्या शतकापर्यंतचे प्रतिमाविद्येवरील ग्रंथ उपलब्ध आहेत. बौद्ध आणि जैन धर्मातील मूर्तींविषयीही असे शास्त्रग्रंथ मिळाले आहेत. अर्थात ते संख्येने थोडे आहेत. हिंदु प्रतिमाविद्येच्या दृष्टीने अग्नि, मत्स्य, वराह, विष्णुधर्मोत्तर इ.पुराणे; वैखानस, कामिक,उत्तरकारण, अंशुमद्मेद इ. आगमग्रंथ; मानसोल्लास, मानसार, बृहत्संहिता इ. शिल्प व विश्वकोशात्मक ग्रंथ यांना फार महत्त्व आहे
भारतीय प्रतिमाविद्येत प्रत्येक देवतेच्या स्वरूपवर्णनाबरोबरच काही सामान्य नियम व वर्गवारीही दिलेली असते. त्यांपैकी काही उपासकाच्या हेतूला अनुसरून, तर काही तांत्रिक शक्याशक्यतेचा विचार करून दिलेली असते.
पहिली पायरी म्हणजे त्या त्या देवदेवतेचे मूल किंवा शुद्ध स्वरूप, दुसरे अवतार स्वरूप आणि तिसरे प्रासंगिक आख्यानवर्णित
स्वरूप. उदा., समभंग अवस्थेत उभ्या
असणाऱ्या, चार हातांच्या, शंख-चक्र-गदा-पद्म धारण करणाऱ्या, कौस्तुभादी लांछनांनी युक्त अशा गरुडवाहन विष्णूची
मूर्ती ही मुख्य रूप दाखविते.
मूर्तीतील दुसरा भेद चल-अचल-चलाचल असा आहे. मंदिराच्या केंद्रस्थानी असणारी
पूजामूर्ती ही बहुधा अचल या वर्गात मोडणारी असते. अचल म्हणजे जेथे तिची स्थापना
केलेली असते त्या स्थानावरुन ती हलवायची नसते. अचल मूर्ती सामान्यपणे पाषाणाच्या
आणि धातूच्या असतात व त्या हलवता येणार नाहीत अशा जड व पक्क्या केलेल्या असतात.चल मूर्तीचे कौतुक, उत्सव, बली, स्नपन
आणि विसर्जन असे पाच वर्ग आहेत. यांतील बऱ्याच मूर्ती पीठ, पाषाण, लाकूड, माती इत्यादींच्या आणि वजनाने हलक्या असतात. ‘कौतुक’ मूर्ती नित्य पूजेसाठी; ‘उत्सव’ मूर्ती उत्सवप्रसंगी मिरविण्यासाठी; बलिकर्मासाठी ‘बली’ मूर्ती
आणि स्नानविधीसाठी ‘स्नपन’ मूर्ती असा या मूर्तींचा उपयोग करण्यात येतो. गणेश, गौरी इ. मूर्ती विशिष्ट विहित कालमर्यादेत करावयाच्या
व्रताच्या वा उत्सवाच्या निमित्ताने निर्मिलेल्या असतात, त्यांचे त्या कालमर्यादेच्या अखेरीस विसर्जन करतात, म्हणून त्या ‘विसर्जन’ मूर्ती होत.
कोरण्याच्या पद्धतीवरुनही मूर्तींचे वर्गीकरण करण्यात येते. यात ‘चित्र’ म्हणजे सर्वांग दिसणारी (मुक्त शिल्प); ‘अर्धचित्र’ म्हणजे दर्शनी अर्धांग दिसणारी (उत्थित शिल्प); ‘चित्राभास’ म्हणजे रेखाटलेली वा रंगविलेली व केवळ लांबीरुंदी असणारी (द्विपरिमाणात्मक). सर्वांगाने कोरलेली मूर्ती व्यक्त; वर सांगितल्याप्रमाणे शिवलिंग, बाण ही अव्यक्त प्रतीके; तर घारापुरी येथील मूर्ती (चित्रार्ध) ही व्यक्ताव्यक्त होय
भारतीय प्रतिमाविद्येत तालमान कल्पनेस फार महत्त्व आहे. ‘ताल’ या शब्दाचा मूळ अर्थ तळहात. मधल्या बोटाच्या टोकापासून मनगटापर्यंत जी लांबी होते तिला ताल म्हणत; पण पुढे मस्तकाच्या अत्युच्च बिंदूपासून हनुवटीच्या टोकापर्यंत जी लांबी होते, तिला ताल समजू लागले. प्रत्येक तालाचे तीन प्रकार केलेले असून त्यास उत्तम, मध्यम आणि अधम म्हणत. प्रतिमा तयार करताना त्या किती ताल उंचीच्या असाव्यात, याविषयी प्राचीन शिल्पशास्त्रज्ञांनी काही नियम ठरविले होते. एक तालापासून ते दहा तालांपर्यंत; पण पुढे पुढे तर सोळा तालांपर्यंत मूर्तीचे परिमाण दिलेले आढळते.
प्रतिमाविद्येतील सर्व नियमांना धरून एखादी मूर्ती तयार झाली, तरी ती लगोलग उपासनेस वा पूजेस योग्य ठरत नाही. धर्मशास्त्राच्या नियमांना अनुसरून त्या मूर्तीत ‘प्राण’ घालावा लागतो. असा प्राण ज्या मूर्तीत घातला आहे तीच पूजेला उपयोगी असे समजतात. या क्रियेला ‘प्रतिष्ठापना’ किंवा ‘प्राणप्रतिष्ठा’ नाव आहे. प्रतिमाविद्येचे काम एवढेच, की प्राण ग्रहण करण्यास लायक व योग्य मूर्ती तयार करणे. या आधी सांगितल्याप्रमाणे उच्च कोटीच्या साधकाला प्रतिमाविद्येचा उपयोग ते ते ध्यान मनःचक्षूसमोर आणण्यास होतो. या दोन्ही उद्देशांपैकी पहिले सर्वसामान्य जनांच्या उपयोगी असल्याने महत्त्व पावले आहे