प्रास्ताविक
मनुष्यास पूजनीय वा अपूजनीय, शुभ वा अशुभ वाटणाऱ्या अलौकिक शक्ती म्हणजे देवदेवता, त्यांचे अवतार, देवदेवतांचे पार्षद गण, त्यांची वाहने, परिवारदेवता वा उपदेवता, सहचरदेवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, असुर, राक्षस, सिद्ध वा संत, भुतेखेते इत्यादिकांच्या मूर्ती, प्रतीके अथवा चिन्हे तयार करण्यात येतात.त्यांच्या निर्मीतीचा विचार या शास्त्रामध्ये प्रामुख्याने येतो. त्याबरोबरच स्वयंभू लिंग, बाण, शालिग्राम इ. नैसर्गिक प्रतीकांच्या संदर्भातही परिवारदेवता वा उपदेवता यांच्या कृत्रिम म्हणजे निर्मित प्रतीकांचा विचार केला जातो. मूर्ती वा प्रतिमा तयार करण्यासंबंधी नियम विशद करणारे शास्त्र प्रतिमाविद्या वा मूर्तिविज्ञान या नावाने ओळखले जाते. पूजनीय प्रतीकांच्या- उदा., श्रीयंत्र, स्वस्तिक, इत्यादींच्या-रचनेचे नियमही प्रतिमाविद्येत अंतर्भूत होतात.