Get it on Google Play
Download on the App Store

नामस्मरण - सप्टेंबर २६

एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकविण्याची शाळा काढली . त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या साहाय्याने , निरनिराळी पक्वान्ने कशी तयार करायची , हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे . पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करुन खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे ; त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे ? त्याचप्रमाणे वेदान्ताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानासारखे आहे . जो मनुष्य वेदान्ताचा नुसताच अभ्यास करतो , त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही . जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही , ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही .

आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की , आपण जगतासाठी देव मानतो , तर संत देवासाठी जगत मानतात . खरे म्हणजे , जी गोष्ट आचरायला अतिसुलभ असते , ती समजावून सांगायला फार कठीण असते ; ती खरी अनुभवानेच जाणायची असते . ज्याचा अनुभव दुसर्‍यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा ; म्हणजेच , जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत . या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे ; त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे . तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात , म्हणजेच त्याच्या नामात , राहाण्याचा प्रयत्न करावा . सर्व कीर्तनांचे सार हेच असते , फक्त मांडणी निराळी .

रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले . जो तो ‘ हूं , हूं ’ करुन शोधासाठी निघून गेला . परंतु मारुती अती बुद्धिमान ; त्याने ‘ सीतेला कसे ओळखायचे ’ म्हणून विचारले . त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले . ती सुंदर आहे म्हणून सांगितले . परंतु सुंदर स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही ! तेव्हा श्रीरामप्रभू त्याला म्हणाले , " तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही ; तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव की , जिथे तुला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज . " तेव्हा ती खूण मारुतिरायाला पटली . ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले , त्याचा परमार्थ सफल झाला , आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काही राहिलेच नाही . मारुतिरायाची भक्ती फार मोठी . श्रीरामाला वाटले , याला आता काहीतरी ‘ चिरंजीव ’ असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही ; म्हणून चिरंजीव असे हे आपले नाम त्याला त्याने दिले . त्यामुळे त्या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला .

ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास

स्तोत्रे
Chapters
नामस्मरण - सप्टेंबर १ नामस्मरण - सप्टेंबर २ नामस्मरण - सप्टेंबर ३ नामस्मरण - सप्टेंबर ४ नामस्मरण - सप्टेंबर ५ नामस्मरण - सप्टेंबर ६ नामस्मरण - सप्टेंबर ७ नामस्मरण - सप्टेंबर ८ नामस्मरण - सप्टेंबर ९ नामस्मरण - सप्टेंबर १० नामस्मरण - सप्टेंबर ११ नामस्मरण - सप्टेंबर १२ नामस्मरण - सप्टेंबर १३ नामस्मरण - सप्टेंबर १४ नामस्मरण - सप्टेंबर १५ नामस्मरण - सप्टेंबर १६ नामस्मरण - सप्टेंबर १७ नामस्मरण - सप्टेंबर १८ नामस्मरण - सप्टेंबर १९ नामस्मरण - सप्टेंबर २० नामस्मरण - सप्टेंबर २१ नामस्मरण - सप्टेंबर २२ नामस्मरण - सप्टेंबर २३ नामस्मरण - सप्टेंबर २४ नामस्मरण - सप्टेंबर २५ नामस्मरण - सप्टेंबर २६ नामस्मरण - सप्टेंबर २७ नामस्मरण - सप्टेंबर २८ नामस्मरण - सप्टेंबर २९ नामस्मरण - सप्टेंबर ३०