नामस्मरण - सप्टेंबर २५
भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवून आपण काम करतो , म्हणजे भगवंतच आपल्याकडून सर्व कर्मे घडवीत असतो . त्याच्या प्ररणेनेच सर्व घडते आहे , अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली , म्हणजे भगवंतावर प्रेम जडते . जे जे काही करायचे ते भगवंताकरिता करावे ; म्हणजे पापपुण्याची बाधा आपल्याला होणार नाही . एकदा कबीराच्या घरी पाहुणे आले . घरात तर त्यांना जेवू घालायला काही नव्हते , आणि अतिथीला भगवत्स्वरुप पाहावे असे शास्त्र आहे , तेव्हा कबीराने त्यांना पुरेल इतक्याच धान्याची चोरी केली . चोरी करणे हे वाईट असले , तरी ती भगवंताकरिता केल्यामुळे तिचे पाप त्याला नाही लागले . निदान , कर्म झाल्यावर तरी भगवंताचे स्मरण करुन ते त्याला अर्पण करावे , म्हणजे हळूहळू अभिमान कमी होऊन भगवंतावर प्रेम जडेल .
आपण भगवंताचे आहोत , जगाचे नाही , असा एकदा दृढ निश्चय करावा . आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते तितका हा निश्चय दृढ असावा . तथापि हे साधणे कठीण आहे . त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे , जे काही घडते आहे ते भगवत्प्रेरणेने , त्याच्या सत्तेने आणि इच्छेने घडते आहे , अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी . आणि हेही साधत नसेल , तर वैखरीने अखंड नामस्मरण करावे . या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते . सध्या आपले उलट चालले आहे ; आपण देहाने पूजा करतो , यात्राबित्रा करतो , पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो . सासरी असलेली सून कुटुंबातल्या सर्वांकरिता कष्ट करते ; नवर्याचे कदाचित ती फारसे करीतही नसेल , पण अंतःकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते . तसे , प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे , पण मनात मात्र ‘ मी रामाचा आहे ’ ही अखंड आठवण ठेवावी . आपले स्टेशन ठरुन आपण गाडीत बसल्यावर मध्ये अनेक गोष्टी घडतील ; उभे राहावे लागेल , निरनिराळ्या तर्हेचे लोक भेटतील . पण स्टेशनावर उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये मागचे सगळे आपण विसरुन जातो . तसे भगवंताचे ध्येय निश्चित ठरुन आपण अनुसंधानात राहिल्यानंतर प्रपंचातल्या अडचणींना अगदी तात्पुरते महत्त्व येते . ध्येय मात्र आधी निश्चित करावे . भगवन्नाम हे भगवत्कृपेसाठी घ्यावे , कामनापूर्तीसाठी नसावे ; नामच ध्येय गाठून देईल . भगवंताप्रमाणे आपणदेखील , प्रपंचात असून बाहेर राहावे ; आपल्या देहाकडे साक्षित्वाने पाहायला शिकावे . पण ते साधत नसेल , तर व्यापात राहून अनुसंधानात असावे . वाचलेले विसरेल , पाहिलेले विसरेल , कृती केलेली विसरेल , पण अंतःकरणात घट्ट धरलेले भगवंताचे अनुसंधान कधी विसरायचे नाही .