नामस्मरण - सप्टेंबर ६
पहाटेची वेळ खरोखर चांगली . ह्या वेळी कोणी मानसपूजा करीत असतील तर फारच उत्तम . दुसरे कोणी या वेळी झोपेत असतील , तर आणखी कोणी मनोराज्येही करीत असतील . पहाटेपासून तो रात्रीच्या झोपेपर्यंत , मग तो राजा असो किंवा रंक असो , सर्वांची एकच धडपड चालू असते , आणि ती म्हणजे समाधान मिळवायची . प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची ओढ लागलेली असते . वास्तविक , खरे समाधान हे कशावरही अवलंबून नाही . ते ‘ राम कर्ता ’ ही भावना बाळगल्यानेच मिळू शकते . समाधान मिळवायचे एक अत्यंत सोपे साधन सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितले आहे , आणि ते म्हणजे नामस्मरण . खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचे पाणी प्याले तरी तहान भागते . त्याचप्रमाणे खरी तळमळ असली , म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते . पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असे म्हणतात . तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरुवात करु या . काकड आरती झाली म्हणजे देवाचे स्मरण आणि भाव पाहिजे , यात सर्व काही आले . मला खात्री आहे , तुम्ही आवडीने आणि तळमळीने हा अभ्यास चालू ठेवाल , तर राम तुमचे कल्याण करील .
नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात , अशी सर्वांचीच तक्रार आहे . परंतु असे पाहा , एखादा मनुष्य रस्त्याने चालला असला , की त्याला रस्त्यात कोण भेटावे हे काही त्याच्या हातात नसते . शिवाय , त्याला कोणी विचारले की , ‘ तुला रस्त्यात कोण कोण भेटले ? ’ तर तो म्हणतो , ‘ माझे लक्षच नव्हते . ’ त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे . त्यांच्या पाठीमागे जाऊ नये , किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये . ‘ मला विचार विसरला पाहिजे , विसरला पाहिजे , ’ असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे ? नामामडेच जास्त लक्ष द्यावे , म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो , आणि पुढे ते येईनासे होतात .
एकदा वाट चुकल्यावर ती चुकीची वाट परत उलट दिशेन चालावी लागते ; आणि मग योग्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला लागायचे , हाच अभ्यास ; आणि हे सर्व , ध्येय गाठेपर्यंत चालू ठेवणे हीच तपश्चर्या , ब्रह्मानंदबुवांनी खरी तपाश्चर्या केली . ते एवढे विद्वान , परंतु त्यांनी आपली सर्व बुद्धी रामचरणी लावली . जगातल्या इतर गोष्टींपेक्षा हे केल्याने आपले खचितच कल्याण होईल असे वाटले , म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला , आणि त्याला सर्वस्वी वाहून घेतले . तेव्हा , मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरहित होऊन चालवे , त्यात आपले कल्याण आहे .