Get it on Google Play
Download on the App Store

नामस्मरण - सप्टेंबर १९

आपल्या जीवनाचा सारखा विकास होतो आहे . म्हणून , आपण आज जिथे आहोत त्याच्या मागे काल होतो , आणि आज जिथे आहोत त्याच्या पुढे उद्या आपण जाऊ . हे जरी खरे , तरी आज आपण जे करायला पाहिजे ते न केले , तर एखाद्या वेळी उद्या मागे जाण्याच्या प्रसंग आपल्यावर येईल . पुढचा जन्म हा आजच्या जन्मातूनच निर्माण होतो . तेव्हा आपण आज चांगले असलो तर , ‘ अन्ते मतिः सा गतिः ’ या नियमाप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला चांगलाच येईल . काळ मुख्यतः तीन प्रकारचा असतो ; कालचा , आजचा आणि उद्याचा . जो काळ होऊन गेला तो काही केले तरी परत येणार नाही ; म्हणून त्याची काळजी करु नये . एखाद्याचे कोणी गेले तर आपण त्याला असे सांगतो की , " अरे , एकदा गोष्ट होऊन गेली ; आता काय त्याचे ! आता दुःख न करणे हेच बरे . " हे जे तुम्ही लोकांना सांगता , तसे स्वतः वागण्याचा प्रयत्न करा . मागे होऊन गेल्याची विवेकाने विस्मृती पाडता येते . तसेच , पुढे काय होणार हे माहीत नसल्यामुळे त्याची काळजी करु नये . आजचे आपले कर्तव्य आपण केल्यानंतर , ‘ जे व्हायचे ते होणारच ’ म्हणून स्वस्थ बसावे . मागची आठवण करु नये किंवा गेल्याचे दुःख करु नये , आणि उद्याची किंवा होणार्‍या गोष्टीची काळजी करु नये . सध्या , आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही , आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही , अशी अवस्था आहे . जगात घडामोडी सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ कायम आहे ! आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळे , अपूर्णतेमुळे लागते .

कोणीही मनुष्य जन्माला आला की भगवंताला आनंद होतो , कारण सत्यस्वरुप प्रत्येकाला कळावे अशी भगवंताची इच्छा आहे , आणि हे कार्य फक्त मनुष्यजन्मामध्येच शक्य आहे . यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे . याकरिताच आपल्याला भाव , इच्छा , तळमळ , आच , मनातून उत्पन्न व्हायला पाहिजे . पुष्कळ चांगला स्वयंपाक केला आणि मीठ घालायचेच राहिले तर काय उपयोग ? भाव जर दुजा ठेवला तर भजन चांगले झाले असे कसे म्हणावे ? भक्तीचे नऊ मार्ग सांगितले आहेत . त्यांतल्या कोणत्याही एकाचेच पूर्ण भाव ठेवून परिशीलन केले तरी त्यात बाकीचे आठ येतात . आपल्याला जे कळले ते आपल्या आचरणात आणावे , हे खरे ऐकणे होय . जो आपल्या रक्तामासात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तोच खरा वेदान्त होय ; आणि आपल्या कर्तव्यामध्ये भगवंताचे स्मरण ठेवणे हेच सर्व वेदान्ताचे सार आहे .

ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास

स्तोत्रे
Chapters
नामस्मरण - सप्टेंबर १ नामस्मरण - सप्टेंबर २ नामस्मरण - सप्टेंबर ३ नामस्मरण - सप्टेंबर ४ नामस्मरण - सप्टेंबर ५ नामस्मरण - सप्टेंबर ६ नामस्मरण - सप्टेंबर ७ नामस्मरण - सप्टेंबर ८ नामस्मरण - सप्टेंबर ९ नामस्मरण - सप्टेंबर १० नामस्मरण - सप्टेंबर ११ नामस्मरण - सप्टेंबर १२ नामस्मरण - सप्टेंबर १३ नामस्मरण - सप्टेंबर १४ नामस्मरण - सप्टेंबर १५ नामस्मरण - सप्टेंबर १६ नामस्मरण - सप्टेंबर १७ नामस्मरण - सप्टेंबर १८ नामस्मरण - सप्टेंबर १९ नामस्मरण - सप्टेंबर २० नामस्मरण - सप्टेंबर २१ नामस्मरण - सप्टेंबर २२ नामस्मरण - सप्टेंबर २३ नामस्मरण - सप्टेंबर २४ नामस्मरण - सप्टेंबर २५ नामस्मरण - सप्टेंबर २६ नामस्मरण - सप्टेंबर २७ नामस्मरण - सप्टेंबर २८ नामस्मरण - सप्टेंबर २९ नामस्मरण - सप्टेंबर ३०