Get it on Google Play
Download on the App Store

नामस्मरण - सप्टेंबर २४

देहात आल्यावर , आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावे . घरात अत्यंत समाधान असावे . मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नयेत . बाप जसा सच्छील आहे तसे मुलांनी व्हावे , म्हणजे कुळाची कीर्ति वाढते . मोठ्या माणसाने , पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे . बाईनेही पतीपरते दैवत न मानावे . सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे . जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही स्वाभाविक रीतीने वागता येईल ; म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही . आपण अस्वाभाविक रीतीने , म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे , म्हातारपणी कर्तेपण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते ; आणि ती तापदायक बनते . ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो , त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल . अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल , त्याला दिसायला कमी लागेल , त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही , त्याची झोप कमी होईल ; पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही , आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही . म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे ! ‘ पण मी सांगतो ना ! ’ , ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी , म्हणजे मग दुःख नाहीच नाही .

प्रपंचात वागत असता प्रत्येकाने अंतर्मुख होऊन , आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावेत आणि ते घालविण्याचा प्रयत्न करावा . वयाची सोळा ते पंचवीस वर्षे हा काल असा असतो की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते . ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनांची अत्यंत आवश्यकता असते . बंधनात उत्तम बंधन म्हणजे आईबाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे होय ; कारण आपले हित व्हावे यापलीकडे त्यांचा दुसरा हेतू नसतो . जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे ? म्हणून आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण जरुर करुन घ्यावा . आपले आईबाप एखादे वेळी चुकणार नाहीत असे नाही , कारण चुकणे हा मनुष्याचा धर्मच आहे ; परंतु आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते , तिच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही . कोणता काल कुणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही . म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये . सत्कर्म जेवढे मोठे तेवढी विघ्ने अधिक ; भगवंताचे अनुसंधान हे सर्वांत मोठे सत्कर्म आहे . आपण निश्चयाने आणि निःशंकपणे त्याचे नाव घेऊ या आणि आनंदात राहू

ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास

स्तोत्रे
Chapters
नामस्मरण - सप्टेंबर १ नामस्मरण - सप्टेंबर २ नामस्मरण - सप्टेंबर ३ नामस्मरण - सप्टेंबर ४ नामस्मरण - सप्टेंबर ५ नामस्मरण - सप्टेंबर ६ नामस्मरण - सप्टेंबर ७ नामस्मरण - सप्टेंबर ८ नामस्मरण - सप्टेंबर ९ नामस्मरण - सप्टेंबर १० नामस्मरण - सप्टेंबर ११ नामस्मरण - सप्टेंबर १२ नामस्मरण - सप्टेंबर १३ नामस्मरण - सप्टेंबर १४ नामस्मरण - सप्टेंबर १५ नामस्मरण - सप्टेंबर १६ नामस्मरण - सप्टेंबर १७ नामस्मरण - सप्टेंबर १८ नामस्मरण - सप्टेंबर १९ नामस्मरण - सप्टेंबर २० नामस्मरण - सप्टेंबर २१ नामस्मरण - सप्टेंबर २२ नामस्मरण - सप्टेंबर २३ नामस्मरण - सप्टेंबर २४ नामस्मरण - सप्टेंबर २५ नामस्मरण - सप्टेंबर २६ नामस्मरण - सप्टेंबर २७ नामस्मरण - सप्टेंबर २८ नामस्मरण - सप्टेंबर २९ नामस्मरण - सप्टेंबर ३०