Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ९

२०१

भरल्या बाजारात ओळखीते चातुराला

माझ्या बंधुजीच्या रंग कैलासी धोतराला

२०२

भरला बाजार, बंधु अशात माझा यावा

खण साडीचा मला घ्यावा

२०३

भरल्या बाजारांत चंदरकळेच्या उतरंडी

बंधुजीच्या कमरेला कसा, पैशांचा दुहीतोंडीं

२०४

भरल्या बाजारी छत्रीवाल्याची झाली दाटी

बंधु उभा माझ्यासाठी

२०५

भरल्या बाजारात चंद्रकळेच्या उतरंडी

माझा बंधुराय, पालाच्या पहिल्या तोंडी

२०६

भरल्या बाजारात बंधु वळकिला पहिल्या तोंडी

काळी छतरी हाती, पिवळी दांडी

२०७

भरल्या बाजारांत उभी पालाला धरून

माझ्या बंधुजीला घडी दाविते हेरून

२०८

हौस मला मोठी बंधुसंगट बाजाराची

बहिणीच्या चोळीसाठी कंठी मोडली हजाराची

२०९

दिस उगवला काय मी मागू त्येला

जल्मचुड्याचं राज्य मला, धनसंपत बंधुजीला

२१०

पाहुण्याला पाहुणचार बुंदी पाडू घाईघाई

बंधुजी अमलदाराला रजा न्हाई

२११

पाहुण्याला पाहुणचार करते मालपोव्हं

बंधुजीला माझ्या तूप शेवायासंगं होवं

२१२

माझ्या वाड्यामंदी कुनी बांधिली निळीघोडी

ताईत बंधुजीची वर बनात शालजोडी

२१३

सोनसळे गहूं सोजी पडते फक्कड

बंधुजी करू नको जायाची निकड

२१४

जिवाला जडभारी, कुनाला घालू वझं ?

बंधु तातडी येनं तुझं

२१५

जीवाला माझ्या जड, कोन माझ्या कळकळीचा

ताईत बंधु माझा वाघ सुटेल साखळीचा

२१६

जीवाला माझ्या जड, कसं कळालं अंतरात

ताईत बंधु माझं, झालं रंजिस मैतरांत

२१७

सांगावा सांगत्ये, आल्यागेल्याला गाठुनी

बंधुजी, झालं लईदी भेटुनी

२१८

निरोप धाडिते पत्र वारियाच्या हाती

फार जिवाला तसति होती, यावं बंधु रातोराती

२१९

दिव्याला भरण, घालते सदासदा

गुज बोलूया माझ्या दादा

२२०

दिव्याला भर, घालते लोन्याचं

गुज, बयाच्या तान्ह्याचं

२२१

गुज बोलताना, बोलन्या आली गोडी

बंधुजी, रात मध्यान्ह उरली थोडी

२२२

अंतरीचं गुज गुज सांगते एकल्याला

पाठीच्या रतनाला, बंधुजी धाकल्याला

२२३

दिव्याला भरण घालते लोटीलोटी

माझ्या बंधुजीच्या गोड गोष्टी

२२४

अंतरीचं गुज मी सांगते बंधुपाशी

डाव्या हातानं डोळे पुशी

२२५

गुज बोलताना, दिव्याला जोड वाती

गुज बोलूया सार्‍या राती

२२६

अंतःकरणाची गोष्ट, नको बोलूस गलीयेला

बंधुजी, चल सोप्याच्या खोलीयेला

२२७

अंतरीचं गुजु, सांगते सगळं

बंधु बसा, वाटच्या येगळं

२२८

अंतरीच गुजु, सांगते वाटला

बंधु हुंदक्यानं दाटला

२२९

अंतरीचं गुजु, मी सांगता चुकली

बंधुजी तुमच्यापरास मी धाकली

२३०

अंतरीचं गुजु सांगते अंतराला

पानी भरलं नेतरांला

२३१

अंतरीचं गुजु, सांगते खाली बस

भरिली नेत्र, डोळं पूस

२३२

अंतरीचं दुःख, तुला सांगते चालीचाली

भरिली नेत्र बैस खाली

२३३

सकाळच्यापारी तुळशीला दिला तक्या

गुजु बोलूया, बंधु सख्या