Android app on Google Play

 

संग्रह २

 

२६

पाची परकाराचं ताट, तोंडी लावाया काय वाढूं

करूं बुंदीयेचं लाडू

२७

दुधातुपानं भरलं ताट, वर झाकीते दोन्ही हात

बंधुजी पहाते तुमची वाट

२८

बंधुजी पाव्हना, शेजीला पडलं कोडं

त्येच्या फराळाला माझ्या साठ्याला दूध पेढं

२९

बंधुजी पाव्हना शेजी सांगत आली रंभा

त्येच्या ज्येवनाला खडीसाकर पिवळा आंबा

३०

बंधुजी पाव्हना, शेजी म्हनिते आतां कसं ?

बंधुजीचं ताट करते, मनाला येइल तसं

३१

बंधुजी पाव्हना शेजी म्हनते आतां कसं?

माझ्या बंधुजीला मी तळीते अनारसं

३२

पाव्हना माझा बंधु, शेजी बघे सान्यावाटं

येकूचा तोंडमोळा, चंद्र उगवला कुठं

३३

आला बंधुजी पाव्हना, काढीते मी केळाची फनी

शेजी पुसते कोन आलाया वानी ?

३४

बंधुजी पाव्हना, शेजी म्हनते कोन राजा

शेजी किती सांगु राजा न्हवं, बंधु माझा

३५.

शेजी आईबाई मला उसनं दे ग दही

आलं घराला पाव्हनं, बंधुसंगट भावजई

३६.

शेजी आईबाई बघ माझ्या घराकडे

बंधुजीची गाडी सुटली दारापुढे

३७.

घोडीला घासदाणा देईन साखर नीसती

नका बंधु हट्ट घेऊं, माझी खेड्याची वसती

३८

बंधुला भोजन सोजीचा करते मासा

बंधुजी बोलती, स्वैपाक झाला खासा

३९.

बंधुला भोजन, मी दह्याची करते कढी

बंधुजी बोलती, लवंग झाली थोडी

४०

जेवण जेवतो, तूप खिचडी पापड

बंधुरायाला माझ्या जमाबंदीची निकड

४१

सोजीच्या शेवाया, दुधातुपानं झाल्या मऊ

माझ्या धाकल्या भावा जेऊं !

४२

सोजीच्या शेवायाला उशीर न्हाई बंधु

कर अंघुळ लेई गंधु

४३

जिरंसाळीचं तांदूळ मी वेळत्ये तवलींत

आली माझ्या पाठची दौलत

४४

आला बंधुजी पाव्हना, नड सांगतो जवांतवां

मी पोळ्याला ठेवीला ग तवा

४५

आला बंधुजी पाव्हना, न्हाई केली पोळीपाती

लाडू बुंदीचं वाढूं किती

४६

बंधुजी पाव्हना, जाऊ गुजरी, तुझा माझा

त्याच्या जेवनाला लाडू बुंदीचा करूं ताजा

४७

आला बंधुजी पाव्हना, जाऊ गुजर होती घरी

त्याच्या जेवणाची कशी केलीस उस्तवारी ?

४८

जिरंसाळीच्या तांदुळाला जरासा देते घाऊ

आला माझा भाऊ, नका उपाशी दादा जाऊ

४९

पाव्हनं माझं बंधु, माझ्या जिवाचा गोंदूळ

अंगणी वाळत्यात अनरशाचं तांदूळ

५०

पाव्हनं माझं बंधु काय करूं पकवान

गुळाच्या गुळपोळ्या वर केळाचं शिकरण