Android app on Google Play

 

संग्रह १

 

बंधुजी पाव्हणं, लईंदी यायाचं गाजत्यात

घोडीचं घासदाणं, माझ्या घंगाळी भिजत्यात

दिस मावळला, झाडाझुडांत झाला राऊ

बहिणीच्यासाठी रातचा आला भाऊ

दिस मावळला दिव्यापशी माझा हात

बंधुला इच्यारीते, कां रे पाव्हन्या केली रात

दिस मावळला झाडाझुडाच्या झाल्या वेठी

बंधु बहिणीचं गांव गाठी

दिस मावळला झाडाझुडाच्या आडूशानं

बंधुजी येतो वाटंच्या कडूशानं

दिस मावळला, झाडीमंदी झळकला

ताईत बंधुजील चालीमंदी मी वळकला

दुरून वळकीते, बंधुजी हाई कां न्हवं

काळ्या टोपीची त्याला सवं

उन्हाच्या कारामंदी छत्री बनांत कुनाची ?

ताईत बंधुजीची दौड आलीया उन्हाची

साळीचे तांदुळ आधनी झाला मेवा

बंधु अशात माझा यावा

१०

उन्हाळ्याचं ऊन झळया मारीतं

बंधुजी आलं रुमाल वारीत

११

दुरून ओळखते बंधुची करडी घोडी

वार्‍या वादळानं उडते शालजोडी

१२

घरात कामधंदा, बाहेर गेलं चित्त

बंधु आल्याती अवचित

१३

आला बंधुजी पाव्हना माझ्या जीवाला धगधगा

शिंगी अवखळ नवा जागा

१४

आला बंधुजी पाव्हना, टाकते सत्रंजीवर शेला

बयाजीच्या बाळा बैस गुलाबाच्या फुला

१५

आला बंधुजी पाव्हना, गादी टाकते झाडूनी

बंधु बसा मंदील काढूनी

१६

बंधुज पाव्हना, दाराला होती कडी

बापलेकाची आली जोडी

१७

बसाया बसकुर, पाट टाकते जांभळा

बैस बयाच्या कंबळा

१८

बसाया बसकुर, टाकते चांदवा

बैस बयाजीच्या बाळा, माझ्या बंधवा

१९

समूरल्या सोप्या मी टाकीतसे जान

हौशा बंधुजीनी लई दिसांनी केलं येनं

२०

आला बंधुजी पाव्हना घोड्यावरी जान

सांग बयाचं वर्तमान

२१

गांवाहून आला लाला माझ्या मालनीचा

बयाच्या बाळाला शीण आलाया चालणीचा

२२

ऐत्या वेळेचा पाव्हना, न्हाई मला जड झाला

सयांनु किती सांगु, माझ्या काळजाचा घड आला

२३

आला बंधुजी पाव्हना काय करूं मी जेवायाला

तूप वाढते शेवायाला

२४

बंधुजी पाव्हना काय करूं मी जुंधळ्याचं

त्याच्या जेवनाला ताट नाजूक अंबोळीचं

२५

आला बंधुजी पाव्हना, नव्हं वरनभाकरीचा

त्याच्या जेवनाला करूं पुलावा साकरेचा