Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ३

५१

पंचपक्वान्नाचं ताट करिते पराणापरी याला

माता नाही माझ्या बंधुजीला

५२

कोंड्याचा करते मांडा, भाजीची करते शाक

बंधु जेवुनी लज्जा राख

५३

आला बंधुजी पाव्हना याव आंब्याच्या दिसामंदी

तूप वाढते रसामंदी

५४

आंब्याचा आंबरस, ताट दिसे सोन्यावाणी

करते बंधुजीला मेजवानी

५५

सकाळच्या पारी चूल न्हाई थंडगार

हौशा बंधुजी जिलबीचा जेवनार

५६

साखरेचा लाडू देते वाटंच्या भोजनाला

बया न्हाई माझ्या बंधुजी सजणाला

५७

आकडी दुधाची तापून आली शाई

माझ्या बंधुजीला बया न्हाई

५८

फाटल्या माझ्या चोळ्या न्हाई फाटली माझी पाठ

माझं घेनारं बंधु बळकट

५९

लुगडं फाटलं, आलंया दंडाला

माझ्या बंधुजीला देते सांगावा पुंडाला

६०

फाटली माझी चोळी न्हाई पडली कापणी

माझ्या बंधुजीला घोकणी

६१

लुगडं फाटलं पदर फाटला पाठीवरी

गुजर बंधुजीनं चाटी लूटला वाटेवरी

६२

जिला न्हाई भाऊ, तिनं कशाला रुसावं ?

जरीच्या लुगड्याचं मोल कशाला पुसावं ?

६३

ओटीचा खुर्दा मुठींत मावंना

भाऊ शिवी चोळी, बहिणीच्या मनास येईना

६४

काळी कल्पन्दारू, चोळी असली कुठली

ताईत बंधुजीनं पेठ ममईची लूटली

६५

भाऊ घेतो चोळी, भावजय गुजर डोळे मोडी

त्या चोळीची काय गोडी? शिंपीदादा घाल घडी

६६

बंधुजी घेतो चोळी भावजय देईना दोरा

माझा चांद असतांना, चांदनी तुझा काय तोरा ?

६७

बंधुजी घेतो चोळी भावजय गुजर बोलेना

बहिणा, इलाज चालेना

६८

बंधुजी घेतो चोळी, भावजय म्हणे, उणाक घेऊ नका

नन्दा दिल्याती थोर लोकां

६९

बंधुजी घेतो चोळी भावजय गुजर खुशालीत

तिच्या माहेरी चालरीत

७०

चोळ्या म्हणू चोळ्या, माझ्या बासनी बारा तेरा

बंधु राजसाम देते हिशेब तालेवारा

७१

शिंप्याच्या पालाखाली उंच मोलाचा लालवा

भाऊ बहिणीचा बोलवा

७२

लुगडं घेतलं, साडेसाताचा रासता

माझ्या बंधुजीनी शब्द टाकीला हासता

७३

लुगडं घेतलं, साडेसाताची नामावळ

बंधुजीची घेणावळ

७४

लुगडं घेतलं गंगाजमना आरसपेटी

बंधुजीनं धुंडीलं, पुणं सातारा बारामती

७५

लुगडं घेतल साडेसाताची इरकली

कुन्या पेठेला पैदा केली ?