संग्रह ६
१२६
एकलीचा एक लाल खुतनीचा दोरा
माझ्या बंधुजीला औख मागते परमेसरा
१२७
लोकाला लई ल्येक माझ्या बयाला एकला
ताईत बंधुजी मोती समिंदरात पिकला
१२८
एकापुढे एक मायबाई तुमचं लेक
मोतीपवळ्याचं समिंदरी झालं पीक
१२९
समूरल्या सोप्या गंध लेत्यात भाऊभाऊ
दृष्ट व्हईल, पडदा लावु
१३०
चईताचं ऊन, तूं शिळोपा दे रे देवा
बंधु नाजूक गेले गावा
१३१
उन्हाळ्याचं ऊन लागतं शेल्यांतून
बंधुजी शिंगी काढावी बागेतून
१३२
दुरून ओळखते गावीचा पानोटा
ताईत बंधुजी रावा माकनीमागे होता
१३३
वाटचा वाटसरू कां ग विचारी माझं घर
माझ्या बंधुजीचा मैतर
१३४
वाटेवरचा वाडा, जन म्हणती कोनाचा
बंधुजीचा माझ्या मराठ्या जैनाचा
१३५
खांद्यावरी पोतं धारण बसली दाण्याची
बंधुजीची माझ्या कवळी उमर वाण्याची
१३६
गावोगावीचं पाटील माझ्या बंधुच्या आरांत
नित कचेरी दारांत
१३७
पाची पानाचा इडा बंधुच्या मुखांत
माझा भाईराय उभा दिंडीच्या लोकांत
१३८
मोठं मोठं डोळं, भुंवई बाकात
माझा बंधुजी सदा गुजर लोकांत
१३९
अष्टीच्या धोतर रुमालाची कानपट्टी
बंधु वकिलाच्या जातो भेटी
१४०
समूरल्या सोप्या ढालतलवार आयन्याची
माझ्या बंधुजीनं रजा घेतली महिन्याची
१४१
धोतराचा सोगा वार्यानं मलपा मारी
बंधु माझा उभा, दलाल्या शेजारी
१४२
सांगलीच्या बाजारांत मालाला ठेलाठेली
गुजर बंधुजीची अडत्याची एक बोली
१४३
गावीच्या तालुक्यांत शिंगीचा जागा रिता
माझ्या बंधुजीला दिवाणी
१४४
दिवान वाड्यामंदी वैरी बोलतो वसावसा
माझ्या बंधुजीचा शहाण्याचा शब्द खासा
१४५
दिवानवाड्यामंदी वैरी बोलतो दडूनी
माझ्या बंधुजीनं दिला जबाब चढूनी
१४६
पाची पानाचा इडा बंधुच्या मुखांत रंगला
ताईत बंधुजी रानीपरीस चांगला
१४७
भावाच्या परायास भावजय करावी गोरीपान
आयन्याशेजारी दरपण
१४८
बंधुजीपरायास भावजय गुजर जिव्हाळ्याची
लेक माझ्या मावळ्याची
१४९
बंधुजीपरायास भावजय गुजर किती शहाणी
बंदा माहेराला आणी
१५०
एकामागं एक बंधु हौशाचं लेक
भावजय गुजरीचं जिरेसाळीचं माझ्या पीक