संग्रह ५
१०१
आम्ही चौघी बहिणी चार गांवीच्या बारवा
ताईत बंधुजी मधी नांदतो पारवा
१०२
लिंबाच्या लिंबोण्या लिंबाखाली पसरल्या
बंधुला झाल्या लेकी, बहिणींना इसरला
१०३
बहिणीला केल्यानं नको म्हणूंस नासलं
ताईत बंधूजी, तुला दुणीनं असंल !
१०४
बहीणभावंडाचं भांडण रानीवनीं
बंधु चिन्तावला मनी, बहिणीच्या डोळ्या पाणी
१०५
बहिणभावंडाचं भांडण झालं काल
बंधुजी बोले, बहिणा कशानं डोळं लाल !
१०६
बहिणभावंडाचं भांडण झालं राती
बंधु म्हणे अजून राग किती, माझ बोलणं सभागती
१०७
दुबळी बहीण मी बंधुच्या शेजाराला
लागे वर्दळ गुजराला
१०८
चांदन्यांसंगट चांदाला येते शोभा
भाऊ बहिणीमंदी उभा
१०९
सयाना इच्यारते, माझ्या बंधूचा ऊस कसा ?
त्यात चवथाई माझा हिस्सा
११०
बंधुजी बोलती, बहिणा चौथाई घ्याया चला
चौथाई तुझी तुला, एक चोळीची आशा मला
१११
बहिणीच्या आशिरवादे बंधु झाल्याती कुबेर
माडी बांधलीया जबर
११२
येळाचा येळ गेला गाडी तट्ट्याची विणायाला
बंधु निघाले बहिणीला आणायाला
११३
पोटाच्या परीस, मला पाठची फार गोडी
सावळ्या बंधुराय ! बाळपनीची तुमची जोडी
११४
दिल्याघेतल्यानं पुरेना ऐरावती
माझ्या ग भाईची, गोड बोलाची रसवंती
११५
पडतो पाऊस नदीनाल्यांना आला पूर
थोरला माझा बंधू साठ्याचा समुंदर
११६
बंधुजी बोलतो, ये ग बहीणा एकदिशी
माझ्या व्याल्याती गाई म्हशी
११७
बापानं दिली लेक सातसमुद्राच्या आडू
ताईत बंधुजी, खुशालीचं पत्र मला धाडू
११८
पराया पुरुषाला दादा म्हनायाची चोरी
सख्या बंधुजी गोष्ट न्यारी
११९
वाटच्या वाटसरा चल घरला देते पानी
ताईत बंधु माझा परमुलुखी तुझ्यावाणी
१२०
लोकांच्या बंधुवाणी बंधु नव्हत माझं नारी
शहामिरगाला माया भारी
१२१
धनग संपत् पडे सांदीच्या सुगडांत
बंधुजी गे माझे हडे ते उजेडांत
१२२
आताच्या कलिमंदी भाऊ न्हवत बहिणीचं
भावजय पुसती कोन गांव पाव्हणीचं
१२३
बहिनीच्या गावा जाया भावा पडतं साकडं
रानीच्या गावी जातो घेतो कोसाचं वाकडं
१२४
थोरलं माझं घर सोनीयाच्या आडभिंती
हौशा बंधु माझं, सोप्या बैसले हिरेमोती
१२५
बहिनीचा भाऊ मोठा मायाळु दिसत
चोळी अंजिरी खिशांत