थोडक्यात सांगायचे तर .....
आज जग जवळ आले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांतील अन्नपदार्थाचा चवीमध्ये बदल म्हणून आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र, तो आपल्या नित्य सेवनाचा आहार बनला तर आरोग्याची पार वासलात लागेल, हे नक्की. आयुर्वेदानुसार, जो आहार देशसात्म्य आहे- अर्थात निसर्गत: तुमच्या प्रदेशामधील आहे, तोच तुमच्या आरोग्याला अनुकूल आहे. आपल्या गुणसूत्रांना सर्वस्वी परक्या प्रदेशांमध्ये पिकलेले अन्नपदार्थ आपल्या आरोग्याला पूरक होण्याची शक्यता नाहीच; उलट, ते बाधक ठरेल. तसेच विविध आजारांनाही कारणीभूत ठरेल. आफ्रिका आणि आशिया खंडांमधील मूलनिवासी जोवर आपल्या मूळ आहाराला चिकटून होते, तोवर त्यांच्यामध्ये आधुनिक जीवनशैलीजन्य आजार दिसत नव्हते, हे सांगणारे अनेक संशोधकांचे अहवाल आज उपलब्ध आहेत. हा इतिहास असतानाही आपण जर ओट्स, ब्रेकफास्ट सीरियल्स, ऑलिव्ह तेल आदी परकीय पदार्थाच्या मागे लागणार असू, तर दुर्दैव आपल्या आरोग्याचे आणि आपल्या देशाचेही!
आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की, याच
पाश्चात्त्यांनी आपल्या बापजाद्यांना लाल तांदूळ सोडून पांढरा, रिफाइण्ड तांदूळ
खायला शिकवले; जे आता पांढरा तांदूळ आरोग्याला कसा घातक आहे, हे पटवून लाल
तांदळाचे गुणगान गाऊ लागले आहेत. याच पाश्चात्त्यांनी दातांवर मिठाचे मंजन
करणाऱ्या आपल्या पूर्वजांना अडाणी ठरवून टुथपेस्टने दात घासायला शिकवले. आणि आता
त्याच टुथपेस्टमध्ये मीठ आहे का,
म्हणून विचारताहेत. यांनीच आपल्या
मागच्या दोन पिढय़ांना वनस्पती घी खायला घालून रोगी बनवले आणि नंतर वनस्पती घी कसे
घातक आहे, ते सांगू लागले. यांनीच खोबरेल तेलामुळे कोलेस्टेरॉलचा व हार्ट
अटॅकचा धोका बळावतो असे सांगितले;
आणि आज तेच खोबरेल तेलाचे प्राशन कसे
दीर्घायुष्य देते, हे सांगत आहेत. यांनीच गूळ खाल्ल्यामुळे कृमी होतात, असे सांगून
भारतीयांना साखरेची चटक लावली;
आणि आता साखरेमुळेच अनेक रोग होतात, असे ते म्हणू लागले
आहेत. ज्या पाश्चात्त्यांची आहारासंबंधीची मते हरघडी बदलत असतात, त्यांच्या
सल्ल्यावर, आहारावर विश्वास ठेवायचा कसा? तोही आयुर्वेदासारखी संपन्न आरोग्य
परंपरा व समृद्ध आहार-संस्कृती ज्यांना लाभली आहे त्या देशवासीयांनी?