ब्रेकफास्ट सीरिअल्स आरोग्यास फायदेशीर?
अमेरिकेला कोणतीही विशिष्ट अशी आहार-परंपरा नसल्यामुळे त्यांच्याकडे मांस, मासे, चीज, अंडी वगरे पदार्थ पावामध्ये कोंबून खाल्ले जाऊ लागले. एकंदर अमेरिकनांच्या आहारात अखंड तृणधान्ये, कडधान्ये, भाज्या व फळांचा मुळातच अभाव आहे. हे प्राणिज प्रथिने व रिफाइण्ड कबरेदकांचे अतिसेवन स्थौल्य तसेच अनेक आजारांना कारणीभूत होत आहे. हे ध्यानी आल्यानंतर रोजच्या जेवणात अखंड धान्यांची गरज त्यांच्या लक्षात आली. ज्याचा फायदा काही खाद्यान्न कंपन्यांनी उठवला आणि अपघाताने तयार झालेल्या सीरिअल्सना निरोगी आहार म्हणून दामटले गेले. आणि आज २१ व्या शतकामध्ये दिवसेंदिवस स्थूल बनत चाललेल्या भारतीयांना ब्रेकफास्ट-सीरिअल्स खाण्याचा सल्ला त्यांच्याकडून दिला जात आहे.परंतु वास्तवात सीरियल्स म्हणजे अखंड धान्य नव्हे; तर धान्यावर विविध प्रक्रिया करून तयार झालेला तो एक कृत्रिम पदार्थ आहे. या प्रक्रिया करताना धान्यामधील नसíगक गुण व पोषक घटकसुद्धा नष्ट होतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचे हे, की ज्या देशामध्ये बाराहून अधिक धान्ये आणि तेराहून अधिक कडधान्ये वर्षभरात पिकतात, ज्या देशातले लोक निदान तीन धान्ये व कडधान्यांचे सेवन दिवसातून दोन वेळा नित्यनेमाने करतात, त्या भारतीयांना सीरिअल्सची मुळात गरजच काय? भारतीयांच्या रोजच्या जेवणात अखंड धान्यांची कमी कधी नव्हतीच. पण प्रश्न निर्माण झाला तो आपण मदा, साखर, रिफाइण्ड तांदूळ यांचा वापर करू लागलो तेव्हा! त्यामुळे स्थूलत्व व संबंधित रोगांची समस्या ज्या पाश्चात्त्यांचा आहार घेतल्यामुळे आपल्याकडे निर्माण झाली आहे, त्याच पाश्चात्त्यांनी त्या समस्येवर शोधलेले अर्धवट उत्तर आपण स्वीकारायची गरजच काय? घराघरांतून सेवन केल्या जाणाऱ्या ब्रेकफास्ट सीरिअल्समधील अति-प्रमाणातील साखर आणि मीठ हे आरोग्याला घातक आहेत, ही गंभीर बाब इथे पूर्णपणे दुर्लक्षिली जात आहे. आज महानगरांमधीलच नव्हे, तर जिल्हा आणि तालुक्याच्या गावांमध्येही ब्रेकफास्ट सीरिअल्सचा चंचुप्रवेश झाला आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेह या आजारांना कारणीभूत असणारी इन्सुलिन-प्रतिरोध ((insulin resistance) ही मूळ विकृती शहरांमध्येच नव्हे, तर अगदी गावागावांमध्येही वाढत जाणार आहे.